Friday, December 24, 2021

मन


काही करायला जातो 

तेथे तू आडवा येतो.

शंका-कुशंकांचे  

जाळे विणून येतो. 


कुणावर विश्वास 

ठेवायचे म्हणतो.

दगाबाजीचे किस्से 

तू मला सांगतो.


मित्र-आप्त सार्‍यांना 

तू दूर-दूर केले. 

एकांती तुझ्या सोबती 

वैराण आयुष्य माझे.


करू नको आता 

काळजी तू माझी. 

खंजिरांच्या जखमा 

सहण्याची शक्ति दे.


मोकळ्या आकाशात 

श्वास मला घेऊ दे . 

आनंदानी जगण्याचा 

मार्ग मला शोधू दे. 







Wednesday, December 15, 2021

कुसंगतीत नासला बटाटा

बटाटा हा सर्वांनाच आवडतो. सर्व भाज्यांमधे हा सहज मिसळतो. सकाळच्या नाश्ता ते रात्रीच्या जेवणात बटाटा हा असतोच. छोट्या बच्यांची प्रिय भाजी बटाटाच असते. बटाटा हा तसा गुणांची खाण आहे. कार्ब., प्रोटीन, विटामिन अबस ते एंटीओक्सीडेंट, लौह समेत अनेक खनिज आणि पोषक तत्व यात आहे. बटाटा हे पूर्ण भोजन आहे हे म्हंटले तरी वागवे नाही. बटाटा खाल्याने पचन विकार दूर होतात, हृदय विकारात ही लाभ होतो, बटाटा रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो इत्यादि इत्यादि. ह्याशिवाय सुंदरींचे सौंदर्य वाढविण्याचे कार्य ही बटाटा करतो.  बटाट्याचा लेप तोंडावर तोंडावर फासल्याने त्वचेचा रंग उजळतो. चेहर्‍यावरचे डाग पिंपल्स, पुरळ इत्यादि नाहीसे होतात. दाद, दाग खुलजी का शर्तिया इलाज हा बटाटाच. एवढे गुण असूनही डॉक्टर- वैद्य रुग्णांना बटाट्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण काय असेल. 

बटाट्याला मित्र जोडण्याची भारी हौस आहे. आता पहा कडू कारले कुणालाही आवडत नाही. पण कडू पाणी आवडते. पण ते किती मात्रेत घ्यायचे हे अनेकांना कळत नाही. मग त्यांचा तळीराम होतो. आयुष्य वाया जाते. बटाट्याचे ही तसेच झाले. तेलासोबत बटाट्याची मैत्री म्हणजे कुसंगत. ह्या तेलाने बटाट्याला स्वाद दिला पण त्याला नासवले, बदनाम केले. आज सर्वत्र तेलात तळलेले अंकल चिप्स छोटे बच्चे खाताना दिसतात. स्वादिष्ट भरपूर तेलात तळलेली आलू की टिक्की ही मलाही प्रिय आहे. तळलेल्या बटाट्याची चाट तर स्त्री-पुरुष सर्वांनाच आवडते.  दिल्लीत  लग्नात ह्या दोन्ही असतातच. याशिवाय अधिकान्श हॉटेलात बटाटे फ्राय करूनच भाजी केली जाते. मध्यम आणि श्रीमंतांचे बर्गर, फ्रेंच फ्राईस असो की गरिबांचा वडा पाव, तळीव बटाटा हा असतोच.  बिहार मध्ये एक म्हण होती जब तक रहेगा समोसे मे आलू .... ही म्हण पूर्णपणे सत्यात उतरली नाही, तरीही समोस्यांची महिमा सांगतेच. मंत्रालयांच्या केंटीन मध्ये उकळलेले बटाटे नेहमीच असतात. समोसा, कटलेट, ब्रेड पकोडा सर्वांचा एकच बटाटा मसाला असतो. तळीव बटाटे जिभेचा स्वाद वाढवितात पण शरीरसाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे डॉक्टर-वैद्य बटाट्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. 

बटाट्या वरून आठवले, दिल्लीच्या पराठा वाली गल्लीत पराठा चक्क तेलात तळतात. देशाच्या काण्या कोपर्‍यातून तिथे पराठा खायला लोक येतात. जुन्या दिल्लीत राहत होतो, तेंव्हा दरवर्षी किमान एकदा तरी पराठा खायला तिथे जात असू. त्यावेळी वीस-पंचविस दुकाने पराठ्याची होती. आज फक्त पाच-सहा उरली आहे. गेल्या वर्षी उत्तराखंड फिरतीवर असताना. एका छोट्या हॉटेल मध्ये सकाळचा नाश्ता केला. पराठ्याची कृती तिथे प्रत्यक्ष बघितली. शेफने (दुकानाचा मालक), बटाटे कुसकरताना, त्यात मसाल्या सोबत कसूरी मेथी, कोथिंबीर, ओवा इत्यादि ही घातले. तव्यावर पराठा शेकताना तेलाचा वापर केला नाही. नंतर वाढताना सोबत  वाटीत  लोणी आणि दही. हा पराठा ही तेवढाच स्वादिष्ट होता आणि पोष्टिक ही.

उपवासाच्या दिवशी सौ. घोटलेल्या दहयात उकडलेला बटाटा कापून टाकून रायता नेहमीच बनविते. चाट बनविताना तळीव बटाट्यांच्या जागी उकडलेले किंवा जमल्यास भाजलेले बटाटे ही वापरले जाऊ शकतात. एकदा राखेत भाजलेल्या बटाट्याची चाट खाल्ली होती. तीही स्वादिष्ट होती. उकडलेला बटाटा, कांदे, टमाटो आणि पनीर टाकून कमी तेलाचा वापलर करून बनविलेले सँडविच ही स्वादिष्ट लागते. सारांश बटाट्याने तेलाचा नाद सोडला तर हा आरोग्यासाठी उत्तम आहे. 

बाकी माझी आवडती बटाटे भजी.😀😀😀


Saturday, December 11, 2021

वॉशिंग मशीन आणि लिपिस्टिक

 (एका फेसबुकी चरित्रापासून मिळालेली प्रेरणा)


आमची छोटीसी फॅमिली. मी, माझा नवरा आणि  एकुलता एक मुलगा, तो ही शिक्षणासाठी घरापासून दूर.  घरात आम्ही दोघेच. एक दिवस नवरोबा वॉशिंग मशीन घेऊन आले. मी विचारले, ही कशासाठी. नवरोबा उतरले, धोब्याचा खर्च वाचेल आणि तुलाही जास्त कष्ट करावे लागणार नाही. मी मनात म्हंटले, अरे, खरे बोल की, मला कामावर जुंपण्यासाठीच ही मशीन तू घरी आणली आहे. माझे सुख-चैन पाहवत नाही तुला. 

मी पण काही कमी नाही, हातात आलेला असा मौका मी सोडणार थोडीच. नवर्‍याला चांगली अद्दल घडायचे ठरविले. मग काय, मी खरीदरी सुरू केली. नवरोबाला खुश करण्यासाठी काही नवे कपडे त्याच्यासाठी विकत घेतले आणि  नव्या-नव्या फॅशनचे भरपूर कपडे, मी स्वत:साठी घेतले, फक्त मशीन मध्ये  धुवण्यासाठीच. माझ्या चेहरा आणि कपड्यांना शोभून दिसतील अश्या पर्सेस, सेण्डील्स, लिपिस्टिक इत्यादिही मला घ्याव्याच लागल्या.  

आता ओठांना लावलेल्या लिपिस्टिकचे डाग कपड्यांना लागणार हे साहजिकच आहे. वॉशिंग मशीन मध्ये हे डाग निघाले नाही. नवरोबा माझ्यावर भडकले आणि म्हणाले तू पूर्वीसारखे धोब्यालाच कपडे धुवण्यासाठी देत जा. मला हेच तर पाहिजे होते. नवरोजीला वॉशिंग मशीन भलतीच महागात पडली. ओठांना लावलेली  लिपिस्टिक मी का पुसत नव्हती. हे मात्र नवरोबाला  कधीच कळले नाही.

  


Saturday, December 4, 2021

कविता: पापांची गाथा

 पांढर्‍या वस्त्रांत

लपविले  पाप

आयुष्यभराचे.


झाले शरीर

अग्नीत स्वाहा

संपला हिशोब 

इथला सारा. 


तरीही उरली 

मगरींच्या अश्रुंत  

पापांची गाथा. 

 




Friday, December 3, 2021

क्षणिका: उंदीर बंदी पिंजर्‍यात

  

चन्दनाच्या झाडाला 

सुगंध विखारी नागाचा.

पाहुनी पोळी सुगंधित 

उंदीर बंदी  पिंजर्‍यात.




 





 






Saturday, November 27, 2021

स्वप्न : दोन कविता

 (1)

पहाटेच्या कोवळ्या उन्हात 
पाहिले  एक स्वप्न.

दुपारच्या कडक उन्हात  ​
होरपळे एक स्वप्न. 

रात्रीच्या अंधारात 
हरवले एक स्वप्न.

(2) 

पहाटेच्या सोनेरी  उन्हात 

पाहिले एक स्वप्न.

दुपारच्या कडक उन्हात 
चुकविले घामाचे मोल. 

शरदाच्या चांदणीत
फुलविले सोनेरी स्वप्न.  


