Monday, May 20, 2019

पोरे: एकाच माळेचे मणी


उत्तम नगर स्टेशनवरून मेट्रोत बसलो. गाडीत जास्त भीड नव्हती. दरवाज्याच्या एका बाजूला तीन तरुण पोरे पुस्तके वह्या उघडून अभ्यास करत होते. राजौरी गार्डन स्टेशनवर गोऱ्याचिट्ट्या स्मार्ट, स्मार्ट कपडे घातलेल्या तीन कालेज कन्या, मेट्रोत चढल्या. साहजिकच होते, इतरांप्रमाणे माझी नजर हि त्या मुलींवर खिळली. मेट्रोत शिरताच तिन्ही मुलींनी पुस्तके उघडली आणि त्या अभ्यासात मग्न झाल्या. मेट्रोचे झटके आणि आजूबाजूची लोक न्याहाळत असतील याची पर्वा त्यांना नव्हती. तिन्ही पोरांचे लक्ष त्या मुलींकडे गेले. त्यांचा पुस्तकी अभ्यास बंद झाला आणि हळूवार आवाजात चर्चा करत त्या पोरांनी, अभ्यासात मग्न मुलींचा अभ्यास करणे सुरु केले. मला नेहमीच वाटते, पोरी अभ्यासात मुलांपेक्षा हुशार असतात याचे मुख्य कारण त्या सुंदरतेचे अस्त्र वापरून मुलांना अभ्यासापासून दूर करतात. अचानक मनात विचार आला, सत्यव्रताने स्वर्गात जाण्यासाठी विश्वामित्र एवजी मेनकेला तपस्येसाठी ऑउटसौर्स केले असते तर त्यांचा त्रिशंकू नसता झाला. सत्यव्रत  जीवित  स्वर्गात पोहचणारे पहिले व्यक्ती ठरले असते. लगेच दुसरा विचार मनात आला, असे झाले असते तर सत्यव्रताला स्वर्गात कदाचित अप्सरांएवजी दाढीवाले ऋषीमुनी भेटले असते... हा विचार सुरु असताना, मनाच्या एका कोपर्यातून आवाज आला, लेका पटाईत या वयातही तू पोरींना न्याहाळीत आहे, शोभून दिसते का? लगेच दुसर्या कोपर्यातून उत्तर आले, वय कितीही झाले तरी पोरे पोरेच असतात, एकाच माळेचे मणी. 

Monday, May 13, 2019

वात्रटिका: मला हिरा सापडला ???


नुकतीच सौ. ऋचा मायी लिखित कथा वाचली. फावल्या वेळातील बायकोचा छंद नवऱ्याला हिरा मिळवून देतो. हिरोला नेहमीच हिरा सापडतो पण माझ्या सारख्याला काय सापडेल???

बायकोचा छंद जोपासला 
मला हिरा सापडला 
अंगणी नोटांचा वर्षाव झाला.

घड्याळाचा गजर वाजला 
हिरा तत्क्षणी अदृश्य झाला 
हाती उरला फक्त कोळसा.  


Friday, May 10, 2019

गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी ???


गांधारीच्या लग्नाची एक कथा प्रचलित आहे. गांधार नरेश सुबलचे १०० पुत्र होते. त्यात शकुनि सर्वात लहान. भीष्माने गांधार नरेश सुबलचा पराभव केला. कैदेत शकुनि सोडल्यास सर्वांचा भुकेने तडफडत मृत्यू झाला. गांधारीचे लग्न हस्तिनापुरच्या राजकुमार धृतराष्ट्राशी झाले. गांधारी सोबत तिचा लहान भाऊ शकुनिचाही राजमहालात प्रवेश झाला.

गांधारी हस्तिनापुरात आली. लग्नानंतर गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधली. इतिहासाच्या संदर्भात या शब्दांचा अर्थ काय, हा प्रश्न नेहमीच मला सतावत होता.   

हस्तिनापुराने गांधारचा सर्वनाश केला होता. शकुनि हा गांधारच्या  गादीचा वारस होता. साहजिकच होते, शकुनिला गांधारचा दारूण पराभव विसरणे कदापि शक्य नव्हते. शकुनि गांधारचे राज्य सोडून हस्तिनापुरच्या वैभवशाली साम्राज्याला नष्ट करण्याचे उद्दिष्ट मनात ठेऊनच हस्तिनापुरात आला होता. 

लग्नानंतर स्त्री ज्या घरात येते, त्या घराण्याशी तिचे नाते जोडले जाते. गांधारी तर हस्तिनापुरची महाराणी होती. हस्तिनापुरचे हितच तिच्यासाठी सर्वोपरी असायला पाहिजे होते. गांधार हा हस्तिनापुरचा शत्रू. पराजय व अपमानाच्या आगीत जळणारा गांधार नरेश शकुनि बदला घेण्यासाठी कुठल्याही पातळीवर उतरू शकतो, हे तिला निश्चित कळत असेल. अश्यापरिस्थितीत सख्खा भाऊ का असेना, त्याला हस्तिनापुरच्या राजमहालात जास्त काळ ठेवणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रित करणे, हे हि तिला समजत असेलच. शकुनिला हस्तिनापुरच्या राजमहालापासून दूर ठेवणेच उचित होते. पण इथे तर शकुनि हस्तिनापुरला आला आणि त्याने हस्तिनापुरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पासे फेकणे सुरु केले. शकुनिच्या कुटील खेळी गांधारीला डोळ्यांनी दिसत होती, तरीही ती गप्प होती. बहुतेक तिच्या हृदयातहि बदल्याची अग्नी जळत होती. त्यासाठी स्वत:च्या घराची राख रांगोळी करण्याची तिची मानसिक तैयारी होती. वैयक्तिक बदल्यासाठी, शत्रूच्या मदतीने स्वत:च्या घराची राख रांगोळी करणारा हा आंधळाच असतो. हेच स्पष्ट करण्यासाठी महाभारतकार व्यासांनी गांधारीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, मला तरी असेच वाटते.

