Saturday, July 29, 2023

पीएनामा : (2) झाडाची फांदी आणि एसीआर

 

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस  इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से  सांगण्यासाठी काही टोपण नावे  मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) 

(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) 

त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची. एक पेक्षा जास्त प्रमोशन पीए लोकांच्या भाग्यात नव्हती. फक्त एक मार्ग होता विभागीय परीक्षा पास करणे. वर रिक्त जागा अत्यंत कमी असल्याने, प्रतिस्पर्धा भयंकर होती. २० टक्के मार्क असलेल्या एसीआरचे (कर्मचाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल) भरी महत्व होते. जर गेल्या पाच वर्षांची एसीआर सर्वोत्कृष्ट (outstanding) नसेल तर लिखित परीक्षा पास होऊन ही प्रमोशनची संभावना शून्य होती. त्यावेळी एसीआर ही गोपनीय होती. काही अधिकारी उत्तम एसीआर लिहली असेल तर पीएला दाखवायचे. उत्तम एसीआर मिळविण्यासाठी पीए अधिकार्‍यांना खुश करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ-दहा वाजे पर्यन्त कपाळावर आठी न येऊ देता काम करायचे. अर्थातच मी ही त्याला अपवाद नव्हतो.

त्यावेळी माझी पोस्टिंग एक वरिष्ठ महिला अधिकारीच्या दरबारात झाली होती. तिथे पीएस आणि एक पीए आधीच होता. याशिवाय क्लार्क, एमटीएस इत्यादि. त्याकाळी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकान्श अधिकारी पीए लोकांच्या तिन्ही वर्षाच्या वार्षिक एसीआर बहुतेक शेवटच्या वर्षी लिहायचे. (मोदीजी सत्तेत आल्यानंतर हे सर्व बदलले आहे. आता प्रत्येक वर्षाची एसीआर त्याच वर्षी एका निश्चित अवधीत ऑनलाईन लिहावी लागते). माझी पोस्टिंग सप्टेंबर महिन्यात तिच्या दरबारात झाली तेंव्हा तिचे फक्त सहा महीने केंद्रीय प्रतिनियुक्तीचे उरले होते. पण पीएस आणि दूसरा पीए तीन वर्षांपासून तिच्या अधीन कार्यरत होते.     

दिल्लीत डिसेंबर महिन्यात थंडी भरपूर असते. हिवाळ्यात ऊन शेकायला सर्वांनाच आवडते. साहजिक आहे तिच्या म्हातार्‍या आईला ही ऊन्हात बसायला आवडत असेलच. एक दिवस सकाळी येताच तिने पीएस साहेबांना तिच्या केबिन मध्ये बोलविले. तिने आदेश दिला, झाडांच्या फांदींमुळे घरात ऊन येत नाही आहे. त्या कापण्याचा बंदोबस्त करा. एनडीएमसी भागात पावसाळयानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात झाडांच्या फांद्या छाटण्याचे सरकारी नियमांनुसार ठेके दिले जातात, त्या वेळी एनडीएमसीला फक्त विनंती केली असती तरी काम झाले असते. पण आता डिसेंबर सुरू झालेला होता. पीएस पन्नासी उलटलेला अनुभवी होता. अश्या समस्या त्याने पूर्वीही हाताळलेल्या होत्या. 'ठीक आहे मॅडम, उद्या फांद्या कापण्याचा बंदोबस्त करतो'. ती थोड्या नाराजगीने म्हणाली, कसे करणार??? पीएस-  झाडांच्या फांद्या छाटणार्‍यांकडून हे काम करवून घेईल. दोन-एकशे रुपये खर्च येईल. पीएसचे उत्तर ऐकून ती भडकली. एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करणाऱ्यांना  गैरकानूनी काम करताना लाज वाटली पाहिजे.  

