Saturday, July 8, 2023

छंद बायकोचा

(काल्पनिक कथा) 

मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो.  फावल्या वेळात: 
बायकोने छंद जोपासला. 
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला 
नोटांचा. 

तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे  उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा  लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर. पूर्वीच कथा लिहिली असती तर  मलाहि घरी हिरा सापडला असता. पण आता फार उशीर झाला आहे. माझ्या बाबतीत नेहमी हे असेच होते. पण 'अब पछताए होत क्या, जब चिड़ियाँ चुग गई खेत".

तरीही सौ.ला हिम्मत करून विचारले, अग! एखादा छंद जोपासला पाहिजे होता तू. तुझा वेळ मस्त गेला असता. सौ.ने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात विचारले, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सुचले. बायकोलाहि काही छंद वैगरे असतात. काय विचार चालला आहे तुमच्या मनात. मी उतरलो, सहज विचारले. सौ. "सहSSज!, तुम्ही एक नंबरचे मतलबी आणि स्वार्थी आहात, उगीच काही विचारणार नाही. बाकी छंद जोपासायला पैका लागतो, एक दमडीहि कधी ठेवली होती माझ्या हातात, कंजूस-मक्खीजूस. शेवटी वैतागून म्हणालो, अग ए, भवानी, चूक झाली माझी, तुला हा प्रश्न विचारला. 

पण आता माझे ऐकावेच लागेल. मला किनई लाॅटरीचे तिकीट घ्यायला लई आवडायचे. पण तुमची पैश्यांवर उल्लू सारखी नजर. तरीहि कधी-कधी मौका मिळाल्यावर तुमच्या खिश्यातून पैशे काढून तिकीट विकत घ्यायची. पण एखाद दुसरे लाॅटरीचे तिकीट घेऊन काही नंबर लागत नाही. त्यासाठी मोठी इन्वेस्टमेंट लागते. तुम्ही जर तुमचा पगार माझ्या हातात दिला असता तर लाॅटरी खेळून मी केंव्हाच कोट्याधीश झाले असते. आपले दु:ख-दारिद्र्य केंव्हाच संपले असते. पण माझे नशिबच फुटके, तुमच्या पदरी पडली. 

च्यायला! माझी विकेटच उडाली. डोळ्यांसमोर चित्रपट सुरु झाला बायकोचा छंद जोपासण्यासाठी, महिन्याच्या पहिल्या दिवशी सौ.च्या हातात पगार आणून ठेवला, तिने तो लाॅटरीच्या तिकीटांंवर उडविला. हळू हळू बँकेतील बचत अदृश झाली. मग बनियाने उधार देणे बंद केले. नातेवाईक आणि मित्रांनी दरवाजे बंद केले. फी न भरल्याने मुलांच्या शाळा सुटल्या. घरातील एक-एक करून सर्व वस्तू अदृश्य झाल्या. घर गेले, नौकरी गेली. शेवटी एका पुला खाली संसार थाटवा लागला. जो दे उसका भी भला, जो न दे उसका भी भला, दे दाता के नाम ... भिकेवर गुजराण सुरु झाली.  

थंडीचे दिवस होते, रात्रीची वेळ, दानमध्ये मिळालेली कम्बल पांघरून कसाबसा दिल्लीच्या थंडीपासून स्वताला  वाचण्याचा प्रयत्न करत होतो. एका लॉटरीवाल्याची आवाज ऐकू आली. 'न्यू यिअर स्पेशल' १० करोड का ईनाम तिकीट केवल १० रुपया. सौ.चा आवाज ऐकू आला, भैया  मुझे लगता है, कल मेरी ही लाटरी लगेगी. एक टिकिट मुझे भी चाहिये पर मेरे पास पैसा नहीं  है. यह कम्बल चलेगा क्या म्हणत, माझ्या अंगावरचे कम्बल ओढू लागली. 

अग! ए, काय करतेस, हेच एक शेवटचे  उरले आहे. थंडीत मारणार आहे का मला?  सौ. जोरात ओरडली, सकाळचे सात वाजले आहे, ऑफिसला जायचे आहे कि नाही? रात्री उशिरा पर्यंत काही-बाही वाचता, मग झोपेत बडबडतात. मीच आहे, म्हणून सहन करते हे सर्व. चहा तैयार आहे, नरड्यात ओता आणि ऑफिससाठी तैयार व्हा.  हुश्श्!  वाचलो. बरेच झाले, बायकोला कुठलाही छंद नाही. अन्यथा हिर्याच्या जागी कोळसा सापडला असता.

No comments:

Post a Comment