Monday, May 28, 2018

शेतकरी आत्महत्येचे हे हि एक कारण


काल आमच्या घरी विदर्भातून पाहुणे आले होते. त्यांची विदर्भात ३० एक एकर शेती आहे.  सहज शेतीचा विषय निघाला. स्वत:च्या शेतीबाबत ते सांगू लागले. काही वर्षांपासून ते जैविक शेती करतात. शेतात विषाक्त खाद किंवा किटाणू नाशकांचा प्रयोग करत नाही. १०० टक्के नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक उत्पाद.  ते शेतीत नित नवीन प्रयोग हि करतात.  बोलताना  त्यांचा उत्साह जाणवत होता. एकदाही शेतमालाचे कमी भाव, कर्जमाफी, ईत्यादी शब्द त्यांच्या मुखातून ऐकले नाही. 

शेतकरी आत्महत्या हा विषय निघाला. आपल्या देशात शेतकरी हजारो वर्षांपासून शेती करत आहे. वरूण राजाने दगा दिला तर अनेक वर्ष दुष्काळ हि पडत होता. त्या वेळी आजच्या सारखे दळणवळणाचे साधन नव्हते. जनतेची चिंता करणारे शासक हि नव्हते.  मोठे राज्य असेल तर, आपल्या राज्यातील एका भागात दुष्काळ पडला आहे, हि बातमी राजा पर्यंत पोहचत हि नव्हती. पोहचली तरी फार उशीर झालेला रहायचा. त्या वेळी दुष्काळी भागात मदत पोहचविणे हि दुष्कर कार्य होते. अश्या बिकट परिस्थितीत गाई बैल तर सोडा बायका मुलांना हि विकायची पाळी हि बळीराजावर यायची. एक वेळच्या जेवणासाठी परदेसी गुलामगिरी हि सहन करावी लागायची. तरीही आत्महत्येचा विचार बळीराजाच्या मनातही यायचा नाही. एक मात्र खरं, त्या काळी  बळीराजा विषाक्त रसायनांचा उपयोग हि शेतीत करायचा नाही. 

आज म्हणाल तर कुठे दुष्काळ पडला तर त्याचा ढोल मिडीयात जोरात वाजतो. सरकारी मशिनरी किती हि भ्रष्ट असली किमान ९० टक्के लोकांपर्यंत अन्न-धान्याची मदत पोहचतेच. कर्ज माफी इत्यादी हि होत राहतात. तरीही आज बळीराजा आत्महत्या करतो. का? शेवटी आत्महत्येचा विचार त्याच्या मनात का येतो?  

गीतेत भगवंतानी म्हंटले आहे, कर्मांची फळे कुणालाच चुकत नाही. आज बळीराजा अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक उर्वरक आणि कीट नाशक टाकतो. ७० टक्के विषाक्त रसायने जमिनीच्या पाण्यात व व वातावरणात मिसळतात. हेच पाणी पशु, पक्षी, मनुष्यसहित  सर्व जीवित प्राणी पितात, विषाक्त हवेत स्वास घेतात, विषाक्त अन्न, भाजी-पाला खातात आणि विभिन्न रोगांनी ग्रस्त होऊन मरतात.   


नुकतीच एक बातमी वाचली नोएडातील अच्छेजा गावातील लोकांसोबत  कुणी हि रोटी बेटीचा व्यवहार  करत नाही.  कारण तिथेले अनेक रहिवासी कैन्सरग्रस्त होऊन मेले. कारण तिथले पाणी दूषित झालेले आहे. हीच परिस्थिती संपूर्ण पंजाब, हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण भागात आहे. ह्या सर्वांचा दोषी कोण. बळीराजाच. मग कर्मांचे फळें त्याला हि भोगावे लागतात.  आपण बातम्या ऐकतोच, विषाक्त किट नाशक शेतात फवारताना तीच विषाक्त वायू बळीराजाचा हि प्राण घेते. निराशाच्या एका क्षणी तेच विषाक्त रसायन पिऊन बळीराजा स्वत:चा आणि परिवाराचा प्राण घेतो. जे विष शेतात पेरले, तेच विष त्याचे प्राण घेणारच. हेच प्राक्तन. 