विष्णूशर्माला पंचतंत्रातील 'कावळे आणि उलूक कथा' लिहिण्याची प्रेरणा बहुधा महाभारतातूनच  मिळाली असेल. सारांश राजमहालात विदेशी लोकांची लुडबुड पाहूनही डोळे बंद ठेवणारे राजपुरुष/ राजमहिला गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधलेले आंधळे असतात.


Tuesday, May 7, 2019

सृष्टीकर्त्याचे अप्रतिम चित्रआजकाल मैफिल व्हाॅट्सअप ग्रुपवर सदस्यांनी काढलेल्या चित्रांचा वर्षाव सुरु आहे. ग्रुपच्या सदस्यांनी काढलेले एकापेक्षा एक सुंदर चित्र ग्रुपवर पाह्यला मिळत आहे. साहजिकच आहे सदस्यांचे अप्रतिम चित्र पाह्यल्यावर, माझ्या मनात हि चित्र काढण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण चित्रकलेशी माझे सुरवातीपासून हाडवैर. चित्राचे सोडाच, एक सरळ रेषा हि कधी काढता आली नाही. कसेबसे १३ मार्क्स चित्रकलेच्या पेपर मध्ये मिळायचे. पण एक आठवले, वर्गात सर्वात बुटका असलो तरीहि, क्रिकेट ते हाॅकी कुठल्याही खेळाची टीम असो, माझी वर्णी लागायची.  म्हणतात न, ज्याची कुठल्याच क्षेत्रात गति नसते तो आलराऊंडर असतो. माझेहि तसेच. ठरविले आपण हि चित्र काढायचे आणि ग्रुपवर टाकायचे. 


चित्र काढण्यासाठी कागद, पेन्सिल व रंग हि लागतात. आधीच सौ.ला माझ्या डोक्याविषयी जबरदस्त शंका आहे. त्यात या वयात चित्रकलेसाठी लागणारे साहित्य विकत घेतले असते तर  'नवऱ्याला नक्कीच वेड लागले आहे', याबाबत तिची शंभर टक्के खात्री झाली असती. चित्रकलेचे साहित्य विकत घेण्याचा विचार मनातून काढून टाकला.  

इरादा पक्का असेल तर रस्ता हि सापडतोच. टेक्नोलॉजीची मदत घेण्याचे ठरविले. आता पुढचा प्रश्न - चित्र कोणते काढायचे. माझी एक घाण सवय आहे, काही करण्याच्या आधी मी त्या विषयाच्या मुळात शिरतो. विचार केला, जगातील पहिले चित्र कोणते. बहुतेक सृष्टीच्या प्रारंभिक क्षणाचे चित्र अर्थात बिग बँगचे चित्र असावे. पुन्हा विचार केला, जे माहित आहे, त्याचे चित्र कुणीही काढू शकतो. त्यात विशेष काय. ज्याच्या बाबतीत काहीच माहित नाही त्या सृष्टीकर्त्याचे चित्र काढले पाहिजे. त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी जगातील सर्वात जुना ग्रंथ अर्थात ऋग्वेद पडताळला. ऋषी नेती नेती म्हणतात, ते काय: 


वर खाली काहीच नव्हते
नव्हत्या दाही दिशा 
जल, थल अग्नीहि नव्हती  
नव्हता वारा आणि प्रकाश.

तिमिराचे होते आच्छादन
तपस्यारत होता विभु
स्वयं प्रकाशित आत्मा  जणु

डोक्यात प्रकाश पडला,जे माहित नाही ते तिमिर कारण अंधारत कुणाला काहीच दिसत नाही. तिमिराच्या आवरणात दडलेला विभु, अर्थात स्वयं प्रकाशित आत्मा अर्थात सृष्टी निर्माता परमेश्वर, कुणाला दिसणे शक्यच नाही.  त्याच सृष्टीकर्त्याचे चित्र सॉफ्टवेअरच्या  मदतीने काढले.
(सृष्टीकर्त्याचे चित्र - चित्रकार विवेक पटाईत)


चित्र काढल्यावर, चित्रकलेची जाण असलेल्या एका मित्राला घरी बोलविले. त्याला चहा पाजला नंतर त्याला ब्लॉगवर काढलेले चित्र दाखविले. चित्र पाहून तो हि अचंभित झाला. बहुतेक त्याला काही कळेनासे झाले होते. थोड्यावेळ वाट पाहून मी त्याला विचारले, कसे चित्र आहे. त्याने साक्षात मला दंडवत प्रणाम करीत म्हंटले, गुरु एक तो दाढीवाला म्हतारा पेंटर आणि त्यासम दुसरे तुम्हीच. कुठे लपवून ठेवली होती तुमची कला. माझी ३४ इंची छाती गर्वाने ५६ इंचाची झालीच. मी त्याला विचारले, त्या दाढीवाल्या म्हाताऱ्या पेंटरचे चित्र कोट्यावधी रुपयात विकले जातात. काय किंमत असेल माझ्या या चित्राची. तो म्हणाला, गुरु तुमचे चित्र अमूल्य आहे, त्याची किंमत कवडीतहि मोजणे शक्य नाही, म्हणत त्याने धूम ठोकली. 
        


