Sunday, January 23, 2022

पीएनामा (1): गुटबाजी, शिक्षित आणि अशिक्षित

 (पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस  इत्यादींच्या सोबत कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि कल्पना ही, पीएनामाच्या रूपाने सादरीकारण करण्याचा प्रयत्न) किस्से  सांगण्यासाठी काही  टोपण नावे  सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)  

राजाच्या दरबारात गुटबाजी ही असतेच. रायसीना हिल ही याला अपवाद नाही. इथेही मुख्यत: विंध्यांचल पारवाल्या भाषाई जातभाईंचे अनेक शक्तीशाली गुट होते. प्रत्येक गुट त्याची शक्ति वाढविण्यासाठी, इतरांना दरबारातून हाकलून देण्याचे षड्यंत्र रचतच राहायचे. मग त्यांची पोस्टिंग सेक्शनमध्ये असो की अधिकार्‍यांसोबत. एकाच ठिकाणी दोन जातभाई एकत्र आले की त्यांची शक्ति एक और एक ग्यारह होते.  बिहारी, पंजाबी कर्मचार्‍यांचे ही गुट त्यांची शक्ति वाढविण्यात व्यस्त होते. राहीले मराठी माणूस, माझ्या सीएसएसएस केडरमध्ये 18 वर्षांत माझ्याशिवाय कदाचित  एखाद आला असेल. बाकी केडरमध्ये आले (आयएएस सोडून) पण अधिकान्श इथल्या राजनीतीला कंटाळून वर्षाच्या आताच पलायन करायचे. बहुतेक हेच कारण असावे,  श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर  दोन वर्षांच्या आत 7 वर्ष जुन्या सर्व कर्मचार्‍यांची बदली केली आणि गुटबाजीचे अस्तित्व नष्ट करण्याचा सार्थक प्रयत्न केला. अर्थात माझीही बदली झालीच. असो.

त्यावेळी मी दरबारात एका वरिष्ठ आयएएस अधिकार्‍याचा पीएस होतो. अधिकारी अत्यंत हुशार आणि इमानदार होता. महत्वपूर्ण विभागांचे कार्यभार त्याच्या जवळ होते. सकाळी 9 वाजता काम सुरू करायचा आणि पूर्ण झाल्याशिवाय घरी जात नव्हता. या अधिकार्‍याने तीन वर्षांत एकदाही स्टाफला पर्सनल काम सांगितले नाही, हे विशेष. पण मुखातून निघणारी तू तडाक भाषेसाठी तो कुख्यात होता. फक्त याच कारणामुळे तीन वर्षांच्या अवधीत व्यक्तिगत स्टाफच्या, मला सोडून, अर्धा डझनहून जास्त कर्मचार्‍यांनी बदली करून घेतली. डीओ आणि एमटीएस बदलल्या गेले. तोंडाने कितीही तिखट असला तरी अधिकार्‍याने कुणाचीही सीआर खराब केली नाही. साहेबांना गुटबाजीचा अत्यंत तिटकारा होता. माझ्या विषयी म्हणाल तर 'मी अत्यंत शांत डोक्याचा आहे, जसे पालथ्या घड्यावर पाणी टाकण्याचा काही परिणाम होत नाही, तसेच माझ्या माझ्यावर ही होत नाही', असे माझ्या सहयोगी बांधवांचे मत होते. 

साहेबांच्या अधीन एक सेक्शन होते. तिथे दहा एएसओआणि दोन एमटीएस होते. सेक्शनमध्ये कार्यरत अधिकान्श  एएसओ यूपीएससी परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले होते. उच्च शिक्षित होते. एएसओ म्हणजे भारत सरकारची "रीढ़ की हड्डी". असाच एक उच्च शिक्षित सुनील (आयटी, बीटेक आणि एमबीए इत्यादि) त्या सेक्शनमध्ये एएसओ होता. केंद्र सरकारात एएसओला चांगला पगार असतो (आजच्या घटकेला पहिल्याच वर्षी महिना 80 हजारहून जास्त मिळतात). सुनील विंध्य पारवाला होता. त्यावेळी एका अधिकार्‍याची बदली झाली होती. तिथे त्याच्या एक जातभाई एमटीएस होता. सुनील ने  विचार केला असावा, याची बदली त्याच्या सेक्शनमध्ये झाली की 'एक और एक ग्यारह" होणार. इतरांवर नजर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 