Friday, May 25, 2018

आठवणीतून - वाट मृत्युची




जनकपुरितल्य़ा
डिस्ट्रीक्ट पार्क मध्ये

चार 'बूढ़े'
पाथरलेल्य़ा डोळ्यानी
पाहत होते वाट मृत्युची
पण देखावा 
'रमी' खेळण्याचा

Monday, May 21, 2018

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय


दुपारचे १ वाजले होतेपित्ज्झा बॉयला अर्ध्या तासात ३  पित्ज्झे  डिलिवर करायचे होते. उशीर झाला तर ग्राहक पैसे देणार नाही आणि मालिक पगार हि नाही. पित्ज्झा बॉयच्या नौकरीत वेळेचेच महत्व. बाईक स्टार्ट करून तो निघाला. तापलेल्या गरमागरम सीटचे  चटके त्याला बसू लागले. आजीने सांगितलेली गोष्ट आठवली, "कोल्होबा-कोल्होबा बोरोली पिकली, नाही नाही आजीबाई ढुंगोली शेकली". त्याच्या मनात विचार आला गाव सोडून आपण या शहरात पैसे कमवायला आलो कि ढुंगोली शेकायला. चौरस्त्यावर पोहचतात समोर रेड लाईट दिसली. दिल्लीची रेड लाईट, च्यायला आता चक्क ५ मिनिटे थांबावे लागेल. बाजूला उभी डीटीसीची एसी बसच् गरमागरम धूर सोडत होती. पुढे थांबलेल्या डीजेल गाडीचा सहन न होणारा धूर नाकाला झोंबत होता. वर आकाशात बघितले, सूर्य हि प्रचंड ताकदीने आग ओकत होता. त्याचे शरीर चोहू बाजूने भाजले जात होते. त्याच्या मनात विचार आला, पुढच्या चौरसत्यावर हि लाल बत्ती भेटली तर आज आपण नक्कीच पित्ज्झाप्रमाणे खरपूस भाजले जाऊ. माणसाच्या पित्ज्झाचा स्वाद कसा असेल. माणसाच्या पित्ज्झ्याला स्वादिष्ट बनविण्यासाठी कोणते चीज, सौस भाज्या, टाॅॅपिंग इत्यादी पित्ज्झ्यावर टाकावे लागतील??? बहुतेक चिड़ियाघरातले वाघ, सिंह सांगू शकतील. तेवढ्यात लाईट हिरवी झाली त्याने पुढे बाईक हाकली. आजकल आपल्या डोक्यात चित्र-विचित्र विचार का येतात? हे ठीक नाही. त्याला त्याच्या बायको आणि छोट्या बाळाची आठवण आली. त्यांच्यासाठी,आपल्याला भरपूर जगायचे आहे, मनातले विचार झटकून त्याने रस्त्यावर धावणाऱ्या ट्राफिकवर लक्ष  केंद्रित केले. 

अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्‍यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार.  जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला.  त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे...... जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे..... 


Sunday, May 13, 2018

मातृदिवस - भिकारीण आणि पनीरची भाजी



तिलकनगरच्या बसस्थानका जवळच पटरीवर, जुन्या कपड्यांचे मार्केट आहे. तिथे दुकानदार जुन्या कपड्यांची दुरुस्ती, धुऊन, प्रेस करून व त्यांची व्यवस्थित घडी करून  विकतात. मोलभाव करून शर्ट पेंट, सलवार कमीज, स्वेटर, जर्सी इत्यादी ५० ते १०० रुपयात ग्राहकांना सहज मिळतात. त्याच भागात एका मंदिरा समोर एक लंगडी भिकारीण भिक मागते. दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा एका अपघातात मरण पावला, ती हि एका पायाने अधू झाली होती. अशिक्षित लंगडीला काम कोण देणारभिक मागणे तिची मजबुरी होती. दिवसातून ५० ते ६० रुपये तर कधी-कधी १०० रुपये हि तिला भिक मध्ये मिळतात. त्यावर तिचा आणि दोन मुलांचा गुजराण कसाबसा  चालतो. तिचे एकच स्वप्न होते, दोन्ही  मुलांना चांगले शिकवायचे आणि मोठे करायचे. तिनें आपल्या दोन्ही मुलांना कार्पोरेशनच्या शाळेत शिकायला टाकले होते. 

आज आश्चर्य झाले, एका भक्ताने चक्क ५००ची नवी कोरी नोट तिच्या हातावर ठेवली. एवढ्या पैश्यांचे कार्य करायचे. विचारचक्र सुरु झाले. हिवाळा जवळ येत आहे, मुलांजवळ घालायला स्वेटर व कपडे हि नाही. नवरा गेल्यानंतर तिला मुलांसाठी कपडे घेणे जमलेच नव्हते. दोघांसाठी एक-एक जोडी शर्ट-पेंट व स्वेटर घेतले तर पुढचे दीड-दोन वर्ष सहज निघून जातील. कुबडीच्या सहाय्याने चालत ती जुन्या कपड्यांच्या बाजारात आली. मोल-भाव करून ४०० रुपयांत मुलांसाठी कपडे घेतले. आता १०० रुपये वाचले होते. आता या १०० रुपयांचे काय करायचे हा विचार ती करत होती. 