Thursday, May 2, 2019

माझी कवितासौंदर्य आरस्पानी 
नाही हिच्या पाशी.
  
छंद अलंकारांचा बांधा 
नाही हिच्या अंगी.

ओबड-धोबड शब्दांच्या
ठिगळ्या  फक्त  अंगावरती.

 तरीही  प्राणापेक्षा प्रिय मला
 सखी प्रेयसी कविता माझी. 

Thursday, April 25, 2019

त्रिनाळी: पुणेकर मतदाता


(आधुनिक ब्रम्हवृन्दानी मतदानाच्या दिवसी सर्वात कमी मतदान करून  जगाला त्यांचे खरे स्वरूप दाखविले,) 

कर्तव्यहीन पाषाण 
वाचाळवीर  विद्वान 
सदा देती ब्रम्हज्ञान.
 

Monday, April 22, 2019

सावलीदिवसा उजेडा सावली दिसते. काळी-काळी कुट्ट जणू कृष्णकृत्यांचा खुलासच करते. रात्री सावली दिसत नाही. साहजिकच आहे, काळे कृत्य रात्रीच्या अंधारात होतात. 

रात्र अंधारी
गुप्त सावली 
मानवी वेशात
नाचती हडळे.

सूर्याच्या उजेडात 
सावली दिसली
कृष्णकृत्य सारे
जगाला दिसले. 
 
 
Thursday, April 18, 2019

कारल्याच्या भाजीत शोधले सुखी संसाराचे रहस्य


नवीन वर्षाचा पहिला दिवस. गुढी उभारल्यावर सौ.ने प्रसाद दिला. कडूलिंबाची पाने, धने आणि गूळ. प्रसाद खाताना सुरवातीला कडूलिंबाच्या पानांची कटु चव नंतर गुळाची गोड चव. संसाराचे हि तसेच आहे, कडू स्वीकार केल्याशिवाय संसाराची गोडी अनुभव करता येत नाही. 

आज सौ.ने कारल्याची भाजी डब्यात दिली होती. भाजीवर ताव मारत असताना कारल्याच्या भाजी बाबत विचार करत होतो. लोक कारल्याची भाजी करताना कारल्यावर अगणित अत्याचार करतात. कारल्याची चामडी सोलून काढतात, नंतर त्वचेवर मीठ चोळतात आणि काही काही लोक तर कहरच करतात, कारल्याला चक्क मिठाच्या पाण्यात आंघोळ घालतात. हे सर्व अत्याचार कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठीच.   

आमची सौ. कारल्यावर जास्त अत्याचार करत नाही. ती साली सकट कारल्याच्या बारीक चकत्या करते. फोडणीत थोड जास्त तेल टाकते, भरपूर तिखटहि घालते. कारल शिजल्यावर आंबट आणि गोडीसाठी थोडा गूळ हि घालते.  सौ.च्या हातची कारल्याची भाजी खाताना कडू-तिखट आंबट-गोड सर्व स्वाद जिभेवर तरंगतात. संसाराचे सर्व रंग कारल्याच्या भाजीत सापडतात. तुम्ही जर कारल्याची भाजी मिटक्या  मारत  खाऊ शकत असाल तरच संसारात उठणाऱ्या  वादळांचा सामना समर्थपणे करू शकाल.

म्हणतात न शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहते. मन निरोगी असेल तर घरात शांती राहील, भांडणे होणार नाहीत. माझ्या सौ.चे माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मला दुधी, लाल भोपळा, तोरी व कारल्या सारख्या भाज्या खायला मिळतात. मी सुखी आणि समाधानी आहे. दुसर्या शब्दात, कारल्याच्या भाजीत सुखी संसाराचे रहस्य दडलेले आहे.  Tuesday, April 16, 2019

सरडा : काही क्षणिकाईमान विकत घ्यायला 
बाजारात गेलो.
 मोल घेऊनी  सरड्याला 
घरी परतलो.

सरड्याचे चिन्ह 
नेत्याला मिळाले 
निवडणूक जिंकण्याची 
ग्यारंटी मिळाली.
  
रंगांची शर्यत 
सरडाच  जिंकला 
इंद्रधनू हरला 
आभाळात लपला.


Monday, April 15, 2019

कीर्तीसाठी मी मैफिलकर झालो.


स्वामी त्रिकालदर्शी ध्यानस्थ बसले होते. मी हात जोडून त्यांचे डोळे उघडण्याची वाट पाहत बसलो होतो. मनात विचारांचे काहूर उठले होते. कारण हि तसेच होते. गेल्या आठवड्याची गोष्ट. मोहल्यात  एक लग्न होते. साहजिक मीहि सौ. सोबत लग्नाला गेलो होतो. माझी ओळख करून देताना एक सद्ग्रहस्थ वदले "हे सौ. .. चे मिस्टर आहेत". तीस वर्ष या मोहल्यात वास्तव्य असूनही शेजार्यांना माझे नाव देखील ठाऊक नाही. मनाला किती वेदना झाल्या हे सांगणे कठीण. काल रात्री तर कहरच झाला. कार्यालयातून घरी परतायला उशीर झाला. मोह्ल्यातील कुत्रे एरवी येणाऱ्या-जाणार्यांवर भुंकतात पण त्यांनीहि माझी दखल घेतली नाही. कुत्र्यांच्या भुंकण्याची लायकी हि आपली नाही. जगणे व्यर्थ वाटू लागले.