Thursday, November 18, 2021

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

माणसाचे शरीर पंच तत्व -  माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन)  पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे.  आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे  या पद्धती सामान्य जनतेपासून  दूर गेल्या. 

आधुनिक काळात भारतात प्राकृतिक चिकित्सा प्रचलित करण्यात  महात्मा गांधी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. एडोल्फ जूस्टची पुस्तक रिटर्न टु नेचर या पुस्तकाने महात्मा गांधींना प्रभावित केले. त्यांनी  18 नोव्हेंबर 1945 मध्ये 'ऑल इंडिया नेचर क्योर फाउंडेशन ट्रस्ट' स्थापना केली. आज या जागेत आयुष मंत्रालयच्या अंतर्गत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आहे. आयुष मंत्रालयाने 2018 मध्ये 18 नोव्हेंबर हा दिवस प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून घोषित केला. आज अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्रात  औषधांचा वापर न करता, माती, पाणी, ऊन, वाष्प, योग, आहार नियंत्रण इत्यादि द्वारा रुग्णांचा  उपचार केल्या जातो. आयुर्वेदातील पंचकर्म, षटकर्म चिकित्सा ही दिली जाते. भारतातील विद्यमान अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्र सामाजिक संस्थांद्वारे चालविले जातात. स्वस्त असूनही ही चिकित्सा पद्धतील लोक मान्यता मिळाली नाही. लोकांचा विश्वास या पद्धतीवर बसत नव्हता. मुख्य कारण, आधुनिक मापदंडवर प्रमाणिकता सिद्ध करण्यासाठी अनुसंधानवर खर्च करणे या संस्थांच्या आवाक्या बाहेर आहे. याशिवाय सरकारची भारतीय चिकित्सा पद्धतींबाबत अनास्था. आयुष मंत्रालयाची स्थापनाच 2014 मध्ये झाली. अल्प बजेट असले तरी थोडे फार अनुसंधान कार्य ही मंत्रालयाने  सुरू झाले आहे. भविष्यात बजेट ही वाढेल आणि परिणाम ही उत्तम मिळतील ही अपेक्षा. 

करोना काळात आमच्यापाशी औषध नाही. तरीही प्रोटोकॉलानुसार  एलोपैथीची रेमडेसिवीर, हायड्रोक्लोरोक्वीन , फेबुफ्लू इत्यादि कोरोंना विषाणू विरुद्ध निरर्थक औषधी दिल्या गेल्या.  परिणाम हजारो डॉक्टर सहित लाखो रुग्ण दगावले. करोना आणि औषधींचे साईड इफेक्ट ही  मुख्य कारणे.  दुसरीकडे  प्रकृति प्रदत्त  गिलोय, अश्वगंधा  इत्यादि  औषधी प्रभावी ठरल्या. परिणाम, दिल्लीचेच बघा प्रोटोकॉल मध्ये नसतानाही दिल्लीचे अधिकान्श हॉस्पिटल रुग्णांना काढा देऊ लागले.  का? याचे उत्तर मला एक ही डॉक्टर देऊ शकला नाही. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये कार्य करणारे अधिकान्श कर्मचारी स्वतचा प्राण वाचविण्यासाटी  ज्याला आयएमए शिव्या देते त्या रामदेवचे कोरोनील घेऊ लागले. सकाळी उठून योग आणि प्राणायाम करू लागले. अधिकान्श करोना रुग्णांनी एलोपैथी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली, हे सत्य मेडिकल माफियाला पचणे कठीणच. अर्थात खर्‍या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोण असणार्‍या डॉक्टरांनी कधीच प्रामाणिक आयुर्वेदिक औषधींचा करोना काळात विरोध केला नाही. 

पतंजलिने योग आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सेवर अनुसंधानासाठी पतंजलि रिसर्च फाउंडेशन आणि पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूटची स्थापना केली आहे.  करोना काळात रिसर्च आधारित अत्यंत स्वस्त औषधी देऊन भारतात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले. पतंजलिने जगातील सर्वात मोठे प्राकृतिक चिकित्सा केंद्र योगग्रॉमची स्थापना 2009 मध्ये केली होती जिथे  400  निवासी रुग्ण एका वेळी निवासी  प्राकृतिक  चिकित्सा घेऊ शकत होते. पण 2020 एप्रिल पासून ही  क्षमता नवे निर्माण करून अल्पावधीत 1000 पर्यन्त वाढवावी लागली. सीजीएचएस ने ही सरकारी कर्मचार्‍यांसाठी  एप्रिल 2021 पासून काही आयुर्वेदिक आणि प्राकृतिक चिकित्सा केंद्रांना पंचकर्म, षटकर्म सहित प्राकृतिक चिकित्सेसाठी अनुमति दिली. आज अनेक प्राकृतिक चिकित्सा केंद्र ही आपले विज्ञापन, फेसबूक वर का होईना, देऊ लागले आहे. करोना काळात लोकांचे डोळे उघडले. अधिकान्श रोगांत  प्राकृतिक उपायच अधिक कारगर आहे, हे कळले.   निसर्ग प्रदत्त चिकित्सेचे भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. प्राकृतिक चिकित्सा दिवसाची सर्वांना शुभेच्छा.



Tuesday, October 12, 2021

राजकुमारी आणि दर्पण

 

एक राजकुमारी होती. आता राजकुमारी म्हंटले म्हणजे दिसायला ती सुंदर असणारच. हसताना तिची दंतपंक्ती दिसायची. तिचे  पांढरे शुभ्र  दात हिर्‍यासारखे  चमकदार आणि टणक  होते. (मोतीसारखे दात ही जुनी म्हण झाली. एकतर मोती हे अत्यंत नाजुक असतात आणि काही काळाने ते मलिन ही होतात). राजकुमारीला नटण्या-मुरडण्याची भारी हौस होती. तिचा वार्डरोब जगभरातील भारी ऊंची कपड्यांनी भरलेला होता. सलवार-कमीज, लहंगा, जीन, जर्सी, कोट-पेंट इत्यादी-इत्यादि. साड्यांचे तर विचारू नका, बनारसी ते मराठी मोळी नववारी पर्यन्त नाना रंगांच्या शेकडो होत्या. 

राजकुमारीच्या महालात एक मोठा दर्पण होता. हा बोलणारा दर्पण होता. राजकुमारी रोज सकाळी नवीन वस्त्र धरण करून, नटून-थटून दर्पणा समोर उभी राहायची आणि दर्पणला विचाराची, "सांग दर्पणा कशी मी दिसते"? दर्पण ही आनंदाने उत्तर द्यायचा, 'सुंदर, सुंदर, सुंदर'.  दर्पणाचे उत्तर ऐकून राजकुमारी प्रसन्न व्हायची. आपली सेल्फी काढून ती सोशल मीडियावर टाकायची. तिचे सोशल मीडियावरचे फोटू पाहून कित्येकांचे कलीजे रोज खल्लास होत असतील हे देवच जाणे. असो. 

एक दिवस सकाळी ती नववारी नेसून दर्पणा समोर उभी राहिली. तिच्या मनात विचार आला, रोज आपण आपली सेल्फी टाकतो. आज दर्पणात दिसणार्‍या आपल्याच प्रतिमेसोबत घेतलेली सेल्फी टाकू. तिने आपल्याच प्रतिमेसोबत सेल्फी घेतली आणि रोजच्या सारखे दर्पणला विचारले, 'सांग दर्पणा मी जास्त सुंदर दिसते की माझी प्रतिमा'. राजकुमारीचा प्रश्न ऐकून दर्पण बुचकळ्यात पडला. दर्पण काही राजनेता नव्हता, जे अश्या प्रश्नांचे डिप्लोमेटिक उत्तर देण्यात तरबेज असतात. दर्पणाला तर खरे बोलण्याची सवय होती. तो म्हणाला, 'राजकुमारी तुझी प्रतिमा तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते'

अस होSSSय...

"आपलीच प्रतिमा झाली आपलीच वैरी..."

दुसर्‍या दिवशी सफाईवाल्याला कचर्‍याच्या ढिगात काही काचेचे तुकडे दिसले. 


Wednesday, September 22, 2021

भगवद्गीता : मध्यस्थ लक्षण


उद्योग, व्यापार, नौकरी, परिवार जिथेहि द्विपक्षीय व्यवहार आहे, तिथे विवाद होण्याची संभावना सदैव असतेच.  परस्पर  विवाद जर न्यायालयात गेले तर दोन्ही पक्षांत कटुता येते. पुन्हा व्यवहार करणे कठीण जाते. याशिवाय वेळहि भरपूर लागतो. अश्यावेळी मध्यस्थाच्या मदतीने विवादाचे दोन्ही पक्षांना मान्य असे समाधान काढले जाते.  दोन्ही पक्षांचा ज्या व्यक्ती/ संस्थेवर विश्वास असतो तो मध्यस्थाचे कार्य करतो. जुन्या दिल्लीत अनेक व्यक्ती पिढीजात मध्यस्थाचे कार्य करणारे आहेत. त्यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य असतो.  

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या ९व्या श्लोकात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीचे लक्षण दिलेले आहे.   