काही दिवसांपूर्वीचा किस्सा तिला आठवला. मुले शाळेतून परत आली. मोठ्या मुलाच्या हातात पनीरचे ५-६ तुकडे होते. येताच  तिच्या हातावर ते पनीरचे तुकडे ठेवत तो म्हणाला, आई, पनीरची भाजी करशील का? कुठून आणले तू? कुणी पैशे दिले? मोठा मुलाने काहीच उत्तर दिले नाही. पण लहान मुलाने लगेच उत्तर दिले, आई दादाने कचर्याच्या ढिगार्यावर टाकलेल्या पनीरच्या भाजीतून हे तुकडे उचलले आहे आणि पाण्याने धुतले आहे. भिकारीणचा राग अनावर झाला, तिने तुकडे घरा बाहेर फेकले आणि मोठ्या मुलाच्या एक मुस्कटात लावली व म्हणाली, अरे असे कचर्यातील पडलेले अन्न खाशील तर बीमार होऊन मरशील. लोक म्हणतील आई भिक मागते आणि मुले कचरा खातात. केंव्हा कळणार तुला. अरे मला हि चांगले खाण्याची इच्छा होते, पण या लंगडी भिकारीण जास्त भिक मिळत नाही रे म्हणत तिने हि हंबरडा फोडला. मुले आईला येऊन बिलगली. मोठ्या मुलाने तिचे अश्रू पुसत म्हंटले, आई अशी चूक पुढे करणार नाही. तू रडू नको, मी मोठा झाल्यावर पैशे कमवीन तेंव्हा खाऊ आपण पनीरची भाजी. 

अचानक एका आवाजाने तिची तंद्रा भंगली, काय जमाना आला आहे, फाटके घालणे म्हणजे फैशन. तिची दृष्टी रस्त्यावर गेली. कित्येक ठिकाणी फाटलेली जीन्स घातलेली एक तरुणी आत्मविश्वासाने तर-तर चालत तिच्या समोरून निघून गेली. तिने स्वत:च्या सलवार कमीज कडे पहिले, एक दोन ठिकाणाहून फाटली आहें, ढिगळ लावल्यावर ६ महिने सहज निघून जातील.  पुढे पाहू सलवार-कमीज विकत घेण्याचे. 

तिने बाजारातून पाव-पाव भर पनीर, मटार, कांदे आणि  टमाटर विकत घेतले. आजचा दिवस मुलांसाठी दिवाळी ठरला, नवीन कपडे, मटार-पनीरची भाजी. आनंदी-आनंद. 



टीप: (काही दिवसांपूर्वी कचर्यात टाकलेल्या भाजीतून पनीरचे तुकडे गोळा करणाऱ्या काही मुलांना मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितले होते, त्यावरून हि गोष्ट)

दिल्लीत कार्पोरेशनची शाळा पाचवी पर्यंत असते. 

Saturday, May 12, 2018

आठवणीतून - सोनेरी फुलं आणि म्हातारा



हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं वार्या सोबत डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान !. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न! म्हणत मोबाइलचा आवाज वाढवायचा. कधी फुलांना बांसुरी तर कधी गाणे ऐकवायचा. कधी-कधी किस्से-कहाण्या हि सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.



एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल. तो मटकन खाली बसला. बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या द्वाड मुलांचे काम असेल. त्यांना मनातल्या मनात असंख्य शिव्या मोजल्या. एक कोमजलेले निर्जीव सोनेरी फुल उचलून आपल्या काळजापाशी घट्ट धरले, अचानक म्हातार्याला छातीत कळ जाणवली.



आजोबा, कसं वाटतंय आता, एका सोनेरी फुलाच्या आवाजाने म्हात्याराने डोळे उघडले, समोर क्यारीत सोनेरी फुलं मस्त वाऱ्यावर डोलत होती. आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत, म्हातार्याच्या मनात विचार आला. म्हाताऱ्याने, आपल्या प्रेमळ हाताने फुलांना गोंजारले आणि खात्री केली. नेहमीप्रमाणे फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो? एका फुलाने उत्तर दिले, आम्ही, मस्त आहोत आजोबा, आता कसलीच काळजी नाही, इथे कुणी आम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही थकले असाल आजोबा, फार लांबचा प्रवास झाला ! जरा निवांत पडा, तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो. नंतर आपण निवांत बोलू, भरपूर वेळ आहे, आपल्याकडे. म्हाताऱ्याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते. 

Thursday, May 10, 2018

महानगर - सोनेरी रंगाची उषा


सोनेरी रंगाची उषा 
उगवली पूर्व दिशेला 
पहाटे दिल्लीच्या आकाशी 
धूसर बुरखा घालूनी. 

एक अस्थमाच्या रोगी  
जळत होता निगमबोधी
आकाशी उंच उसळल्या 
सोनेरी रंगाच्या ज्वाळा.


टीप: 
निगमबोध घाट: यमुनेच्या काठी महाभारत काळापासून विद्यमान स्मशान.
(दिल्लीच्या वायू प्रदूषणमुळे इथले रहवासी अस्थमा, हृदयाघात, केंसर इत्यादीने मरणार हे निश्चित)