Sunday, May 13, 2018

मातृदिवस - भिकारीण आणि पनीरची भाजीतिलकनगरच्या बसस्थानका जवळच पटरीवर, जुन्या कपड्यांचे मार्केट आहे. तिथे दुकानदार जुन्या कपड्यांची दुरुस्ती, धुऊन, प्रेस करून व त्यांची व्यवस्थित घडी करून  विकतात. मोलभाव करून शर्ट पेंट, सलवार कमीज, स्वेटर, जर्सी इत्यादी ५० ते १०० रुपयात ग्राहकांना सहज मिळतात. त्याच भागात एका मंदिरा समोर एक लंगडी भिकारीण भिक मागते. दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा एका अपघातात मरण पावला, ती हि एका पायाने अधू झाली होती. अशिक्षित लंगडीला काम कोण देणारभिक मागणे तिची मजबुरी होती. दिवसातून ५० ते ६० रुपये तर कधी-कधी १०० रुपये हि तिला भिक मध्ये मिळतात. त्यावर तिचा आणि दोन मुलांचा गुजराण कसाबसा  चालतो. तिचे एकच स्वप्न होते, दोन्ही  मुलांना चांगले शिकवायचे आणि मोठे करायचे. तिनें आपल्या दोन्ही मुलांना कार्पोरेशनच्या शाळेत शिकायला टाकले होते. 

आज आश्चर्य झाले, एका भक्ताने चक्क ५००ची नवी कोरी नोट तिच्या हातावर ठेवली. एवढ्या पैश्यांचे कार्य करायचे. विचारचक्र सुरु झाले. हिवाळा जवळ येत आहे, मुलांजवळ घालायला स्वेटर व कपडे हि नाही. नवरा गेल्यानंतर तिला मुलांसाठी कपडे घेणे जमलेच नव्हते. दोघांसाठी एक-एक जोडी शर्ट-पेंट व स्वेटर घेतले तर पुढचे दीड-दोन वर्ष सहज निघून जातील. कुबडीच्या सहाय्याने चालत ती जुन्या कपड्यांच्या बाजारात आली. मोल-भाव करून ४०० रुपयांत मुलांसाठी कपडे घेतले. आता १०० रुपये वाचले होते. आता या १०० रुपयांचे काय करायचे हा विचार ती करत होती. 

काही दिवसांपूर्वीचा किस्सा तिला आठवला. मुले शाळेतून परत आली. मोठ्या मुलाच्या हातात पनीरचे ५-६ तुकडे होते. येताच  तिच्या हातावर ते पनीरचे तुकडे ठेवत तो म्हणाला, आई, पनीरची भाजी करशील का? कुठून आणले तू? कुणी पैशे दिले? मोठा मुलाने काहीच उत्तर दिले नाही. पण लहान मुलाने लगेच उत्तर दिले, आई दादाने कचर्याच्या ढिगार्यावर टाकलेल्या पनीरच्या भाजीतून हे तुकडे उचलले आहे आणि पाण्याने धुतले आहे. भिकारीणचा राग अनावर झाला, तिने तुकडे घरा बाहेर फेकले आणि मोठ्या मुलाच्या एक मुस्कटात लावली व म्हणाली, अरे असे कचर्यातील पडलेले अन्न खाशील तर बीमार होऊन मरशील. लोक म्हणतील आई भिक मागते आणि मुले कचरा खातात. केंव्हा कळणार तुला. अरे मला हि चांगले खाण्याची इच्छा होते, पण या लंगडी भिकारीण जास्त भिक मिळत नाही रे म्हणत तिने हि हंबरडा फोडला. मुले आईला येऊन बिलगली. मोठ्या मुलाने तिचे अश्रू पुसत म्हंटले, आई अशी चूक पुढे करणार नाही. तू रडू नको, मी मोठा झाल्यावर पैशे कमवीन तेंव्हा खाऊ आपण पनीरची भाजी. 

अचानक एका आवाजाने तिची तंद्रा भंगली, काय जमाना आला आहे, फाटके घालणे म्हणजे फैशन. तिची दृष्टी रस्त्यावर गेली. कित्येक ठिकाणी फाटलेली जीन्स घातलेली एक तरुणी आत्मविश्वासाने तर-तर चालत तिच्या समोरून निघून गेली. तिने स्वत:च्या सलवार कमीज कडे पहिले, एक दोन ठिकाणाहून फाटली आहें, ढिगळ लावल्यावर ६ महिने सहज निघून जातील.  पुढे पाहू सलवार-कमीज विकत घेण्याचे. 

तिने बाजारातून पाव-पाव भर पनीर, मटार, कांदे आणि  टमाटर विकत घेतले. आजचा दिवस मुलांसाठी दिवाळी ठरला, नवीन कपडे, मटार-पनीरची भाजी. आनंदी-आनंद. टीप: (काही दिवसांपूर्वी कचर्यात टाकलेल्या भाजीतून पनीरचे तुकडे गोळा करणाऱ्या काही मुलांना मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितले होते, त्यावरून हि गोष्ट)

दिल्लीत कार्पोरेशनची शाळा पाचवी पर्यंत असते. 

No comments:

Post a Comment