समर्थ म्हणतात, "मरावे परी कीर्तिरुपी उरावे". इथे जीतेजी कुणी ओळखत नाही,  तिथे मेल्यावर कुणाला आपले स्मरण होणार.  काय करावे जेणेकरून आपले नाव काही काळ तरी लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. मन बैचैन झालेले होते. तेवढ्यात स्वामीजींनी डोळे उघडले, माझ्याकडे बघत म्हणाले, काय विवेक प्रसिद्धी ध्यास लागला आहे वाटते. 

मी म्हणालो, "स्वामीजी, आपल्यापासून काय लपले आहे,  प्रत्येकाला वाटते जगात नाव झाले पाहिजे, मला हि वाटते". 


स्वामीजी मंद हसले आणि म्हणाले, देशात निवडूणुकीचे वारे वाहत आहेत, निवडणूक लढव. 

"स्वामीजी, जिथे मोहल्यात कुणी ओळखत नाही, तिथे निवडणुकीचे तिकीट कोण देणार". 

मग असे कर, एखादी शाळा, अनाथालय किंवा धर्मशाळा बांध, जगी नाव होईल.  

"स्वामीजी, कशालाहो थट्टा करता गरीबाची. सरकार फक्त दाल-रोटी निघेल एवढाच पगार देते". 

मन्जे तुला प्रसिद्धी पाहिजे, तेही  पैका न खर्च करता?

"होय स्वामीजी, मला फक्त प्रसिद्धी पाहिजे. पैका नाही मिळाला तरी चालेल". 

मग एखादी कला अवगत आहे का? संगीत, नृत्य, चित्रकला इत्यादी...

"स्वामीजी, आता साठी जवळ आली आहे, संगीत नृत्य इत्यादी शिकण्याची वेळ निघून गेली आहे. चित्रकलेचे म्हणाल तर जास्तीसजास्त आडव्या-तिरप्या रेखा कागदावर रखडण्या व्यतिरिक्त काही अधिक येत नाही". 

स्वामीजी हसले, म्हणाले, हे हि पुरेसे आहे, आजच्या काळात कुणालाहि न कळणार्या चित्रांनांच जास्त वेल्यू आहे. फक्त त्या चित्रांना विवादास्पद नाव दे, पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतील. 

स्वामीजींचे बोलणे ऐकून खरे म्हणाल तर मला रागच आला, पण उसने अवसान आणून म्हणालो, "स्वामीजी, विवादांपासून मला दूरच ठेवा, आजकाल असहिष्णुता लई वाढली आहे. त्यात मी सिंगल हड्डी. जान जोखीम मध्ये टाकून मला प्रसिद्धी नको".

स्वामीजी जोरात हसले म्हणाले, बच्चा तुझी फिरकी घेत होतो. उगाच त्रागा करू नकोस, सौपा उपाय सांगतो, तू लेखक आणि  कवी हो, थोडेफार नाव निश्चित होईल.  

स्वामीजींना मध्येच तोडत मी म्हणालो, "स्वामीजी एक तर मला लिहिता येत नाही. दुसरे त्यातहि खिश्यातील ४० ते ५० हजार खर्च केल्यावर दोनशे तीनशे पानी पुस्तकच्या हजार एक प्रती छापल्या तरीही ती वाचणार कोण?  आजकाल पुस्तके, त्यातहि मराठी पुस्तके लोक विकत घेत नाही. मित्रांना, परिचितांना फुकट वाटली तरी ते वाचणार नाही. याची शंभर टक्के खात्री आहे. ती सरळ रद्दीत जातील".  

स्वामीजी म्हणाले, "बच्चा आधी मी काय म्हणतो तेपूर्ण ऐक. तुझ्यासाठी योग्य ठिकाण शोधले आहे. इनस्टेंट प्रसिद्धी मिळेल. गुगलवर अनेक  स्वयंसिद्ध लेखूकांनी  व्हाट्सअप ग्रुप तैयार केले आहेत. अश्याच एखाद्या  ग्रुपची सदस्यता ग्रहण कर. तिथे अनेक स्वयंसिद्ध लेखक/कवी  लेख आणि कविता टंकतात. फक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेव, आवडो न आवडो, दुसर्यांचे लेख आणि कविता  लाईक कर. जेवढ्या जास्त तू दुसर्यांच्या कविता आणि लेख  लाईक करेल बदल्यात तुझ्या  निरर्थक लेखांनाहि  लाईक मिळतील.  काही काळातच,  किमान  शंभर ते  हजार लोक  तुला ओळखू लागतील. 

स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. घरी आलो मोबाईलवर ग्रुप शोधू लागलो. "मैफिल ग्रुप" सापडला. लगेच सदस्यता घेतली. पाहू किती कीर्ती मिळते ते. 

Monday, April 8, 2019

रूपक कथा: भव्य देवालय आणि भक्त


भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.

