Monday, September 22, 2014

विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मीजवळपास तीन  महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच.  साहजिकच आत्मीय (?)  सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे?  मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला,  धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पृथ्वीवर फेकले याची. अरे, तुझ्या सारख्या नालायक, निखट्टू आणि कवी माणसाला  स्वर्गात एन्ट्री मिळणे शक्यच  नाही.  नरकात रहाणार्यांनी ही म्हंटले असेल, पटाईतची कविता  ऐकण्यापेक्षा कढईत उकळल्या गेलेलं बरे. शेवटी बेइज्जत होऊन पुन्हा पृथ्वीवर परत यावे लागले. चांगलीच नाक कापलीस तू. काळिमा लावला तोंडाला.  आता तरी  सुधरून जा. पुढच्यावेळी स्वर्गात किंवा नरकात कुठेतरी तंबू गाड.

तुम्हीच सांगा काय म्हणावे अश्या मित्राला, मी हॉस्पिटल मधून सही सलामत आल्याचे याला दुखच जास्ती. मी ही त्याला चोख उत्तर दिले, हरामखोरा, तुझ्या सारखे स्नेही ज्याचे आहे, त्याला नरकात पाठवायची काय गरज, म्हणून धर्मराजाने मला पृथ्वीवरच तुझ्या सारख्या मित्रांच्या संगतीत नरकवास भोगायला परत पाठविले आहे, 

त्याला निरुत्तर केले न केले, शर्मा भेटायला आला. येताच त्यांनी प्रेमानी आलिंगन दिले (धृतुराष्ट्र सारखे). यार, वापस क्यों आया, मेरी सारी मेहनत पर पानी फेर दिया तूने. (परत कशाला आला, माझ्या मेहनतीवर पाणी टाकले). मी विचारले ते कसं? तो म्हणाला, आम्हाला वाटलं, या वेळी तू निश्चित  वर जाणार. सर्वांनी मला शोकसभे साठी भाषण तैयार करण्याचा आग्रह केला. आपल्या अंतरात्म्याला मारून, मोठ्या मेहनतीने शोकसभे साठी भाषण तैयार केले. मी म्हणालो, यात अंतरात्म्याला मारण्यासारखे काय? तो म्हणाला भाषणात, तू किती छान आहे, मनमिळाऊ आहे, सज्जन आहे, सर्वांशी किती-किती  चांगले वागतो, तुला काय माहित, त्यात किती- किती खोटी प्रशंसा केली आहे तुझी.  शिवाय, तू गेल्याच आम्हाला किती दुख झाले, असे ही त्यात म्हंटले आहे. आता बोल, एवढे सर्व खोट बोलण्यासाठी अंतरात्म्याला मारावेच लागेल न. मी म्हणालो, एका अर्थी बरंच झाल. तुला खोट बोलावे नाही लागले. पण काळजी करू नको, तुझी मेहनत वाया नाही जाऊ देणार,  तू मेहनतीने तैयार केलेल्या भाषणाची एक प्रत मला दे.  जर कधी तू अचानक वर गेलास तर तुझ्या साठी होणाऱ्या शोक सभेत मी तूच तैयार केलेले भाषण वाचेल, बेहिचक खोट बोलेल, ते ही कपाळावर आठी न आणता. त्या साठी नरकात जावे लागले तरी राजीखुशी जाईल. 

संध्याकाळी कार्यालय सुटायच्या आधी माझा एक जुना मित्र भेटायला आला, येताच म्हणाला, पटाईत, त्या दिवशी मला दुपारी कळले, तू हॉस्पिटल मध्ये आहे, सर्व म्हणत होते, या वेळी काही खंर नाही.  पण मला पूर्ण विश्वास होता, तुला काही ही होणार नाही. एकदम ठनठनीत बरा होऊन तू परत येणार.   मी म्हणालो, तू पहिलाच मित्र आहे ज्याला मी ठीक झाल्याचा आनंद आहे. तो म्हणाला  छे!छे! आनंद वैगरेह काही नाही,  मी सर्वांना म्हणायचो  पटाईत  अस्सल ब्राह्मण आहे, आपल्या  सर्वांची  तेरवी जेवल्याशिवाय कसा मरणार, हा! हा! हा!  मी म्हणालो, खंरच, तू माझा खरा मित्र आहे, बाकी कुणाबद्धल आता सांगू शकत नाही, पण तुझ्या तेरावीला निश्चित जेवायला येईल. 

असे हे माझे अफलातून प्रेमळ सहकर्मी. 

टीप: नावे  काल्पनिक आहे. 