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥

मध्यस्थ हा सहृदय अर्थात कोमल मनाचा, दुसर्यांचे सुख-दुख ज्याला कळते असा असतो. मध्यस्थ  नेहमी उदासीन अर्थात तटस्थ राहतो. बंधू-बांधव, मित्र-शत्रू, धर्मात्मा आणि दुराचारी इत्यादी प्रति मध्यस्थाची बुद्धी सम असते. अर्थात तो कुणाचाही पक्ष घेत नाही निष्पक्ष राहून निर्णय देतो. मध्यस्थ कुठल्याही उपकारची इच्छा न ठेवता दोन्ही पक्षांचे भले चिंतणारा असतो.  
 
  


Tuesday, September 7, 2021

श्रीमद् भगवद् गीता: यज्ञ आणि कृषी


श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला श्रीमद् भगवद् गीतेचा उपदेश दिला होता. हा उपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हे तर सर्वांसाठी होता. श्रीकृष्णाने गीतेत  या मृत्यू  लोकात  कर्म  करत कसे जगावे, याचे मार्गदर्शन केले आहे. गीतेत यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. जगाचा व्यापार सुचार रूपेण सुरु राहण्यासाठी, केलेले कर्म  यज्ञ आहे.  कृषी कर्महि यज्ञ आहे. यज्ञाने प्रसन्न होऊन भूमाता शेतकर्याला भरपूर अन्न प्रदान करते. काही महिन्यांपूर्वी पंजाबात कैन्सर वाढण्याचे कारण या विषयावर एक लेख वाचला होता. त्यात रासायनिक शेतीहि एक मुख्य कारण दिले होते. पंजाबच्या प्रसिद्ध कैन्सर रेलचे उदाहरणहि दिले होते. भगवद् गीता वाचताना तिसर्या अध्यायातील १२व्या श्लोकाने माझे लक्ष वेधले आणि तो लेख आठवला,  श्रीकृष्ण म्हणतात:  

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥ ३.१२ 

यज्ञाने प्रसन्न होऊन देवता तुम्हाला इच्छित भोग  प्रदान करतात. पण देवांनी प्रदान केलेल्या भोगांत त्यांच्या हिस्सा न देणे हि  चोरी आहे.  

मनात प्रश्न येणारच शेतकरी भूमातेला काय परत करू शकतो. ती आपल्या सारखी जेवत नाही, अन्नातला तिचा हिस्सा तिला कसा देता येईल. उत्तर सौपे आहे,  अन्नापासून निर्मित मनुष्य आणि जनावरांची विष्ठा खताच्या रूपाने भूमातेला परत करता येते. तसेच शेतीसाठी वापरलेले पाणीही पुन्हा तलाव इत्यादी माध्यमाने तिला परत करता येते. प्रत्येक व्यवहार हा द्विपक्षीय असतो. एक पक्षीय व्यवहार म्हणजे चोरी. आपण पाहतोच आहे, शेतकरी पराली पुन्हा जमिनीला परत करण्याएवजी जाळून टाकतात, कारण शेत पुन्हा लवकर तैयार करायचे असते. अन्न निर्मित शेणखत आणि विष्ठा जमिनीला परत मिळत नाही. अधिक अन्नासाठी शेतकरी विषाक्त  रासायनिक खतांचा वापर करतात, पण हि  खते धरती माता प्रदत्त अन्न  नाही.  

देवांचा न्याय कठोर असतो, चोरांना क्षमा नाही. दरवर्षी अप्रिल, मई आणि ऑक्टोबर महिन्यात पंजाब हरियाणा सहित दिल्लीकरांचाहि भयंकर प्रदूषणमुळे दम घुटू लागतो. रासायनिक शेतीमुळे आज पंजाबच्या अधिकांश भागात जमिनीतले पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. पुढील काही वर्षांत बहुतेक आंघोळीलायकहि राहणार नाही. कुपित धरती विषाक्त अन्न प्रदान करू लागली आहे. दरवर्षी फक्त पंजाबात हजारो लोक कैन्सरग्रस्त होऊन मरतात. विषाक्त अन्न खाऊनहि कोट्यावधी लोक विभिन्न असाध्य  रोगांनी ग्रस्त होत आहे. भारतात  कैन्सर ने मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी  तीव्र गतीने वाढत आहे.  असो. तात्पर्य एवढेच किमान कृषी विशेषज्ञांनी श्रीमद् भगवद् गीता वाचली पाहिजे. कर्म सिद्धांत समजला पाहिजे. 



Monday, August 23, 2021

दारुण अंत : राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपाल आणि दानिश सिद्दिकी

मंत्री रतिपाल आणि दानिश दोघांचा दारुण अंत झाला. दोघांची कथाही एक सारखी. पहिली कथा आहे रणथम्बौरचे राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपालची. दिल्ली सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने रणथम्बौर वर आक्रमण केले. अनेक महीने झाले तरी रणथम्बौर दुर्ग शरण आला नाही. अल्लाउद्दीनच्या सेनेत रसदची टंचाई जाणवू लागली. त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला. जर आपली अशी परिस्थिति आहे तर दुर्गात परिस्थिति यापेक्षा ही बिकट असेल. काफिर चंद चांदीच्या तुकड्यांसाठी देशाची गद्दारी करतात. हीच योग्य वेळ आहे, आपण दगाबाज काफिरांचा वापर करू शकतो. अल्लाउद्दीनचे गुप्तचर कामावर लागले. त्यांनी मंत्री रतिपालला  बूंदीची   लालच देऊन फोडले. मंत्री रतिपालाने दुर्गाच्या एका भागाची रक्षा करणार्‍या सेनापति रणमलला (काहींच्या मते हाही मंत्री होता) आपल्या षडयंत्रात शामिल केले. अल्लाउद्दीनचे सैन्य रणथम्बौर दुर्गात शिरले. महाराणी रंगादेवी, पौत्री देवल देवी सहित 12000 राजपूत स्त्रियांनी जौहर केले. पुरुषांनी केसरिया करून आपल्या प्राणांची आहुति दिली. अल्लाउद्दीनने  मंत्री  रतिपाल आणि रणमलचे डोके हतीच्या पायाखाली चिरडन्याचा आदेश दिला. अल्लाउद्दीन त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या राजाचे आणि राज्याचे झाले नाही तर आमचे काय होणार. तुमच्यासारख्या फितुरांसाठी हेच इनाम उचित आहे. 

दानिश सिद्दिकीचे म्हणाल विदेशात भारताविरुद्ध दुष्प्रचार करण्यासाठी विदेशी मालकांचा चाकर झाला. स्मशानात जळणार्‍या चित्ता म्हणजे करोनाने मेलेल्या लोकांचे फोटो, असा विदेशी मालकांना रुचणारा प्रचार. कश्मीर मध्ये 370 धारेचा गैर वापर करून जिहाद्यांनी  हजारो निर्दोष नागरिकांची हत्या केली. लाखो हिंदूंना घाटीतून पळवून लावले. रोशनी अक्टच्या तहत हजारो लोकांच्या घरदारावर कब्जा केला. जम्मू आणि लद्दाखच्या नागरिकांना गुलाम बनवून ठेवले होते. धारा 370 गेली. लद्दाख आणि जम्मूच्या नागरिकांना खर्‍या अर्थाने स्वतंत्रता मिळाली. काश्मिरी हिंदूंच्या मनात मायदेशी परतण्याची आशा बलवती झाली.  दानिश खरच फॉटोग्राफर असता तर लद्दाखच्या जनतेची प्रसन्नता दाखवू शकत होता. काश्मिरी हिंदूंचे आनंदाश्रू दाखवू शकत होता. पण भारत विरोधी विदेशी मालिकांना जे पाहिजे होते त्यासाठी दिहाडीवर दगड फेकणारे म्हणजे काश्मीरची जनता असे फोटो काढले. साहजिकच आहे त्याला बक्षिसी मिळाली. दानिश अफगाणिस्तानात गेला. बहुतेक तालिबानची विजय यात्रा कवर करायची असेल. पण त्याचे दुर्भाग्य तालिबानने त्याला पकडले. दानिश  पत्रकार होता हे माहीत असूनही तालिबानने त्याला  गोळीने उडविले. त्याचे डोके जीप खाली चिरडले अशी वाच्यता आहे. मला त्यात काहीच आश्चर्य वाटले नाही. चांदीच्या तुकड्यांसाठी गद्दारी करणार्‍यांना हेच बक्षीस मिळते. 


Tuesday, August 17, 2021

प्रतीक्षा

 

 शेवटची गाडीहि 

  निघून गेली 

तिच्या प्रतीक्षेत. 


उरला फक्त 

कोमजलेल्या 

फुलांचा सुगंध.

  






 



 

 

 




Monday, August 9, 2021

काही क्षणिका ९.८.२०२१

 

(१)

पिंपळाने सोडले 

गावाच्या पाऱ्याला. 

फ्लैट मध्ये आला 

मनी प्लांट झाला. 

(२)

वाळूचे मनोरे 

वार्यात उडाले.

भग्न स्वप्नाची

अधुरी कहाणी. 

(३)

कल्पनेला मिळेना 

  साथ सार्थ  शब्दांची.

कोरीच राहिली 

वही कवितेची.

 


 


 







Monday, August 2, 2021

ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते


आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। 

पितरंच प्रयन्त्स्व:॥

ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य 

(ऋ. १०/१८९/१)

अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची चहूबाजूंनी परिक्रमा करते. 

ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच. 

गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण: 

वरील  ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे.

पहिली  देवता सार्पराज्ञी  आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेली अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत. (अर्थात हा माझा निष्कर्ष).  

दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची चहूबाजूंनी परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला.  