आता अवतारी देवता म्हणाल तर, त्या देवतेची पत्नी, पोरे-पोरी, सासू- सुना इत्यादी मंडळी हि येतीलच. मुख्य देवते सोबत मंदिराच्या आवारात त्यांची हि स्थापना केलेली होती. मुख्य देवेतेप्रमाणे याही देवता शक्तिशाली होत्या. भारी-भरकम दक्षिणा मोजल्यावरच देवतेची अनुकंपा भक्तांवर व्हायची. अर्थात देवतेचा कृपा प्रसाद त्या भक्तांना मिळायचा. बाकी भक्त फक्त देवतेचे दुरून दर्शन घेऊन कृतकृत्य व्हायचे. माझ्या देवतेचे मंदिर किती भव्य आहे, याचे वर्णन करून स्वत:ला धन्य समजायचे.   

मी असेच एका भक्ताला विचारले, बाबा एवढी तुझी देवतेप्रती निष्ठा आहे तरी देवता तुला प्रसन्न का होत नाही. तुझे दु:ख का दूर करत नाही. तो म्हणाला पूर्वी सत्ययुगात देवता भक्ताच्या तपस्येवर प्रसन्न होऊन स्वर्गातून थेट पृथ्वीवर यायचे, भक्ताच्या मदतीसाठी. आता देवता इथे पृथ्वीवरच मंदिरात विराजमान असतात.  भक्तांना तपस्या करायची गरज नाही. जो भक्त भरपूर दक्षिणा मोजतो, देवताची अनुकंपा त्या भक्तावर होते. मी काही पुढे विचारणार, तेवढ्यात भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे कपाट उघडले. देवतेची जयजयकार करीत भक्तांनी मंदिरात प्रवेश केला. 


Friday, April 5, 2019

शुभमंगल सावधान


रोजडे दिनी तिनी गुलाबाची कळी दिली. गुलाबाच्या सुगंध त्याच्या नाकात भिनला, पण काटा हातात रुतला आणि रक्त वाहू लागले. अत्यंत गोड कोकिळेच्या आवाजात ती साॅरी म्हणाली व मधुबाला सारखे गालात लाजली जणू स्वर्गातील अप्सराच. त्याची शुद्धच  हरवली आणि विचार करण्याही शक्ती हि. तो तिच्या जाळ्यात अलगद अटकला. "शुभमंगल सावधान" पण कुणीच त्याला सावधान केले नाही. लग्न झाल्यावर तो तिची प्रत्येक इच्छा तळहातावर घेऊन पूर्ण करू लागला. वासनेच्या डोहात संसार फुलला आणि त्या सोबत संसाराचे चटके हि बसू लागले.  आता तिचे अवगुण त्याच्या दृष्टीस येऊ लागले. सकाळी नवऱ्याच्या हातचा चहा पिल्याशिवाय ती पलंगावरून उठायची नाही. नौकरीला जाण्याआधी मुलांचा नाश्ता हि त्यालाच तैयार करावा लागे. नुसते आयते खाऊन-खाऊन गुलाबाची कळी आता गोबीच्या फुलासारखी फुलली होती. अप्सरा आता हिडींबा दिसू लागली होती. 

त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. काय पाहून हिच्याशी लग्न केले. कुणी आपल्याला वेळेवर सावधान का नाही केले. किमान लग्न लावणाऱ्या गुर्जीनी तरी सावधान करायला पाहिजे होते. गुरुजींना जाऊन जाब विचारायला पाहिजे. गुरुजींना शोधता-शोधता तो एका लग्न मंडपात पोहचला. गुर्जी लग्न लावीत होते.  गुरुजीनी  चढ्या आवाजात शुभमंगल म्हंटले पण सावधान हा शब्द तोंडातच पुटपुटले. कुणालाच तो शब्द ऐकू आला नाही. नवऱ्या मुलाने आनंदाने हार नवरी मुलीच्या गळ्यात घातला. च्यायला ह्याचे नशीब हि फुटणार, म्हणत त्याने कपाळावर हात मारला.

काही वेळाने गुर्जींचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो म्हणाला, गुर्जी! हे तुम्ही ठीक केले नाही. सावधान शब्द हि जोरात उच्चारला पाहिजे होता. गुर्जी त्याला पाहत हसले आणि म्हणाले अरे एकदा जोरात 'सावधान' म्हंटले  होते आणि समर्थ बोहल्यावरून पळून गेले, त्यासोबत गुरुजीची दक्षिणा हि बुडाली. त्या दिवसापासून, आम्ही गुरुजी सावधान हा शब्द फक्त तोंडातच पुटपुटतो.   

Friday, March 29, 2019

मी बुद्धिबळ विजेताउन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच नागपूरला जाण्याचे वेध लागत असे. नागपूर म्हणजें आजी-आजोबा, काका-काकू,  चुलत, मावस, आते भाऊ- बहिणी. सर्वांसोबत मौजमस्ती करायचे दिवस. नागपुरात उन्हाळा भयंकर असतो. दुपारचे जेवण झाल्यावर २ ते ५ सर्वच झोपायचे. मला दुपारी झोपायची सवय नव्हती. घरा जवळच एक काका राहायचे. ते नुकतेच निवृत्त झालेले होते. त्यांना बुद्धिबळ खेळायची भारी हौस. त्यासाठी ते नेहमीच सावजाच्या शोधात राहायचे. तू दुपारी झोपत नाही, घरी ये मी तुला बुद्धिबळ शिकवितो. मी विचार केला, आपला टाईमपास हि होईल शिवाय बुद्धिबळ हि शिकायला मिळेल. न कळत मी त्यांच्या जाळ्यात  अटकलो.  दोन-तीन दिवसातच मला जाणीव झाली, त्यांना मला बुद्धिबळ शिकविण्यापेक्षा जिंकण्यातच जास्त आनंद मिळत होता. पण काकांसोबत बुद्धिबळ खेळण्याचा एक फायदा हि होता, तिथे काकूंच्या हातचा खाऊ खायला मिळत असे.  माझ्या दृष्टीने हा सौदा काही वाईट नव्हता. 

