Monday, September 22, 2014

विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मी



जवळपास तीन  महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच.  साहजिकच आत्मीय (?)  सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे?  मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला,  धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पृथ्वीवर फेकले याची. अरे, तुझ्या सारख्या नालायक, निखट्टू आणि कवी माणसाला  स्वर्गात एन्ट्री मिळणे शक्यच  नाही.  नरकात रहाणार्यांनी ही म्हंटले असेल, पटाईतची कविता  ऐकण्यापेक्षा कढईत उकळल्या गेलेलं बरे. शेवटी बेइज्जत होऊन पुन्हा पृथ्वीवर परत यावे लागले. चांगलीच नाक कापलीस तू. काळिमा लावला तोंडाला.  आता तरी  सुधरून जा. पुढच्यावेळी स्वर्गात किंवा नरकात कुठेतरी तंबू गाड.

तुम्हीच सांगा काय म्हणावे अश्या मित्राला, मी हॉस्पिटल मधून सही सलामत आल्याचे याला दुखच जास्ती. मी ही त्याला चोख उत्तर दिले, हरामखोरा, तुझ्या सारखे स्नेही ज्याचे आहे, त्याला नरकात पाठवायची काय गरज, म्हणून धर्मराजाने मला पृथ्वीवरच तुझ्या सारख्या मित्रांच्या संगतीत नरकवास भोगायला परत पाठविले आहे, 

त्याला निरुत्तर केले न केले, शर्मा भेटायला आला. येताच त्यांनी प्रेमानी आलिंगन दिले (धृतुराष्ट्र सारखे). यार, वापस क्यों आया, मेरी सारी मेहनत पर पानी फेर दिया तूने. (परत कशाला आला, माझ्या मेहनतीवर पाणी टाकले). मी विचारले ते कसं? तो म्हणाला, आम्हाला वाटलं, या वेळी तू निश्चित  वर जाणार. सर्वांनी मला शोकसभे साठी भाषण तैयार करण्याचा आग्रह केला. आपल्या अंतरात्म्याला मारून, मोठ्या मेहनतीने शोकसभे साठी भाषण तैयार केले. मी म्हणालो, यात अंतरात्म्याला मारण्यासारखे काय? तो म्हणाला भाषणात, तू किती छान आहे, मनमिळाऊ आहे, सज्जन आहे, सर्वांशी किती-किती  चांगले वागतो, तुला काय माहित, त्यात किती- किती खोटी प्रशंसा केली आहे तुझी.  शिवाय, तू गेल्याच आम्हाला किती दुख झाले, असे ही त्यात म्हंटले आहे. आता बोल, एवढे सर्व खोट बोलण्यासाठी अंतरात्म्याला मारावेच लागेल न. मी म्हणालो, एका अर्थी बरंच झाल. तुला खोट बोलावे नाही लागले. पण काळजी करू नको, तुझी मेहनत वाया नाही जाऊ देणार,  तू मेहनतीने तैयार केलेल्या भाषणाची एक प्रत मला दे.  जर कधी तू अचानक वर गेलास तर तुझ्या साठी होणाऱ्या शोक सभेत मी तूच तैयार केलेले भाषण वाचेल, बेहिचक खोट बोलेल, ते ही कपाळावर आठी न आणता. त्या साठी नरकात जावे लागले तरी राजीखुशी जाईल. 

संध्याकाळी कार्यालय सुटायच्या आधी माझा एक जुना मित्र भेटायला आला, येताच म्हणाला, पटाईत, त्या दिवशी मला दुपारी कळले, तू हॉस्पिटल मध्ये आहे, सर्व म्हणत होते, या वेळी काही खंर नाही.  पण मला पूर्ण विश्वास होता, तुला काही ही होणार नाही. एकदम ठनठनीत बरा होऊन तू परत येणार.   मी म्हणालो, तू पहिलाच मित्र आहे ज्याला मी ठीक झाल्याचा आनंद आहे. तो म्हणाला  छे!छे! आनंद वैगरेह काही नाही,  मी सर्वांना म्हणायचो  पटाईत  अस्सल ब्राह्मण आहे, आपल्या  सर्वांची  तेरवी जेवल्याशिवाय कसा मरणार, हा! हा! हा!  मी म्हणालो, खंरच, तू माझा खरा मित्र आहे, बाकी कुणाबद्धल आता सांगू शकत नाही, पण तुझ्या तेरावीला निश्चित जेवायला येईल. 

असे हे माझे अफलातून प्रेमळ सहकर्मी. 

टीप: नावे  काल्पनिक आहे. 

No comments:

Post a Comment