टीप: ऋचेचा अर्थ वेद पोर्टल वरून घेतलेला आहे आणि आचार्य बालकृष्णच्या "वेदों शिक्षाएँ" या पुस्तकातून  पुन्हा तपासून पाहिला. 


.   

Saturday, July 24, 2021

यजुर्वेद : राष्ट्र उन्नतीचा मार्ग

 

आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌ आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति व्याधी महारथो जायताम्‌ दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः परंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌ योगक्षेमो नः कल्पताम्. (युजुर्वेद २२/२२) (ऋषी: प्रजापति: देवता - लिंगोक्ता)


राष्ट्राच्या उन्नतीसाठी काय आवश्यक आहे, हे या मंत्रात सांगितले आहे. 


१. उत्तम  शिक्षण व्यवस्था 


आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌ : ऋषी प्रार्थना करतो राष्ट्राच्या उन्नती साठी ब्र्म्हतेज युक्त ब्राम्हण अर्थात उत्तम कोटीचे शिक्षित  विद्वान  देशात उत्पन्न झाले पाहिजे.   

 

पूर्वी देशात शेकडो मोठे गुरुकुल होते आणि प्रत्येक गावातहि प्राथमिक शिक्षण देणारे लाखो गुरुकुल होते. चार-पाच वर्ष स्थानीय भाषा आणि गणित इत्यादीचे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या १३व्या वर्षापासून अधिकांश विद्यार्थी कौशल्य आधारित शिक्षण घ्यायचे. बाकी काहीच हुशार विद्यार्थी व्याकरण, दर्शन, वैद्यकीय शिक्षण इत्यादी. यावेळी देशातील सर्वच प्रजा शिक्षित होती, सुखी आणि समृद्ध होती. विदेशी आक्रांतानी देशातील मोठे गुरुकुल नष्ट केले तरीही १८५० सालीहि देशात ६ लाख गुरुकुल होते. मोठ्या प्रमाणात मुले आणि मुली तिथे शिक्षण घ्यायच्या. जगात सर्वात जास्त साक्षरता  त्यावेळी आपल्या देशात होती. ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट केले त्यांची आर्थिक नाळ तोडली. गुरुकुल बंद केली पण तसेच शिक्षण देणाऱ्या ६ लाख शाळा काही उघडल्या नाही. कारण त्यांना फक्त चाकर हवे होते, कुशल आणि आत्मनिर्भर प्रजा  नाही. भारत त्यांच्या साठी बाजार होता. देशाला स्वतंत्रता मिळाली पण मानसिक रूपेण गुलाम काळ्या अन्ग्रेजांचे राज्य आले. फक्त साक्षरता वाढविणे आणि कागदी शिक्षित तैयार करणारी शिक्षण व्यवस्था देशात आली. व्होट बँकमुळे आजहि परिस्थिती आहे कि पहिलीत प्रवेश घ्या, वाचता नाही आले तरी वयाच्या १८व्या वर्षी १२वी पासची डिग्री मिळेल. लिहिता नाही आले तरी तुम्ही स्नातक व्हाल. आजच्या शिक्षण व्यवस्थेने  तैयार केलेले कोट्यावधी अकुशल तरुण राष्ट्रावर भार समानच आहे असे म्हणता येईल. हे तरुण राष्ट्राच्या उन्नतीसाठी हातभार लाऊ शकत नाही. यांच्या उपयोग समाज विरोधी कार्यांसाठी शत्रू राष्ट्र करतात, हे आपण पाहतोच आहोत.  


नुकतीच घोषित केलेल्या नवीन शिक्षानीतीत ८वी नंतर विद्यार्थांना विषय घेण्याची स्वतंत्रता देण्यात आली आहे. पण एवढ्याने कार्य भागणार नाही. ८वी पास झाल्यानंतर किमान ८० टक्के विद्यार्थी कौशल्य शिक्षण घेणारे असले पाहिजे. आज भारतीय शिक्षा बोर्डालाहि  सरकारने मान्यता दिली आहे जिथे वैदिक आणि आधुनिक दोन्ही शिक्षण दिले जातील. काही वर्षातच आपल्याला चांगला परिणाम मिळेल आणि देशात पूर्वी सारखेच शिक्षित आणि विद्वान नागरिक मिळतील हि आशा. 


२. उत्तम सुरक्षा व्यवस्था: 


आराष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति व्याधी महारथो जायताम्‌: राष्ट्राच्या सुरक्षेसाठी नेमबाजीत प्रवीण धनुर्धर आणि सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्र निपुण शूरवीर आवश्यक आहे. आजच्या संदर्भात आपले सैन्य अत्याधुनिक अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित असेल तरच ते राष्ट्राची सुरक्षा करू शकेल. राष्ट्र सुरक्षित हातात असेल तर प्रजा सुखी आणि संपन्न राहील. भारतीय राजांनी राष्ट्राच्या सुरक्षेवर लक्ष दिले नाही त्यामुळे ते पराजित झाले, हे ऐतिहासिक सत्य आहे. 


भारताला स्वतंत्रता मिळाली. द्वितीय जागतिक युद्धात भाग घेणारे कुशल सैन्य भारताला मिळाले. पण त्यावेळच्या स्वप्नील राजनेत्याला शक्तिशाली सैन्याची गरज वाटत नव्हती. देशात शस्त्र उद्योग उभा करणे, सैन्याला नवीन आधुनिक अस्त्र-शस्त्र  पुरविण्याचे कार्य केले नाही.  परिणाम अर्धा काश्मीर हातातून गेला, तिबेट वर चीन ने अधिकार केला. १९६२च्या युद्धात दारूण पराजय पत्करावा लागला. त्यानंतर परदेशातून अस्त्र-शस्त्र विकत घेऊन पाकिस्तान आधारित सुरक्षानीती तैयार झाली. पण चीन कडे दुर्लक्ष केले. हातातून गेलेला भाग परत मिळविण्याचा प्रयत्न केला नाही.


आज सुरक्षे संबंधी धोरण बदलले आहे. आधुनिक अस्त्र- शस्त्रांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न होत आहे. शस्त्रूच्या मनात भीती निर्माण होईल, असे सैन्य अजून तैयार झालेले नाही. काही वर्षांत चित्र बदलेल हि अपेक्षा. 


३.  गाय  आणि वाहतुकीच्या  साधनाचे महत्व: 


दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः गाय, बैल, घोडा गाडी इत्यादिंची कमतरता नसावी. आपला देश गावांत राहतो. आजहि गाय ग्रामीण अर्थव्यवस्थेची धुरी आहे. दूध, दही, ताक, लोणी गायींपासून मिळते. या शिवाय कृषी साठी, खत, जाळण्यासाठी गोवर्या किंवा गोबर गॅस मिळते. गोमूत्रापासून कीट नाशक, गोनायाल, साबण  आणि अनेक औषधीहि बनतात. बैलांचा उपयोग शेतीत होतो. आपल्या देशात शेतकर्यांजवळ शेत जमीन कमी असल्याने शेतीसाठी गाय-बैलांचे महत्व जास्त. 


पूर्वी देश/ विदेशांत आपल्या देशातील शेतमाल आणि इतर सामग्री विकण्यासाठी बैलगाडी, घोडा-गाडी, नौका  इत्यादी वाहतुकीसाठी वापरले जात होते. उत्तम आणि सुरक्षित रस्त्यांमुळे आपला व्यापार युरोप, आफ्रिका  ते दक्षिण पूर्वी एशिया पर्यंत होता.  


आज  बसेस, मेट्रो, ट्रक आणि आगगाडी, विमान, मोठे मोठे समुद्री जहाज  इत्यादींचा वापर वाहतुकीसाठी होतो. स्वतन्त्रता प्राप्ती नंतर सर्वात जास्त दुर्लक्ष वाहतुकीच्या साधनांकडे केल्या गेले. द्वितीय विश्वयुद्ध संपल्यावर अधिकांश देशांनी मग ते जापान, दक्षिण कोरिया असो, किंवा अमेरिका युरोप, मोठे महामार्ग बांधण्यावर, विमान उद्योग आणि जहाज उद्योगावर  सर्वांत जास्त जोर दिला. पण आपण दुर्लक्ष केले म्हणा किंवा फार थोडे बजेट यासाठी दिले. असो. 


आज देशात मोठ्या प्रमाणांवर महामार्गांची निर्मिती होत आहे, मोठे-मोठे विमानतळहि बांधले जात आहे. रेल्वेचा पूर्णपणे कायाकल्प होत आहे. नवीन नदी आणि समुद्री मार्ग निर्मितीचा प्रयत्न हि होत आहे. वाहतुकीच्या ह्या साधनांमुळे आज देश-विदेशातून आलेले उद्योजक आपल्ल्या देशात वस्तू निर्माण करण्याचे उद्योग लाऊ लागले आहे. भविष्यात देशाचा व्यापार वाढेल आणि शेतकरी सहित देशाचे नागरिक समृद्ध होतील हि आशा. 


४. शिक्षित स्वावलंबी स्त्री 


परंध्रिर्योषा: दुर्ग, नगर आणि घर संचालन करण्यात सक्षम स्त्री: राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्त्री शिक्षित, बुद्धिमान, सुचरित आणि वेळ पडल्यास नगर आणि दुर्गच्या रक्षणास समर्थ असावी. वैदिक काळात सूर्या, घोषा, शची, अथर्वा, इत्यादी बुद्धिमान स्त्रिया होत्या. तर मुद्गलांनी सारख्या इंद्र सेनेच्या सेनापतीहि होत्या. मध्य युगातहि अहिल्या, चेन्नमा, दुर्गावती, राणी लक्ष्मीबाई इत्यादी महान योद्धा स्त्रिया होत्या. 


