Monday, August 15, 2011

राजा आणि त्याचे पाळीव कुत्रे


सूतजी म्हणाले,  जंबूद्वीपे, भरतखंडे यमुनेतटी  इंद्रप्रस्थ नावाची एक सुंदर अशी नगरी होती. तेथे उल्कामुख नावाचा एक राजा राज्य करीत होता. माणूस दगा देतो पण कुत्रे आपल्या मालकाशी सदैव एकनिष्ठ राहतात म्हणून  वाघा सारखे आडदांड असे  दोन  कुत्रे  स्वत:च्या रक्षणासाठी त्याने पाळले होते.  कुत्रे ही राजाच्या प्रत्येक आज्ञेचे पालन तत्परतेने करायचे.   राजा कुत्र्यांना आपल्या पासून कधीही दूर करीत नसे. कित्येकदा 'संकटकाळी' कुत्र्यांनी राजाचे रक्षण केले होते. राजाचे कुत्र्यांवर अत्यंत प्रेम होते. राजसभेत सुद्धा राजा  कुत्र्यांना आपल्या सोबत घेऊन जायचा अर्थातच कुत्र्यांच्या साखळ्या त्याचा हातात राह्यच्या.  लोक ही म्हणायचे राजा आणि कुत्रे म्हणजे एक जीव दोन प्राण.पण अलीकडे राजाचे कुत्र प्रेम राजाला भोवू लागले होते. दरबारात कुत्रे  नुसते भुंकायचे नाही तर  कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. त्यांस काय माहित, अधिकांश  घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे  राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे.  आणि  एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयन गृहात चक्क  'राणी' वर भुंकले. आता मात्र राजाचा नाईलाज झाला. काही उपाय कारणे गरजेचे होते.

एक दिवस एक महात्मा राजा घरी आला. तो म्हणाला राजा माझ्यापाशी चमत्कारी साखळ्या आहेत. ह्या साखळ्या त्यांच्या गळ्यात बांध, तुझ्या आज्ञाशिवाय ते कुणावरही भुंकणार नाही किंवा कुणालाही चावणार नाही.  राजाने  महात्माने दिलेल्या साखळ्या कुत्र्यांच्या गळ्यात बांधल्या.  राजा दोन्ही कुत्र्यांना घेऊन फिरायला निघाला. एक कुत्रा, एका पाद्चारीवर भुंकला. राजाने त्याची साखळी ओढली, साखळी कुत्र्याचा गळ्या भोवती कसु लागली, कुत्र्याचे प्राण कासाविस होऊ लागले. कुत्रा भुंकायचा थांबला. कुत्रे बुद्धिमान असतात, 'समजायचे ते समजले'. दुसर्या दिवशी राजा कुत्र्यांसोबत दरबारात आला. नेहमी प्रमाणे मंत्री आणि सरदार दूर उभे होते. राजा हसत-हसत त्यांस म्हणाला मंत्र्यानो घाबरू नका, आता माझ्या आज्ञे शिवाय कुत्रे कोणावरही भुंकणार नाही आणि चावणार नाही.  त्या दिवशी राजसभेचे कामकाज सुरळीत पार पडले.


सूत म्हणाले, मुनिनो  ज्याला या कथेचा  अर्थ गवसेल  तो  कलयुगात, भरतखंडात निर्विघ्नपणे राज्य करेल.