त्यादिवशी सकाळी नऊ वाजता साहेबांकडून दिवसभर होणार्‍या मीटिंग, आवश्यक कार्य इत्यादि बाबत निर्देश घेत होतो. सुनील आत आला. त्याने एका आवश्यक फाइलवर चर्चा केली आणि मुख्य विषयावर आला. आंगल भाषेत तो म्हणाला 'सर, बदली झालेल्या त्या अधिकार्‍याच्या स्टाफ मध्ये सुशील नावाचा एमटीएस आहे. तो ग्रॅजुएट आहे. त्याला इंग्लिश आणि हिन्दी दोन्ही भाषा उत्तम येतात. त्याची बदली आपल्या सेक्शनमध्ये झाली तर उत्तम होईल. साहेब अत्यंत मृदु आवाजात त्याला म्हणाले, उत्तम आहे, पण त्यासाठी आपल्या सेक्शनमध्यल्या दोन एमटीएस पैकी एकाची बदली करावी लागेल. 'सर, तो श्यामसुंदर इललिटरेट आहे, त्याला इंग्लिश मुळीच कळत नाही'. आता साहेबांचे कान उभे झाले. साहेबांनी मला विचारले, पीएस साहेब, ज्यावेळी श्यामसुंदर नौकरी पर लागला त्यावेळी एमटीएसच्या नियुक्तीचा आधार काय होता. मी म्हणालो, सर, ज्यावेळी श्यामसुंदर नौकरी पर लागला असेल त्यावेळी रोजगार कार्यालयातून किंवा कुणाच्या कृपेने त्याची नौकरी इथे लागली असेल. कुठूनतरी त्याने आठवी पासचे प्रमाणपत्र ही पैदा केले असेलच. साहेब सुनील कडे पाहत म्हणाले, तो श्यामसुंदर आठवी पास है. जास्त शिक्षित लोकांची डोक्याची ट्यूब लाइट लवकर पेटत नाही, हा माझा अनुभव आहे. सुनीलचीही पेटली नाही. सुनीलला साहेबांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. तो म्हणाला "सर, सुशील जास्त एज्युकेटेड आहे, आपल्या जवळ या घटकेला मौका आहे, तो आल्याने सेक्शन मधल्या सर्वांना फायदा होईल".  साहेबांनी मला विचारले,  पीएस साहेब जरा सांगा, सेक्शन मध्ये काम करणारे लिटरेट आहेत की एज्युकेटेड हे कसे कळेल. साहेबांच्या सोबत काम करताना दोन वर्षे उलटून गेली होती. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, हे कळू लागले होते. मी म्हणालो, ज्याला भारत सरकारची प्रशासकीय नियमावली पाठ आहे तो लिटरेट आणि ज्याला त्या नियमांनुसार कार्य कसे करायचे हे माहीत आहे तो एज्युकेटेड. सुनीलकडे पाहत साहेब म्हणाले, काही कळले का? आता दूसरा कुणी असता तर, मान डोलावून, चुपचाप  साहेबांच्या चेंबरमधून बाहेर गेला असता. पण षड्यंत्र करताना बुद्धी नष्ट होतेच, तो म्हणाला, 'सर, मी तर सेक्शनच्या भल्याचा विचार करत होतो'. आता मात्र साहेबांचे डोके भडकले, ते सुनीलवर हिंदीतच ओरडले,  मी मूर्ख आहे का? अडाणी, गंवार, जाहिल माणसा तुला इथे पैदा होऊन दोन दिवस झाले आणि तू गुटबाजी करतो आहे. माझ्या जागी दूसरा अधिकारी असता तर तुझ्या xxxवर लाथ मारून तुला इथून फेकले असते. पहिली वेळ आहे, म्हणून तुला माफ करतो. पुन्हा असे केले तर तुला इथे कुणी वाचविणार नाही. साहेब एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी सेक्शनमध्ये फोन केला. सेक्शन ऑफिसरला विचारले, तुम्हाला श्यामसुंदर पासून काही समस्या आहे का? कुणी त्याची तुम्हाला तक्रार केली का? अर्थातच उत्तर नाही मध्ये आले. साहेब सेक्शन ऑफिसरला म्हणाले, तुमच्या सेक्शनचा एक अडाणी माणूस इथे बसला आहे, त्याचे जरा कान उपटून त्याला सरकारी नियम आणि काम करण्याची पद्धत समजावून सांगा. 

सुनीलच्या हातून चूक झालीच होती. जे कार्य सेक्शन ऑफिसरचे होते ते तो करु पहात होता. गुटबाजीच्या नादात ऑफिस प्रोसीजर विसरून गेला होता. त्याला वाटले असेल साहेब खुश होतील. पण आयएएस अधिकारी मूर्ख नसतात. सुनीलने विषय काढताच, त्याचा हेतु अधिकार्‍याला समजला होता. साहेबांचे बोलणे सुनीलच्या जिव्हारी लागले होते. सेक्शन ऑफिसरने ही त्याला भरपूर सुनावले. बहुतेक पहिल्यांदाच अश्या शिव्या पडल्या होत्या. नौकरी सोडण्याचा विचार ही त्याच्या मनात आला. पण शेवटी पोटाचा प्रश्न हा असतोच. त्यादिवशी मला ही समजले पुस्तकी ज्ञानाने माणूस साक्षर होतो, पण शिक्षित होत नाही. नियम आणि मर्यादांचे पालन करत जगात कसे वागायचे हे ज्याला कळते तोच शिक्षित.  


Monday, January 3, 2022

जगण्याची कला

 तासंतास एकाच ठिकाणी 

कला  उभे राहण्याची 

आत्मसात केली  बगळ्यांनी 

फक्त जगण्यासाठी.


 कला, कौशल्य, संयम 

पुरुषर्थाची पराकाष्ठा 

आत्मसात केल्या विना 

जगू शकत नाही कुणीच 

बगुळा असो की माणूस.