मध्य काळात समाज स्त्रीला सुरक्षा देण्यास असमर्थ ठरला. स्त्रीचे घराबाहेर निघणे देशातील अधिकांश भागात बंद झाले. साहजिक याचा परिणाम स्त्री शिक्षणावर झाला. पुरुषांच्या तुलनेत कमी स्त्रिया शिक्षण घेत होत्या त्याही अधिकांश दक्षिण भारतात किंवा उत्तरेत  संपन्न घराण्यातील स्त्रिया. स्वतंत्रता प्राप्ती नंतर सरकारने स्त्री शिक्षणावर जोर दिला. पण मुळातच शिक्षण फक्त चाकर निर्मितीसाठी असल्याने कुणालाही त्याचा जास्त फायदा झाला नाही. सुशिक्षित आणि स्वावलंबी स्त्रीच्या निर्मितीत आजहि देश काही प्रमाणातच सफल झाला आहे. आज देशात अधिकांश भागात शांती आणि सुरक्षा आहे. शिक्षण व्यवस्थेतहि बदल होत आहे, त्यामुळे भविष्यात स्त्री अधिक शिक्षित आणि स्वावलंबी होईल हि आशा ठेऊ शकतो. आज सैन्यात स्त्रीला दरवाजे खुले झाले आहे. भविष्यात स्त्रियाहि रणांगणावर पराक्रम गाजवतील हि आशा. तेंव्हा खर्या अर्थाने स्त्रिया पुरंधि: घोषा ठरतील.   


५.  अनकूल वर्षा


निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌ योगक्षेमो नः कल्पताम्.राष्ट्रात अतिवृष्टी आणि अनावृष्टी झाली नाही पाहिजे. वर्षां शेतकर्याला अनकूल पाहिजे, ज्यामुळे शेतात धान्य, भाजी-पाला फळे आणि औषधी प्रचुर मात्रात उत्पन्न होतील. जेणे करून राष्ट्राची प्रजा  सुखी आणि संपन्न होईल.


वैदिक काळात पर्यावरणाला अनन्य महत्व होते. अरण्य  आणि वृक्षांच्या सुरक्षेसाठी  अरण्य, वृक्ष  इत्यादींना देवत्व प्रदान केले. त्यांची सुरक्षा केली. मोठ्या प्रमाणावर तलाव निर्मिती आणि त्यांची सुरक्षा यावर जोर दिला गेला. तलाव, सरोवर इत्यादिंना तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. त्यामुळे वर्षा शेतकर्यांसाठी अनकूल राहत होती.  


आज आपण अधिकांश जंगलांचा विनाश केला. चुकीच्या सरकारी नियमांमुळे अधिकांश प्रजेने घरात आणि शेतात झाले लावणे सोडून दिले. उपभोगासाठी जमिनीतून काढलेले हलाहल आणि खनिज इत्यादी आपण जास्त प्रमाणात वापरू लागलो, ते परत जमिनीला परत करणे आपल्याला शक्य नाही. परिणाम पृथ्वीचे तापमान वाढू लागले. माझ्या दिल्लीचे म्हणाल तर गेल्या २०-२५ वर्षांपासून पावसाळ्यातहि दहा-दहा दिवस पाऊस पडत नाही. पण ज्या दिवशी पडतो भयंकर पडतो. हेच बहुतेक देशात सर्वत्र घडत आहे. अतिवृष्टी आणि अनावृष्टीच्या दुष: चक्रात आज देश सापडलेला आहे. सध्या तरी देशात अन्न-धान्याची कमतरता नाही पण असेच चालत राहिले तर भविष्यात अन्न-धान्याची कमतरता देशात नव्हे पूर्ण जगात होईल. ज्या राष्ट्रात अन्न-धान्याची कमतरता असते त्या राष्ट्रात अराजकता पसरायला वेळ लागत नाही. पर्यावरण सुरक्षेसाठी सरकार कठोर पावले उचलली पाहिजे. प्रजेला सुखी आणि समृद्ध जीवन जगायची इच्छा असेल तर प्रजेने हि या कार्यात हातभार लावला पाहिजे. 


६. राष्ट्राचे अभीष्टचिंतन हेच युवांचे (नागरिक)  कर्तव्य


जिष्णू रथेष्ठाः सभेयो युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां : राष्ट्र निर्माण हि एक यज्ञ आहे. राष्ट्रातील  यज्ञकर्तांचे (नागरिकांचे) पुत्र विजयी, रथारोही, सभ्य अर्थात सभेत बसण्याची योग्यता असणारे पाहिजे. 


देशाच्या विकासात युवा पिढीचे महत्व अनन्य असते. भारत एक युवा  देश आहे. आपली  युवा पिढी शिक्षित, वीर, सभ्य असेल तर सहजच सुखी समृद्ध राष्ट्राची निर्मिती आपण करू शकू. तरुणांना आत्मनिर्भर करणारी शिक्षा प्रणाली, चांगले संस्कार देणारी स्त्री, अन्न-धान्यात आत्मनिर्भरता आणि सुरक्षा व्यवस्था सदृढ असेल तर  भविष्याची युवा पिढी सभ्य, शिक्षित आणि आत्मनिर्भर होईल. राष्ट्र सुखी आणि समृद्ध होईल. 


आर्य समाज फेसबुक वरून या मंत्राचा हिंदी अनुवाद.  अर्थात राष्ट्र गान:  


ब्रह्मन् ! स्वराष्ट्र में हों, द्विज ब्रह्म तेजधारी |
क्षत्रिय महारथी हों, अरिदल विनाशकारी ||
होवें दुधारू गौएँ, पशु अश्व आशुवाही |
आधार राष्ट्र की हों, नारी सुभग सदा ही ||
बलवान सभ्य योद्धा, यजमान पुत्र होवें |
इच्छानुसार वर्षें, पर्जन्य ताप धोवें ||
फल-फूल से लदी हों, औषध अमोघ सारी |
हों योग-क्षेमकारी, स्वाधीनता हमारी ll

 

Monday, July 19, 2021

उपभोग आणि पर्यावरण


पर्यावरण म्हणजे आपल्या चारी बाजूला असेलेले "जल, थल, नभ यांचे आच्छादन". जल थल नभच्या एका विशिष्ट आच्छादन मुळे मानव सहित आजच्या जीव जंतूंची निर्मिती झाली आहे. जो पर्यंत हे पर्यावरण (विशिष्ट आच्छादन) अक्षुण राहील, मनुष्य या पृथ्वीवर वास्तव्य करू शकेल. काळाच्या नियमानुसार पृथ्वीवरील पर्यावरण सतत बदलत राहते. पण हा बदल हळू- हळू होतो. काळाच्या घडीनुसार आपल्याला १०० वर्षांचे आयुष्य दिले आहे, हे जरी गृहीत धरले तरी मानव १०० वर्ष पृथ्वीवर वास्तव्य करू शकेल का? हा प्रश्न आपल्याला  सदैव सतावत राहतो.  

आपण या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहोत. इथल्या संसाधनांचा वापर आपण आपल्या स्वार्थासाठी करतो. त्यासाठी जीव जंतू वनस्पती सर्वांचा नाश करतो आहे. आज  अधिकांश नद्यांचे पाणी पिण्या लायक राहिले नाही, जंगल मोठ्या वेगाने नष्ट होत आहे. पृथ्वीच्या  गर्भातून काढलेल्या खनिज, खनिज तेल इत्यादी मुळे संपूर्ण अच्छादनच विषाक्त होत आहे. असेच सुरु राहिले  हे आच्छादन आपले रक्षण करू शकणार नाही. पुढे प्रश्न येतोच पृथ्वीवरील संसाधनांचा उपभोग करताना, आपण काय करावे जेणेकरून पर्यावरण अक्षुण राहील आणि आपण काळाने दिलेले पूर्ण आयुष्य जगू शकू. 

ईशान्य उपनिषद मध्ये माणसाने पृथ्वीवरील संसाधनांचा उपयोग कसा करावा  यासाठी दोन  सूत्र दिले आहे. 

१.  ज्या वस्तूचा उपभोग केला आहे, त्यात न्यूनता आली नाही पाहिजे.  

हे कसे शक्य होणार. 

२.  ज्या वस्तूचा उपभोग केला आहे, तिचा त्याग करणे, अर्थात पुन्हा परत करणे.  

पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या वनस्पती, झाडे आपण पुन्हा सहज परत करू शकतो. उदा. एक झाड कापल्या वर पुन्हा दुसरे झाड लाऊन फक्त २० वर्षांत आपण तुटीची भरपाई करू शकतो. पृथ्वीच्या गर्भातून काढलेल्या वस्तू पुन्हा परत करू शकत नाही. उदा. खनिज, तेल आपण पेट्रोल डीझेलच्या स्वरूपात वापरतो. ते आपण परत करू शकत नाही.   