आता पीएस साहेब काय करणार. एनडीएमसीला पत्र लिहले. दिल्लीत मोठ्या-मोठ्या अधिकार्‍यांनाही पीडब्ल्यूडी, एनडीएमसी आणि स्थानीय प्रशासन घास टाकत नाही (भाव देत नाही). त्यांनी पीएसच्या पत्राला आणि फोनला दाद दिली नाही. वसंत ऋतुत पक्षी घरटे बांधतात त्यामुळे आता फांद्या छाटणे आता शक्य नाही. झाडाच्या फांद्या कापणे अत्यंत गरजेचे असेल तर वन विभागाची अनुमति घ्यावी लागेल, असे उत्तर आले. कागद वन विभागाकडे गेला. लालफिताशाहीत कागद फिरत राहिला. अनेक खेटे आम्ही तिघांनी घातले असेल. अखेर आमच्या प्रयत्नांना यश आले. फेब्रुवारी महिन्यात झाडाच्या फांद्या छाटण्याची अनुमति मिळाली. पीएस साहेब अनुमतिचा कागद घेऊन मॅडमच्या केबिन मध्ये गेले. मॅडमने कागद वाचला आणि त्याचे दोन तुकडे करून  केराच्या टोपलीत टाकले. ती रागाने पीएस वर ओरडली. "आता फांद्या छाटण्याची गरज आहे का?" पुढच्या हिवाळ्यात मी इथे राहणार नाही. तुम्ही तीन-तीन नालायक मिळून एक साधे काम करू शकले नाही. मार्च अखेर तिने आम्हा तिघांच्या एसीआर लिहल्या. आम्हाला दाखविल्या नाही. त्या पीएची सलग तीन वर्षांची सीआर तिने लिहली होती. 

त्यानंतर  त्या पीएची पोस्टिंग एका वरिष्ठ अधिकार्‍यासोबत झाली. पीएच्या नौकरीत त्याचे पाच वर्ष पूर्ण झाल्याने तो पीएसच्या विभागीय परीक्षेसाठी पात्र झाला होता. त्याचा अधिकारी त्याला समोर बसवून त्याची उत्कृष्ट एसीआर लिहायचा. तरीही सतत तीन वर्ष लिखित आणि स्किल परीक्षा पास करून ही त्याचे प्रमोशन झाले नाही. अखेर चौथ्या वर्षी परीक्षा पास झाल्यानंतर त्याचे प्रमोशन झाले. अर्थात चार वर्ष 365 दिवस न चुकता त्याला स्टेनोग्राफीचा अभ्यास करावा लागला (100ची स्पीड टिकवून ठेवण्यासाठी). 

अखेर एसीआरचे नियम बदलले. एसीआरची गोपनीयता संपली. एसीआर पाहण्याचा आणि त्यावर  टिप्पणी करण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना मिळाला. एक दिवस त्या पीएचा  (आता तो पीएस होता) फोन आला, पटाईत, तुझी तिने लिहलेली एसीआर एकदा तुझ्या कार्यालयाच्या एडमिन मध्ये जाऊन बघ. मी म्हंटले, तुझी एसीआर कशी लिहली होती. तिच्या नावाचा उद्धार करत तिला दोन-चार शिव्या देत तो म्हणाला, तिन्ही वर्षांच्या एसीआरवर  तिने फक्त "गुड" असा शेरा दिला होता. एक पीएसाठी 'गुड' ही निकृष्ट एसीआर असते.  मी ही एडमिन मध्ये जाऊन तपासले, 39 वर्षांच्या नौकरीत मला मिळालेली एकमेव निकृष्ट 'गुड' शेरा असलेली एसीआर होती. मला ती जुनी एसीआर दाखविणार्‍या बाबूने विचारले, पटाईत, सर, काय भांडण वैगरे केले होते का तिच्याशी. मी उतरलो, नाही रे, तिच्या बंगल्यातील झाडाची फांदी तोडू शकलो नाही. त्याला काहीच कळले नाही, तो फक्त माझ्या कडे पहात राहिला. 


No comments:

Post a Comment