पण म्हणतात न सुखाला हि नजर हि लागतेच.  तीन-चार दिवसच झाले होते. सांयकाळी ६ वाजता घरी पोहचलो. सुलगवण्यासाठी भावंडाची फौज माझीच वाट पाहत होती. पोहचताच मोठी चुलत बहिण म्हणाली, काय विवेक आज किती डाव हरला. एक भाऊ म्हणाला, "डाव हरणे म्हणजे इभ्रत गमविणे". आपल्याला तर बुआ एखाद दिवशी कुणाकडून हरलो तर रात्रभर झोप येत नाही. तेवढेच  काय कमी होते. माझा लहान भाऊ हि उतरला, अरे शिऱ्या सोबत दादा इभ्रत हि सहज पचवितो. एक जोराचा हशा पिकला. च्यायला जाम पेटली.  मनात विचार आला, काकांसोबत खेळणे सोडून द्यावे. पण हा तर पळपुटे पणा होईल. उद्या काही हि करून काकांना हरविले पाहिजे. 

आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. गंगा-जमुनी तहजीब मध्ये वाढत होतो. बार-तेरा वर्षांचा असलो तरी खेळांचे काही ठळक नियम पाठ झाले होते. पहिला नियम- नेहमीच जिंकण्यासाठी खेळले पाहिजे. जिंकणे महत्वाचे. नियम दुसरा- खेळांच्या नियमांचा उपयोग जिंकण्यासाठी करता आला पाहिजे. उदा. "मांकड आउट" किंवा "अंडर आर्म चेंडू फेकणारा  क्रिकेटर"  हे आमचे आदर्श. नियम तिसरा- प्रतिस्पर्धी संभ्रमित किंवा बेसावध असेल तर धर्मराज युधिष्ठिरचा आदर्श नेहमीच डोळ्यांसमोर समोर ठेवावा. गरज पडली तर ''चा 'मा' करायला हि करचले नाही पाहिजे. असो.

दुसर्या दिवशी आज कसेही करून करून काकाना हरवायचे हा निश्चय करून  दुपारी  चार वाजता काकांच्या घरी पोहचलो. अर्थातच रोजच्याप्रमाणे डाव हरणे सुरु झाले. बहुतेक तो  तिसरा डाव  होता, काकांना वाशरूमला जाण्याची इच्छा झाली. चाल चालून ते वाशरूमला गेले. आता मी एकटाच खोलीत होतो. बुद्धिबळाच्या पटाकडे न्याहाळत असताना जाणवले, आपण जर घोड्याची साडेतीन चाल खेळली तर डाव पुढच्या चालीत जिंकता येईल. या घटकेला खोलीत कुणीच नाही, हिम्मत करून घोड्याला साडेतीन घर पुढे दामटले. काका वाशरूम मधून आले. पण आता काकांच्या नजरेला नजर मिळविण्याची हिम्मत नव्हती. डोक्यात एकच विचार येत होता, काकांना आपण केलेली हेराफेरी कळली तर??? मी काकांना म्हणालो, काका तहान लागली आहे, पाणी पिऊन येतो. काकू स्वैपाकघरात होती, मी तिला पाणी मागितले. पाणी देता-देता ती म्हणाली, तुझ्यासाठी आज उपरपेंडी करते आहे. मी डोळे चमकावीत म्हणालो, काकू मला तिखट आवडते, भरपूर लालमिरच्या घाल उपरपेंडीत. पाणी पिऊन मी खोलीत परतलो. त्या काकांना मी केलेली हेराफेरी कळली नव्हती. काका खेळताना शांत राहत असत पण त्यादिवशी मी खोलीत शिरताच ते म्हणाले, माझी चाल खेळून झाली आहे, वाचव आपल्या घोड्याला. मी पटाकडे बघितले, माझ्या घोड्याला शह देण्यासाठी एक प्यादा त्यांनी पुढे वाढविला होता. (बहुतेक त्यांच्या हातून घोडचूक घडली आहे, हे त्यांना जाणविले असेल, माझे लक्ष भटकविण्यासाठी त्यांनी असे म्हंटले असेल). त्यांना दाखवायला, मी म्हणालो काय काका, माझा आक्रमण करण्याचा प्रयत्न नेहमीच फसतो. हाही गेम मी हरणार. अर्थात हे म्हणत असताना माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. काही वेळ गंभीर राहून,  राणीला राजाच्या समोर ठेवले. राणीला घोड्याचे पाठबळ असल्यामुळे त्यांना काहीही करणे अशक्य होते. काका शह आणि मात, मी जिंकलो, मी जिंकलो अशी जोरात आरोळी ठोकली. आता इथे जास्त थांबलो तर पकडले जाऊ. इथून पळ काढला पाहिजे. मी त्या काकांना म्हणालो आज एवढेच पुरे. आम्हाला बाहेर जायचे आहे फिरायला. माझा जोराचा आवाज ऐकून काकू खोलीत आली आणि म्हणाली, जिंकलास छान झाले. अरे पण तुझ्यासाठी खास झणझणीत उपरपेंडी केली आहे, ती तरी खाऊन जा. मी लगेच उतरलो, ती झणझणीत उपरपेंडी काकाला खायला दे, म्हणत मी घराकडे धूम ठोकली. 