अनेक खनिज पदार्थ आपण पर्वतांना नष्ट करून प्राप्त करतो. त्यामुळेहि पृथ्वीची भौगोलिक संरचना बदलते. उदा. घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट आणि दगडांसाठीहि आपण मोठ्या प्रमाणात पर्वतांना नष्ट करतो. दिल्लीच्या रस्त्यांसाठी आणि घरांसाठी, १०० वर्षांपूर्वी  जी अरावली पर्वतमाला दक्षिण दिल्ली वसंतकुंज ते बदरपूर पर्यंत स्पष्ट दिसायची, आज ती पूर्णपणे नष्ट झाली आहे. यावरून एकच निष्कर्ष निघते: 

आपल्या उपभोगाच्या ज्यावस्तू आपण पुन्हा परत करू शकत नाही त्यांच्या वापर कमीत कमी केला पाहिजे.

घर बांधायचे आहे, तर सिमेंट कॉंक्रीटच्या जागी शक्यतो लाकूड, बांबू आणि मातीचा उपयोग करणे उचित. 

जेवणासाठी स्टील, पितळ, चांदीच्या भांडयाएवजी झाडांच्या पानांपासून तैयार पत्रावळींचा उपयोग करणे योग्य. 

अन्न शिजविण्यासाठी गॅस, कोळसा इत्यादी जागी सौर कुकर, गोबर गॅस, लाकूड, शेणाच्या गोवर्या इत्यादींचा वापर. (लाकूड इत्यादीची तूट आपण भरून काढू शकतो).

अंतिम संस्कारसाठी आज तरी लाकूड सर्वात योग्य. काही विद्वान लोक म्हणतात जमिनीत गाडले तर लाकडाची गरज नाही. पण कौफिन हे लाकडाचे असते. याशिवाय एकदा कब्र/ समाधी बनली कि हजार वर्ष तरी ती जागा निरपयोगी होते. त्या कालावधीत झाडांच्या १५ ते २०पिढ्या जगतील. मोठ्या प्रमाणावर वायू शुद्ध करतील. 

बाकी आपण एक तर निश्चित करू शकतो. साबण, शेम्पू, भांड्यांसाठी डीश बार, फरशी साफ करणारे फिनायाल इत्यादी ग्रीन टॅग वाले वापरू शकतो. तेवढाच आपला हातभार. 

Saturday, July 17, 2021

खरे शिक्षण म्हणजे कौशल्य

 (सत्याला कल्पनाची जोड) 

आरती गुप्ता कारने उत्तम नगर येथील तिच्या बहिणाला भेटून घराकडे निघाली होती. उत्तम नगर म्हणजे गल्ली बोळ्यांचे कैक किलोमीटर पसरलेले मायाजाल. रस्ता जागोजागी खणलेला होता. पावसाळ्यातच गड्डे खोदण्याचे कार्य सरकारी एजेन्सी का करतात, ह्या प्रश्नाचे उत्तर तिला कधीच मिळाले नाही. आरती रस्त्यावर पसरलेल्या दगड-धोंड्यांवर लक्ष देत कार चालवत होती. पण कारचे मागचे टायर एका अणकुचीदार दगडावरून गेले आणि ते टायर पंक्चर झाले. तिने एका दुकानदाराला विचारले, इथे जवळ पंक्चर ठीक करणारा आहे का? दुकानदाराने उत्तर दिले, मॅडम, पुढच्या मोडवर डाव्या बाजूच्या ३० फुटवाल्या गल्लीत गाडी दुरुस्ती करणार्याचे गराज आहे. अखेर आरती कशीबशी गाडी चालवत त्या गराज जवळ पोहचली आणि गाडी थांबवून ती गाडीतून उतरली. ती काही म्हणणार त्या आधीच एक पंचविसीचा तरुण अक्षरचा धावत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मेम  मला ओळखले का, मी विजय. आपल्या मुळेच आज मी  गराजचा मालिक आहे. गेल्या वर्षीच हे गराज  विकत घेतले, सामानासहित. मौक्याच्या जागी आहे. पहिल्या माल्यावर राहण्यासाठी छोटासा फ्लेटहि बांधला आहे. त्याला मध्ये टोकत आरती म्हणाली, अरे बाबा, आधी प्रोब्लेम काय आहे, हे तरी बघून घे. "मेम, तुमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले आहे, हे तर मला दिसत आहे. बाकी गाडीत आणिक काही प्रोब्लेम  असेल तर बघून घेईल. अर्धा-पाऊण तास लागेल, तो पर्यंत तुम्ही माझ्या घरी  चला".  

आरतीचा नाईलाज झाला. विजयने घरच्यांशी तिची ओळख करून दिली, तो म्हणाला, आरती मेम ने मला मार्ग दाखविला नसता, तर आज माझे स्वतचे गराज नसते. 

त्याच्या घरी चहा पिता -पिता आरती काळात दहा वर्ष मागे गेली. त्यावेळी ती सरकारी शाळेत नवव्या वर्गात  हिंदी शिकवायची. दिल्लीत सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे अधिकांश पालक, रेह्डी-पटरी वाले, भाजी-फळे विकणारे, मिस्त्री, लेबर इत्यादी असे छोटे-मोटे काम करून गुजराण करणारे असतात. आपली मुले शिकतील तर त्यांनाहि पांढरपेशा नौकरी मिळेलहि अशी आशा मुलांचे पालक बाळगून असतात. पण त्या गरीब पालकांना काय माहित, इथे न शिकता मुले वरच्या वर्गात जातात. देशात शिक्षणाचा आकडा वाढविण्यासाठी सरकार नव्या-नव्या योजना राबविते. ८वी पर्यंत  सर्वांना पास  करा. दहावीतहि ९९ टक्के विद्यार्थ्यांना पास करा, इत्यादी. मग  विद्यार्थी कितीही ढ असला तरी चालेल

नववीत अडमिशन घेतलेल्या मुलांना काही येते का, हे पाहण्यासाठी आरतीने मुलांना ५ वाक्य लिहायला सांगितले. दुर्भाग्य, त्या  बॅचचा  एकहि विद्यार्थी वाक्य शुद्ध लिहू शकला नाही. आरती विचार करू लागली, काय होणार या मुलांचे. कितीही नालायक असले तरी दहावीतहि यांना पास करावे लागेल. आपली शिक्षण व्यवस्था देश घडविणारी नवीन पिढी निर्माण करते कि बेरोजगारांची फौज. १८ वर्षाचा तरुण मतदान करून सरकार निर्मित करू शकतो. पण १२वी पास अधिकांश विद्यार्थी कुठले हि कौशल नसलेले असतात. 

अखेर आरतीने मौन सोडले, ती मुलांना उद्देश्यून म्हणाली, तुम्हाला खरोखर शिकायचे असेल तर शाळेत या, मन लाऊन अभ्यास करा. जर अभ्यासात मन नसेल लागत तर काही कामधंधा शिका. किमान दोन वेळच्या पोट पाण्याची व्यवस्था तरी होईल. वर्गात शांतता पसरली. अखेर  विजय आपल्या बाकावर उभा राहिला आणि म्हणाला, मेम, मला अभ्यासाचा कंटाळा येतो, पण वडिलांच्या धाकाने फक्त टाईमपास करण्यासाठी शाळेत येतो. मेम, आमच्या भागात एक गराज वाला आहे, तो काही दिवसांपासून मला म्हणतो आहे, तो मला कार-स्कूटर दुरुस्त करायला शिकवेल आणि रोजचे १०० रु हि देणार. आरती म्हणाली, तुला जर खरोखरच कार- स्कूटर दुरुस्तीचे काम शिकायचे असेल तर निश्चित जा. किमान आपल्या पायावर तरी उभा राहील. त्या दिवसानंतर विजयने शाळेत येणे बंद केले. विजय खरोखर काय करत हे जाणून घेण्यासाठी आरती स्वस्त: त्या गराज मध्ये गेली. गराज एक सरदारजी चालवीत होते, ते आरतीला म्हणाले विजय खूप मेहनती आहे, कामात रस घेतो. तू बघशीलच काही वर्षांतच याचे स्वत:चे गराज असेल. खरोखर तसेच झाले. विजयच्या आईने विजयने यासाठी किती मेहनत घेतली हे हि सांगितले. विजयची आई पुढे म्हणाली, विजयच्या लहान भावाने १०वी नंतर ऑटोमोबाईल डिप्लोमा केला. तो आज  गुडगाव इथे एका ऑटोमोबाईल कारखान्यात काम करतो, त्यालाहि चांगला पगार आहे. तो सुट्टीच्या दिवशी विजयला मदतहि करतो.

घरी येता येता आरती विचार करत होती, विजय सारखेच जर  वयाच्या १३-१४ वर्षापासून विद्यार्थ्यांनी रोजगार प्रदान करणारे शिक्षण घेतले तर देशातील बेरोजगारी दूर होईल. सरकारलाहि डिग्री वाटणार्या शिक्षण संस्थाहि उघडाव्या लागणार नाही. 



Thursday, July 15, 2021

सत्य


एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन  सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या  सत्याचे वर्णन भिन्न-भिन्न होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून  म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते. आपण सर्वांनी आपापल्या सत्याचे पालन करत पुढची वाटचाल करावी, हेच उचित. मी वृद्ध झालो आहे, आता आयुष्याचा  शेवटचा काळ हिमालयात परमेश्वराचे स्मरण करत घालवावा हेच योग्य. तुम्ही सर्व पृथ्वीवर जाऊन सत्याचा प्रचार करा. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही अनुभवलेले सत्य दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा  मानवाचे अस्तित्वच पृथ्वीवरून नाहीसे होईल. 