Sunday, September 21, 2014

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: कलियुगातील समुद्र मंथन


स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात?  बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो.  मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे. बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल. जनता म्हणजे वासुकी नाग, ज्याला देव आणि दानव दोन्ही मिळून पिळून काढतील. 

मी म्हणालो बाबा, आपण काय म्हणत आहे, मज अज्ञानीला काहीच बोध होत नाही. शिवाय या घटीला देव कोण, दानव कोण, मित्र कोण, शत्रू कोण काहीच कळत नाही आहे. बाबा म्हणाले, बच्चा, तुला ठाऊकच असेलआकाशात, पाताळात आणि पृथ्वी तिन्ही लोकांत दानवांचे वेगवेगळे राजे असतात. अमृत वाटण्याच्या अधिकार ज्याच्या कडे राहिलं तोच राक्षसांचा राजा, राक्षसेंद्र ठरेल. समुद्र मंथनाच्याआधी राक्षसेंद्र कोण, हे ठरणे गरजेचे. तिन्ही लोकांत देवतांची संख्या भारीच, कुणी पर्वतांचे देवता, कुणी जलाचे, कुणी जंगलांचे, कुणी वृक्षांचे, प्रत्येकाला अमृतात वाटा पाहिजे. या शिवाय कित्येक दानव देवतांचे रूप घेऊन केवळ अमृतासाठी राहू-केतू प्रमाणे यंदा ही देवगणात शामिल झाले आहेत. देवतांचे दोन प्रमुख देवता शिव आणि विष्णू दोन्ही स्वत:ला जगाचे उद्धारक समजतात. या कलयुगात समुद्र मंथनातून निघणारे विष पचवायला शिव तैयार नाही त्याला ही अमृतकुंभ पाहिजे. यक्ष, गंधर्व, भूत-पिशाच सारख्यांनी ही आपला वेगळा मोर्चा तैयार केला आहेत. ऐन वेळी ज्या देवता किंवा राक्षसाला अमृतकुंभ मिळण्याची संभावना दिसेल, त्यांची ते मदत करतील, म्हणत बाबा थांबले. 

मी पुन्हा विचारले, बाबा आपण सर्वज्ञानी आहात, एक सांगा अमृतकुंभ कुणाला मिळेल? बाबा म्हणाले बच्चा, सत्ययुगाप्रमाणे जो देव आणि दानव मोहिनी रूप धारण करण्यात यशस्वी होईल, तोच अमृतकुंभाच अधिकारी ठरेल म्हणत स्वामी त्रिकाळदर्शीनी डोळे बंद केले आणि ते पुन्हा ध्यानमग्न झाले. माझ्या समोर दृश्य तरळले, देव-दानव वासुकी नागाच्या मिळेल त्या अंगाला पकडून समुद्र मंथन करीत आहेत, वासुकी नागाचे हाल-हाल होत आहेत. रागाने बेफाम झालेला हा नाग कुणाला डसेल, काहीच सांगता येत नाही. पण एक मात्र खंर, अमृत कुणाला ही मिळो. पिळवणूक ही वासुकी नागाचीच होणार शिवाय त्याला नाग असल्यामुळे अमृत ही मिळणार नाही, विष पचविणेच त्याच्या नशिबी येणार.   Wednesday, September 17, 2014

मोठा माणूस जन्मत: मोठा असतो???


मोठा माणूस जन्मत: मोठा असतो. त्याला मोठे व्हावेच लागते. आईच्या गर्भात असतानाच त्याला पुढे भविष्यात तो मोठा होणार याची जाणीव असते. बालपणी अन्य कार्ट्यांंप्रमाणे हातवारे करत माकडाप्रमाणे तो उड्या मारत नाही. कधी मोठ्यांच्या नकला करत खदाखदा हसत नाही. कधी आपल्या बहिणीची शेपटी ओढून तिला त्रास देत नाही. भविष्यात आपण उदा: मोठे कवी किंवा लेखक बनणार असू तर आपले जीवन लोकांसमोर आदर्श राहिले पाहिजे म्हणून तो  कधीच खोड्या करीत नाही. बालपणापासूनच सदैव धीर गंभीर चेहरा करून वावरणे त्याच्या नशिबी.भविष्यात त्याच्या लेखनावर चिंतन करणाऱ्या चिंतातूर अति शहाण्यांना शब्दांचा कीस काढून किंवा शीर्षासन करून अर्थ लावण्याची पाळी येऊ नये  म्हणून  काही बोलण्याआधी प्रत्येक वाक्याच्या  प्रत्येक शब्दाचे चिंतन मनन करूनच आपल्या मुखातून शब्द बाहेर फेकीत असे.  लिहितानाही तोलून-मोलून लिहित असे. त्याला माहित असते, त्याने गमंत म्हणून ही काही हलंक-फुलंक लिहील, उदा: 

माझा शेजारचा पोरगा, सावळा ग बाई. 
कान्हा सारखा, खोडकर ग बाई. 
काळीज त्याचे, काळेकुट्ट ग बाई. 
लबाडाने माझे, सर्वस्व लुटले ग बाई. 
माझी मी आता, राहिले ना  ग बाई.