घरी येताच सर्वांसमोर आपल्या विजयाची डुगडुगी जोरात वाजविली. संपूर्ण मोहल्यात मी जिंकलो हि बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. असो. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही गच्चीवर झोपायला जायचो. झोपण्यापूर्वी काका आम्हाला गोष्टी सांगायचे. रात्रीचे दहा वाजले होते. ते काका घरी आले. बहुतेक त्यांनी पुन्हा डाव मांडून पराजयाचे कारण शोधले असावे. माझी कान उघडणी करण्यासाठी ते घरी आले होते. आम्ही गच्चीवर आहोत हे कळताच ते हि गच्चीवर आले. येताच म्हणाले, काय विवेक, घोड्याची चाल किती घरांची असते. मी चमकलोच, या काकांना आपली हेराफेरी कळली आहे. माझे काका हि समोर होते. त्यांच्या समोर असत्य बोलणे शक्य नव्हते. एकीकडे धर्मसंकट व दुसरीकडे  इभ्रतीचा प्रश्न होता. खेळाचा नियम तीन आठवला. महाराज युधिष्ठिर यांचा आदर्श समोर ठेऊन आत्मविश्वासाने मी म्हणालो, काका मला बुद्धिबळ काय आहे हे माहित नव्हते. तुम्हीच मला खेळ शिकविला. बघा, राणी कितीहि घर सरळ, आडवी आणि तिरपी चालते. हत्ती कितीहि घर सरळ आणि आडवा चालतो. उंट कितीहि घर तिरपा चालतो. घोडा तर प्यादांच्या डोक्यावर उडी मारून कितीहि घर सरळ आणि एक घर आडवा किंवा कितीही घर आडवा आणि एक घर सरळ असा चालतो. काका म्हणाले, म्हणजे तू कबूल करतो, तू घोड्याला साडेतीन घर चालविले. मी म्हणालो, होय  मी असाच खेळलो होतो.  तुम्ही हि मला या खेळी बाबत टोकले नाही. यात माझी चूक काय. मी हरलो असतो तर तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता का? माझी गुगली त्या काकांना चांगलीच झोंबली. ते रागाने म्हणले, तू बोलण्यात पटाईत आहे. उद्यापासून खेळायला येऊ नको, म्हणत ते ताडताड पाय पटकत निघून गेले. ते गेल्यावर मी काकांना म्हणालो, काका मी खोटे बोललो नाही. काका फक्त हसले. बाकी बहिण-भावंडे जोरात म्हणाली, आम्ही पटाईत कधीच खोटे बोलत नाही. बुद्धिबळ विजेता विवेक पटाईत जिंदाबाद.

Monday, February 25, 2019

प्रजापति ने केला सम्मान विष पिणाऱ्या शंकराचा


रोज कचरा  उचलतो 
त्याची  विल्हेवाट करतो 
धरतीला वाचविण्यासाठी 
रोज हलाहल पितो
शंकर .

अमृत मंथानाच्या वेळी समुद्रातून हलाहल विष बाहेर आले. शंकराने विष प्राशन करून देव, दानव आणि मनुष्य तिन्हींचे रक्षण केले. मोबदल्यात शंकराला काय मिळाले. प्रजापति अर्थात प्रजेचे लालन-पालन करणारा  राजा. त्यावेळी दक्ष हा प्रजापति होता. दक्ष प्रजापतिने यज्ञात सर्वांना बोलविले. जावई असला तरी,  स्मशानभूमीत निवास करणाऱ्या समाजातील निम्न कोटीच्या व्यक्तीला बोलविणे दक्षाला उचित वाटले नाही. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने देहत्याग केला. हि झाली प्राचीन इतिहासातील कथा.

आज हि हजारो शंकर महानगरात, गावांत माणसांनी पसरविलेला  कचरा स्वच्छ करतात.  दिवस-रात्र  कचर्यात काम केल्याने त्यांना अनेक रोगराईला समोर जावे लागते. कधी-कधी रोगराई त्यांचा बळी पण घेते. दुसर्या शब्दांत आजचे सफाई कर्मचारी राष्ट्रातील प्रजेच्या  रक्षणासाठी रोज हलाहल विष पितात. पण हे सर्व करताना मोबदल्यात त्यांना काय मिळते. समाज त्यांना तुच्छ लेखतो. समाजात सर्वात खालचे त्यांचे स्थान. स्वतंत्रता प्राप्ती नंतर त्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे अनेक प्रयत्न झाले. सरकारने शिक्षणाची व्यवस्था केली. नौकरीत आरक्षण दिले. अनेक कायदे बनवून त्यांच्यावर होणारे अत्याचार संपविण्याचे प्रयत्न केले. पण सामाजिक प्रतिष्ठा, ती तर फक्त समाजच  देऊ शकतो. 

स्वामी दयानंद यांनी समाजातील भेद मिटविण्यासाठी आर्यसमाजाची स्थापना केली. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी दलित समाजाला शिक्षणाची प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी संवैधानिक संरक्षण दलित समाजाला दिले. पण सामाजिक प्रतिष्ठा ती तर प्रजापतिच देऊ शकतो.  (राष्ट्राचा राजा किंवा आजच्या भाषेत प्रधानमंत्री). 