वृद्ध ऋषीचा निरोप घेऊन बाकी सर्व मृत्यूलोकात  परतले. त्यांनी आपापल्या सत्याचा प्रचार सुरु केला. त्यांचे लाखो शिष्य झाले. वृद्ध ऋषीने दिलेली चेतावणी ते विसरले. अहंकाराने ग्रस्त होऊन त्यांनी अनुभवलेले सत्य दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करू लागले. काळाचा प्रभावाने ते सर्व मरण पावले. त्यांच्या शिष्यांनी अधिक जोमाने  त्यांच्या सत्याचा प्रचार करणे सुरु केले. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व युक्त्या ते वापरू लागले.  दुसर्याने स्थापन केलेल्या मठ-मंदिरांना नष्ट करण्यात त्यांना आनंद येऊ लागला. अखेर त्यांनी अनुभवलेले सत्यच पृथ्वीवरील मानव जातीच्या विनाशाचे कारण बनेल असे वाटू लागले आहे. सत्याला पचविणे कठीण असते हेच सत्य. 


Wednesday, July 7, 2021

ऋग्वेद : प्राण चिकित्सा : प्राणाशी सख्य करा रोगमुक्त व्हा

ऋग्वेदाला आपण चिकित्साशास्त्रचा पहिला ग्रंथ म्हणू शकतो. यात प्राण चिकित्सा आहे. आजारी व्यक्ती  प्राणांशी सख्य करून रोगमुक्त होऊ शकतो याचे वर्णन ऋचांमध्ये आहे. माणूस आजारी का पडतो याचे मुख्य कारण खालील ऋचेत दिले आहे. 


वृत्रस्य त्वा श्वसथादीषमाणा विश्वे देवा अजहुर्ये सखायः ।

मरुद्भिरिन्द्र सख्यं ते अस्त्वथेमा विश्वाः पृतना जयासि ॥

(ऋग्वेद ८.९६.७)

विश्वे देवा अर्थात दिव्य  गुण - दया, क्षमा, दम, शौच, इंद्रिय संयम, अहिंसा, विद्या,  धैर्य इत्यादी  जे आधी मित्र होते ते वृत्राच्या पापाने अर्थात पापाच्या श्वासाने माणसाला सोडून जातात. प्राणहि पापांनी आच्छादित शरीराला सोडून जातो. हे इंद्र अर्थात इंद्रियांचा स्वामी मनुष्य प्राणांशी मैत्री जोड, वृत्राला पराजित करण्यासाठी. 

अधिकांश लोक निरोगी शरीर धारण करून जन्माला येतात. आपले शरीर हे आत्म्याचे निवासस्थान आहे. जो पर्यंत हे शरीर निरोगी आहे, आत्मा शरीरात निवास करते. रोगग्रस्त शरीराला आत्मा सोडून जातो. यालाच आपण मृत्यू म्हणतो. 

जो माणूस मोह, माया, मद, मत्सर आणि अहंकार इत्यादीने ग्रसित आहे. ज्याचे  इंद्रियांवर नियंत्रण नाही, आळशी, निद्रेच्या स्वाधीन, शरीरासाठी नव्हे तर इंद्रिय तृप्तीसाठी आहार घेणारा, क्रोध करणारा, असंयमी, दिवसा झोपणारा, रात्री जागणारा, इत्यादी दुर्गुणांचा अधीन व्यक्ती आजारी पडतो. या ऋचेत ऋषी प्रार्थना करतो, हे, इंद्र प्राणांशी सख्य केले तरच, चारी बाजूंनी शरीराला आच्छादित केलेले पापांचे आवरण नष्ट करता येईल, अर्थात वृत्राला नष्ट करता येईल. 

आता प्राणांशी मैत्री कशी करायची हा प्रश्न मनात येणारच.  खलील ऋचेत ऋषी म्हणतात: 

द्वाविमौ वातौ वात आ सिन्धोरा परावत: l
वक्षं ते अन्य आवातु पराऽन्यो वातु यद्र्प ll
(ऋ. १०.१३७.२)

आ वात वाहि भेषजं वि वात वाहि यद्रप l
त्वं हि विश्व भेषजो देवानां दूत ईयसे ll
(ऋ. १०.१३७.३)

माणसाच्या शरीरात अब्जावधी कोशिका आहेत. प्रत्येक कोशिकेला जगण्यासाठी प्राणवायू पाहिजे. जर ती योग्य मात्रेत मिळाली नाही तर कोशिका नष्ट होतात. असेच चालत राहिले तर माणूस रोगग्रस्त होतो. ऋषी म्हणतो, आपल्या शरीरात श्वास आणि निश्वास रुपी दोन वायू आहेत. एक वायू वातावरणात आहे जी श्वासांद्वारे आपण आत घेतो. ती आपल्या  शरीरात प्रत्येक कोशिका पर्यंत पोहचते या वायुला प्राणवायूहि म्हणतात. प्राणवायू आरोग्य, जीवनशक्ती,  बल आणि उत्साह प्रदान करते. दुसरी वायू आपल्या शरीरातून समस्त दोष बाहेर काढून आपल्याला रोगमुक्त करते. 

ऋषी पुढे म्हणतो, प्राणवायू औषधी आहे. प्राणवायू वायू आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहमान राहते. प्राणवायूहि संपूर्ण चिकित्सा पद्धती आहे जी भौतिक शरीराला तर निरोगी करते याशिवाय भावनात्मक रूपेण शरीरालाहि सदृढ करते. प्राणवायू देवतांची दूत आहे.  

विभिन्न प्रकारचे प्राणायाम उदा. अनुलोम-विलोम,  भस्रिका, कपालभाती इत्यादी करून आपण प्राणांशी सख्य स्थापित करू शकतो.  

करोना विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करतो. रुग्णांना श्वास घेणे शक्य होत नाही. त्यांच्या शरीरात प्राणवायूचे स्तर कमी होऊ लागते. अनेकदा कृत्रिमरित्या प्राणवायू देण्याचे प्रयत्न सफल होत नाही. परिणाम लाखोंच्या संख्येने रुग्ण दगावले. जर या रुग्णांनी प्राणाशी सख्य केले असते तर ते सर्व आज जिवंत असते. 

हे सर्व सिद्धांतिक झाले. प्रत्यक्ष पुरावा  आहे का? हा प्रश्न येणारच. करोना पसरण्यात सुरवात झाली होती तेंव्हाच स्वामी रामदेव यांनी देशातील जनतेला प्राणांशी सख्य करायची प्रेरणा दिली. इंडिया टीव्ही वर रोज सकाळी आठ वाजता प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्याची सुरवातहि केली. देशातील कोट्यावधी लोकांनी त्यांचे अनुसरण केले. प्राणांशी सख्य करण्यासाठी प्राणायाम करणे सुरु केले. ते सर्व लोक करोना काळात जिवंत राहिले.  प्रत्यक्ष प्रमाण- पतंजलि योगपीठ येथील पतंजलि गुरुकुलमहि शाळा एक हि दिवस बंद झाली नाही. आचार्यकुलंहि शाळा फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद झाली. पाच हजार लोक तिथे नेहमी असतात. तिथे एकालाही करोना झाला नाही. त्यांचे हरिद्वार येथील योगग्राम जिथे १००० रुग्ण एक आठवडा ते पंधरा दिवस उपचार घेतात. तिथे एकालाही करोना झाला नाही. तेही गेल्या ऑक्टोबर पासून सुरु आहे.  कारण एकच प्राणाशी सख्य. 

गेल्या एप्रिल महिन्यात करोना आजार भयंकर रीतीने देशात सर्वत्र पसरला. देशात प्राणवायूचा तुटवडा पडला. दिल्ली भारताची राजधानी पण इथेही सर्व हॉस्पिटल भरलेले होते. ८० टक्के  रुग्णांना  घरात राहून उपचार घ्यावा लागला. अश्या वेळी लाखो रुग्णांनी  प्राणायामची मदत घेतली आणि करोना पासून स्वत:चे रक्षण केले. त्यात एक मीही आहे.  

बाकी आपल्या देशाचे दुर्भाग्य ज्या व्यक्तीचा गौरव व्हायला पाहिजे त्याच्या विरुद्ध कोर्ट केसेस दर्ज होतात. प्राणांशी सख्य करण्याचा सल्ला देणार्या स्वामी रामदेव  विरुद्ध देशात प्रबळ झालेले दस्यू अर्थात मेडिकल माफिया(आयएमए) स्वामी रामदेव विरुद्ध शेकडो केसेस टाकतात. बहुतेक त्यांच्या एकच  उदेष्य आहे,  रुग्णांचा खिसा रिकामा करणें मग त्यात रुग्ण दगावले तरी चालेल. अश्या वेळी फ्रीची प्राणवायू रुग्णांचा प्राण वाचवेल तर त्यांचा धंधा बुडणार. बाकी केसेस टाकण्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपय्या  मेडिकल माफियाला कोण पुरवितो, हा हि एक मोठा प्रश्न आहे.  

करोनाची तिसरी लहर येणार असे सर्व मेडिकल विशारद म्हणत आहे. अश्या वेळी प्राण वाचविण्यासाठी. प्राणांशी सख्य करणें गरजेचे आहे. असो.