तर भविष्यातले समीक्षक यातून  ही अध्यात्म इत्यादी शोधून काढतील. म्हणून तो असले हलके-फुलके लेखन बालपणापासूनच करीत नाही. खंरच मोठे लोक बालपणा पासून असे वागले आहेत का?

खंर म्हणाल तर कुठला ही मोठा माणूस बालपणा पासून मोठा होत नसतो. तो ही सामन्यांसारखाच असतो. महात्मा गांधी  चष्मा आणि काठी सहित जन्मले नव्हते. जीवनाच्या दीर्घ प्रवासानंतर त्यांना हे स्वरूप प्राप्त झाले. एका  सामान्य घरातला खोडकर आणि चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे. भविष्यातल्या राजनीतिक समीक्षकाने त्यांचे बालपण वेगळ्या चष्म्याने पाहू नये म्हणजे मिळविले.    

नदीला समुद्राचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करावा लागतो, पर्वत, घाटी, मैदान आणि समुद्राला मिळताना प्रत्येक टप्प्यात तिचे स्वरूप वेगळे असते. त्याच प्रमाणे कवी असो वा लेखक त्यांना ही या प्रवासातून जावे लागते. त्यांच्या प्रत्येक लेखनातून समुद्रा सारखा धीर-गंभीरता शोधण्याचा प्रयत्न मूर्खपणाच. टवाळा आवडे विनोद या धर्तीवर ते ही हलंक-फुलंक, विनोदी लिहू शकतात. असो.Sunday, September 7, 2014

सरडा- काही क्षणिका काही म्हणी


महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. 

(१)

जेंव्हा त्यांच्या झाडावर होता
तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता.

जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला
आमच्याच सारखा इमानदार झाला.

(२)

जिभेच्या स्वाद पायी
मधुर फळांची मैत्री जोडी.

अहंता स्वत:ची  त्यागुनी
सरडा झाला रंगनिरपेक्षी.


काही म्हणी:

  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.

Saturday, September 6, 2014

रस्त्यावर वाहन चालविणारेत्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू?  तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी  ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही. दुसर्या बाजूने येणाऱ्या बाईक ने चक्क मिठी मारली. कदाचित त्या गाढवाला दिल्लीत बाईक कशी चालवावी हे कळत नसावे. अरे हिरवा दिवा झाला तरी काय झाले, सुसाट वेगाने जाणार्या बाईकला रस्ता दिला पाहिजे,  एवढे तरी त्याला माहित असायला पाहिजे. त्यानी ब्रेक मारायला पाहिजे होता. आता भोगत असेल आपल्या कर्मांचे फळ म्हणत तो जोरात हसला. आपल्या कष्टापेक्षा दुसर्याचे कष्ट पाहून हसणारा असा हा औलिया. या माणसाला काय म्हणावे मलाच कळेनासे झाले.

रस्त्यावर वाहन चालकांच्या तीन श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणीतले वाहन चालक ट्रफिकच्या सर्व नियमांचे पालन करतात. रस्ता रिकामा असला तरी कधी चुकूनही लाल बत्ती क्रास करीत नाही. पोहचायला उशीर झाला तरी त्यांना चालते. समर्थांच्या अखंड सावधान असावे  या उक्तीवर  त्यांचा विश्वास असतो. स्वत:च्या चुकीने असे वाहन चालक क्वचितच दुर्घटना ग्रस्त होतात. बाकींना सुनील सारख्या वाहन चालकांच्या कर्माचे फळे भोगावे लागतात.

दुसर्या श्रेणीतल्या वाहन चालकांच्या मनात कायदा, कानून नियम यांची भीती असते. पण गंतव्य स्थळी लवकर पोहचण्या करता संधी साधून ट्रफिक नियमांची उपेक्षा करतात. कुणी पाहत नाही पाहून लाल बत्ती क्रास करतात. कधी ट्रफिक पोलीस वाल्याने अडविले तर काय द्या वर त्यांचा विश्वास असतो.  देवावर सव्वा रुपया टाकला कि देव क्षमा करतोच. गांधी छाप कागद पोलिसांच्या हातावर ठेऊन सुटका करण्याच्या प्रयत्न करतात. मुंबईचे ट्रफिक पोलीस या बाबतीत इमानदार असतील, पण दिल्ली ट्रफिक पोलीसवाले नोट ही खिशात टाकतात आणि घरी चालान ही पाठवून देतात. नमकहराम कुठले. त्याना पाहून लोकांना गुंडाळणाऱ्या बंगाली बाबांची आठवनणयेतेच.