रामायण काळात अयोध्येचे राजकुमार श्रीराम वाळीत टाकलेल्या साध्वी अहल्येच्या आश्रमात गेले. तिथे ऋषी गौतमाचे व साध्वी अहल्येचे चरण स्पर्श करून, त्यांचे  आदर-आतिथ्य स्वीकार केले. त्यांच्या सोबत भोजन केले. श्रीरामाने अहल्येला समाजात पुन्हा स्थान मिळवून दिले. (वाल्मिकी रामायण, बालकांड सर्ग ४८-४९). श्रीरामाच्या कार्याची प्रशंसा स्वर्गीय देवतांनी पुष्पवृष्टी करून केली. 

पाय अर्थात चरणांचे स्थान शरीरात सर्वात खाली असते. आपले चरणच  आपल्या संपूर्ण शरीराचे ओझे उचलतात.  चरण नसतील तर माणूस काहीच करू शकत नाही किंवा अत्यंत कठीण आयुष्य त्याला जगावे लागते. चरणांचे महत्व ओळखूणच, ऋषी-मुनी, महापुरुष, विद्वान यांचा सम्मान करण्यासाठी  त्यांची पाद्यपूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा समाजात अस्तित्वात आली.  पण  स्वत: घाणीत राहून समाजाला स्वच्छ व आरोग्यदायी जीवन देणाऱ्या शंकरांचा सम्मान आपण कधी करण्याचा प्रयत्न केला आहे का?  कधीच नाही. पण काल दिनांक २४.२.२०१९ हा दिवस भारतीय इतिहासात निश्चित सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. या दिवशी प्रत्यक्ष देशाच्या राजप्रमुख अर्थात पंतप्रधानांनी सफाई कर्मचार्यांची पाद्यपूजा करून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.  दुसर्या शब्दांत इतिहासात प्रथमच आजच्या प्रजापतिने शंकराचा सम्मान केला. असो.

Saturday, February 16, 2019

पद, पैसा आणि प्रतिष्ठेसोबत विकृती फ्री


१९९०चा काळ मी ग्राहक मंत्रालयात कार्यरत होतो. सहज जाणवलें, ग्राहक हिताच्या बाता करणारे अनेक एनजीओ प्रतिष्ठित व्यक्ती ग्राहक विरोधी कार्य करणारे आहेत. सहज एक अधिकार्याला या बाबत विचारले. तो म्हणाला पटाईत तू अजून बच्चा आहे. सरकारी कर्मचार्याने अनासक्त भावाने कर्म केले पाहिजे, जास्त विचार केला नाही पाहिजे. बाकी हें सर्व प्रतिष्ठित  एम एन सी औद्योगिक संगठनांचे हित पाहणारे आहेत, तिथून मिळणार्या पैश्यांवर यांची अय्याशी चालते. दुर्भाग्य, अश्या लोकांना दरबारी पुरस्कारहि मिळतात. पुढे वरिष्ठतम अधिकार्यांसोबत कार्य करत असताना, अनेक पांढर्या शुभ्र वेषधारी लोकांचा मग ते पत्रकार असो किंवा बुद्धिमंत, काळेकुट्ट स्वरूप समोर आले. असो. 

कुणीतरी म्हंटले आहे, राजनीती आणि वैश्या यांचा चोली दामनचा संबंध असतो. पूर्वी राजे महाराजे गणिकांचा उपयोग आपला स्वार्थ सिध्द करण्यासाठी करायचे. आज आपल्या देशात लोकतंत्र आहे. विभिन्न जातीचें गणित जुळविण्यासाठी, जातीजातीत भेद उत्पन्न करून सत्ता प्राप्त करणे हें राजनेत्यांचे उद्दिष्ट असते. काही तर सत्तेसाठी आतंकवादी, नक्षली आणि जेहादी समूहांचा वापर  वोट बँक तैयार करण्यासाठी करायला हि मागेपुढे पाहत नाही. देश गढ्यात गेला किंवा देशाचे तुकडे झाले आणि देशात अराजकता पसरली तरी चालेल, फक्त सत्ता मिळाली पाहिजें. असे सत्तालोलुप राजनेता आपला स्वार्थसिध्द करण्यासाठी कलाकार, पत्रकार आणि बुद्धीजीवी इत्यादी लोकांचा गणिका समान उपयोग करतात. पत्रकारांचे विदेशी दौरे, कलाकारांना व बुद्धिमंतांना लुटीयन दिल्लीत बंगले, सरकारी कमिटी, संस्थांमध्ये नियुक्ती, एनजीओंना, अनुदान इत्यादी कश्यासाठी असते, हे सांगण्याची गरज नाही.  


योग्यता नसतानाही पद मिळाले, पैसा मिळतो व देशी विदेशी पुरस्कार हि. मनात इच्छा नसतानाही फक्त स्वार्थासाठी, पद, पुरस्कार व प्रतिष्ठेसाठी इतिहासकार विकृत इतिहास सांगतातबुद्धीजीवी, प्रोफेसर, पत्रकार व राजनेता आतंकवादी आणि देशाचे तुकडे करणार्यांचे समर्थन करतात. असत्याचा व देशविरोधी तत्वांचा प्रचार करताना मनात द्वंद्व हे निर्माण होणारच. त्याचा परिणाम विकृतीत होतो. मग विकृती शब्दांद्वारा बाहेर पडते. असो.