तिसर्या श्रेणीचे वाहन चालक सुनील सारखे असतात. त्यांच्या मते नियम, कायदे- कानून यांचे पालन करणारे लोक मूर्ख/ मागासलेले असतात. ट्रफिक पोलीसला पाहून शक्यता बाईक थांविणार नाही आणि कधी थांबवावी लागली तर लगेच उगाच हुज्जत (भांडण) घालायला सुरवात करतील.  त्यांच्या वर विना कारण शरीफ (?) लोकांना त्रास देण्याचा आरोप करतील. शिकायत करण्याची धमकी देतील किंवा तो मी नव्हेच असे दाखवतील. त्रासून ट्रफिक पोलीसवाला अधिकांश वेळी चालान न कापता त्यांना सोडून देतो.  

रस्त्यावर वाहन कसे चालवावे हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त एकच बाब विचार करण्याची आहे, आपल्याला गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचायचं आहे का?


स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात ज्याला या कथेचा अर्थ समजेल तो आयुष्यात कधीच दुर्घटनेचा शिकार होणार नाही. 

Thursday, September 4, 2014

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: पुरोगामीस्य किम् लक्षणं?आश्रमात बाबा ध्यानमग्न बसलेले होते, अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी  मनात एक शंका आहे. स्वामी  त्रिकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी  पुरोगामी कोण असतो, त्याची लक्षणे काय?  स्वामी त्रिकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर  वडाचे झाड बघ, झाडाच्या डाव्या अंगाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी.  स्वामी  त्रिकाळदर्शी: त्या फांदीला पुरोगामी फांदी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी  मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा.  स्वामी  त्रिकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी स्वत:ला वडाच्या झाडाचा अंग मानीत  नाही.  ती वडाच्या झाडाचा तीव्र द्वेष करते. म्हणून तिने  फांदीवर  लागणार्या पानांना झटकून दिले. मी मध्येच टोकले, का स्वामीजी ? स्वामी  त्रिकाळदर्शी म्हणाले,  हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, प्राणवायू झाडाला न मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि झाडापासून मिळणारे सर्व पोषक तत्व ही फांदी शोसते.  मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ही फांदी सर्व झाडांचा द्वेष करते का?  स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, ही फांदी फक्त ती ज्या वडाच्या झाडावर आहे, तिचा द्वेष करते, पण शेजारच्या घराच्या कुंपणावर लागलेल्या बाभळीच्या झाडाची ती सदैव प्रशंसा करते.  पुरोगामी आहे म्हणून, मागच्या जन्मी काही पाप केले असेल म्हणून वडाची फांदी झाले असे तिला नाही वाटत. पण आपण एखाद्या दुर्घटनेमुळे वडाची फांदी झालो असे तिला वाटते. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी, झाडावर एखादे संकट आले, पुरात झाड बुडाले वैगरेह? स्वामीजी म्हणाले, अशा वेळी झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून झाडाला पडण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करतात, झाडाचे इतर अंग ही उदा. फांद्या ही मुळांना भरपूर प्राणवायू पोहचवून त्यांची ताकद वाढवितात. पण पुरोगामी फांदी असे काहीच करत नाही, ती केवळ विचार करते, पूर का आला, हे झाड का वाचले, पडले का नाही इत्यादी.  एखादा NGO सेमिनार साठी पेपर तैयार करतो तसेच. पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, झाडा बरोबर फांदीचे अस्तित्व ही नष्ट होईल, हे तिला कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा तिला जर हे कळले असते तर ती पुरोगामी  कशी झाली असती? क्षणभर आ! वासून मी  स्वामीजींना  बघत राहिलो,  स्वामीजींना  पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.

Monday, September 1, 2014

वरुण राजाला साकडंश्रावण सगळा सरला
टिपूस नाही पडला.
बळीराजाच्या अश्रूंनी
धरती जळून गेली.

साकडं घातल इंद्राला
वरुणराजा धावत आला  
वादळ फोडून पाऊस बरसला.

गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
बळीराजाच नशीब फुटलं.

वरुण राजा
तू तर देव आकाशाचा
का वागतो लहरी सारखा?
गत जन्मांच्या कर्मांचा
का हिशोब घेतो आता?

झाल्या चुका माफ कर
कृपा कर पामरांवर
साकडं घालतो तुझ्या चरणी
पुढच्या वर्षी तरी
पाऊस पाड नेमान.