(वैदिक ऋचांचा अर्थ: आचार्य बालकृष्ण यांच्या " वेदों की शिक्षाएँ)

 

Sunday, July 4, 2021

ऋग्वेद: दस्यु कोण होते


ऋग्वेद एक धार्मिक ग्रंथ नव्हे तर भारतीय सभ्यता आणि इतिहासाचे दर्पण आहे. आपण ऋग्वेदातील मुख्य-मुख्य मंत्र ही फक्त वाचले असते तर आपल्याला आपली खरी ओळख कळली असती. आर्य विदेशी, मूळ निवासी दास किंवा दस्यु असा चुकीचा इतिहास शिकविण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. आपला खरा इतिहास सर्वांना माहीत असावा त्यासाठी हा प्रपंच.


अकर्मा दस्युरभि  नो अमन्तुरन्यव्रतो अमानुषः।

त्वं तस्यामित्रहन्वधर्दासस्य दम्भय ll (ऋ.10/22/28)


या मंत्राचे दृष्टवा ऋषी विमद आहे. देवता इन्द्र अर्थात राजा आहे.  ऋषीने या मंत्रात दस्युंचे तीन लक्षणे सांगितली आहे. 

अकर्मा दस्यु: जो व्यक्ति कर्महीन, आळशी आणि प्रमादी आहे. जो मोठ्या बाता करतो पण कर्म करत नाही. त्याला ऋषीने दस्यु म्हंटले आहे. 

अमंतु दस्यु:  मंतु म्हणजे मनन करणारा. जो व्यक्ति मनन करत नाही, अविवेकी, मंतव्यहीन (उद्देश्यहीन), सामाजिक मर्यादा, कायदे, नियम इत्यादींचे पालन न करणारा, दुसर्‍यांच्या कार्यात विघ्न आणणारा. अश्या व्यक्तीला ऋषीने दस्यु म्हंटले आहे. 

अन्यव्रत दस्यु:  विपरीत कर्म करणारा, अधर्मयुक्त कार्य करणारा अर्थात चोर, डाकू, आतंकवादी इत्यादि अर्थात दुष्ट कार्यात ज्यांना आनंद मिळतो असे लोक. 

ऋषी पुढे म्हणतात इन्द्र अर्थात राजाचे कर्तव्य आहे, अश्या दुष्ट लोकांना दंड देऊन प्रजेचे रक्षण करणे.  

महाभारतात महर्षि व्यास (मिश्र वर्णाची संतती होते तरी ही आपल्या कर्माने ते ब्राम्हण होते) दस्युंचे वर्णन करताना म्हणतात: 

दृश्यन्ते मानुषे लोके सर्ववर्णेषु  दस्यव: l

लिङ्गान्तरे वर्तमाना आश्रमेषु तथैव च।

(महाभारत शा.65.23)

प्रत्येक आश्रमात आणि प्रत्येक वर्णात दस्यु असतात. रावण हा ब्राम्हण होता पण दुष्ट प्रवृतीचा होता म्हणून रावणाला दस्यु म्हंटले आहे. तसेच श्रीरामाचे एक पूर्वज  राजा कल्माषपाद त्याच्या दुष्ट कर्माने राक्षस झाला। असेच दोन नंबरचे करणारे वैश्य ही दस्यु असतात। शासकीय कर्मचारी समवेत सर्व सेवा करणारे जर  कर्तव्य पालनात कसूर करत असेल तर तेही दस्युच आहे. अश्या सर्व दस्युंना राजाने दंड दिलाच पाहिजे अन्यथा राज्य नष्ट होते. 

स्पष्ट आहे, कुठल्याही जाती किंवा धर्म विशेषच्या लोकांना दस्यु म्हंटलेले नाही. आपल्या समाजात  दस्यु हा कर्मवाचक शब्द आहे. प्रजेला त्रास देणारे, सदैव दुष्टतापूर्ण कार्य करणारे, आळशी, प्रमादी लोकांना दस्यु म्हंटलेले आहे. 

Tuesday, June 22, 2021

विश्वामित्र आणि विषाणू

अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो. नारायण- नारायण या आवाजानी त्याची तंद्रा भंग झाली.  त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला 

 नारदा!  इथे टपकायचे कारण काय. तुला दिसत नाही मी किती व्यस्त आहे.   

अरे वा! तू मला पाहताच ओळखले, नाही तर बाकी लोकांना  मी वीणा दाखविली तरी लोकांचा विश्वास बसत नाही. चमत्कार करून दाखवावा लागतो, तेंव्हा त्यांना माझी ओळख पटते.  भारी हुशार आहे तू.  कसे ओळखले तू मला?

या गुप्त जागेची माहिती कुणालाही नाही. इथल्या कुठल्याही यंत्राने तुझ्या येण्याची नोंद केली नाही. अर्थात तू पृथ्वीचा मानव नाही,  बाकी तुझी वेशभूषा तुझा परिचय आहेच.  माझा वेळ किमती आहे, तुला जो काही संदेश द्यायचा आहे किंवा तुझे इथे येण्याचे जे काही कारण आहे, स्पष्ट आणि कमी शब्दांत बोल. 

कारण असल्याशिवाय मी कुठेच जात नाही. तू जे  काही करत आहे त्याच्या काय परिणाम होणार,याचा विचार केला आहे का? 

काय म्हणजे, मी "घातक आणि विनाशक" अश्या  विषाणूची निर्मिती केली आहे. या विषाणूच्या शक्तीने माझा देश संपूर्ण जगावर राज्य करेल. 

‘घातक आणि विनाशक’, त्या घातक सिनेमात बहुतेक अडीच किलो हात वाला हिरो होता. नाव विसरलो त्याचे.   

सनी देओल, वा! तुमच्या स्वर्गातही बॉलीवूडचे सिनेमे लागतात.  

तसे नाही रे, मी जेंव्हा मृत्युलोकात भटकायला येतो, तेंव्हा पाहतो, हॉलीवूड, बॉलीवूड,  सनी लिओनि ... 

च्यायला! बाल ब्रह्मचारी असून सनी लिओनि .... 

तसे नाही रे, मी इथे आलो कि इथेले सर्वच मला दिसते. तू जो हा विनाशक प्रयोग करत आहे त्याला थांबवण्यासाठी मी इथे आलो

हा! हा! हा!  मानव निर्मित एका छोट्या विषाणूला तुमचे देवराज इंद्र घाबरले आणि तुला पाठवविले. इथे आम्हाला हे हि माहित नाही तुमचा स्वर्ग लोक कुठे आहे ते.  

तू काहीही समज. पण एक लक्षात ठेव, निर्मितीचे कार्य  ब्रम्हदेवाचे आहे, मानवाचे नाही. या विषाणूला नष्ट कर, हेच तुझ्या आणि मानवजातीच्या  हिताचे आहे. 

व्हाट अ जोक! ब्रम्हदेवाने माणसाला बुद्धी दिली. त्या बुद्धीचा वापर करून मी विषाणू निर्मित‍ केला. अर्थात मी जे काही करत आहे,  त्यात  ब्रम्हदेवाची  इच्छा आहेच.  

कदाचित् असेलही, पण तू दुसर्‍यांना संपवण्यासाठी विषाणूची निर्मिती केली आहे, हे कितपत योग्य आहे. 

या मृत्यू लोकात आमचा बाप डार्विन म्हणतो, जो शक्तिशाली तोच  जिवंत राहणार. जे निर्बल आहे ते नष्ट होणार.  

तुला नाही वाटत, निर्बलांचे रक्षण करणे हा मानवाचा धर्म आहे. 

नारदा, तू माझे जास्त डोके पकवू नको, मी एकच धर्म मानतो, दुसर्‍यांना नष्ट करून स्वत:चे रक्षण करायचे. शिवाय मी इथे एकटाच नाही, माझ्या सारखे अनेक विश्वामित्र इथे एकापेक्षा एक घातक विषाणूच्या  निर्मितीत व्यस्त आहे. ज्या देशाजवळ जेवढे घातक विषाणू तो तेवढाच शक्तिशाली. आता कृपा करून येथून प्रस्थान करावे.

मलाहि वेळ नाही इथे जास्त वेळ थांबायला, पण एक शेवटचा प्रश्न विचारू का? हा विषाणू निसटला तर काय होईल,याचा विचार केला आहे का?

विश्वामित्र क्षणभर विचार करतो आणि उत्तर देतो, नारदा!,जास्तीसजास्त काही कोटी लोक मरतील. पृथ्वीवरचा थोडा भार कमी होईल.  बाकी विषाणूचे काय करायचे ते आम्ही बघून घेऊ म्हणत  नारदाला जाण्याचा  इशारा करतो. 

नारदाचे पृथ्वीवर येऊन अनेक विश्वामित्रांना समजविण्याचे  प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नारद निराश होऊन स्वर्गलोकी परतले आणि थेट ब्रम्हदेवाला जाऊन भेटले. 

नारायण नारायण! 

ब्रम्हदेवाने हसत-हसत विचारले, काय समाचार आहे पृथ्वीलोकाचे. 

माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कुणालाच भविष्याची चिंता नाही. सर्वच आगीशी खेळत आहे, म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी . 

नारदा, हे कलयुगाचे शेवटचे चरण आहे, आता  पृथ्वीवरील जीवसृष्टी क्रमश: नष्ट  होणार, हे अटळ आहे. कदाचित,  मानव आपल्या कर्माने प्रलय पूर्वीच जीवसृष्टी नष्ट करणार.  बहुतेक या महायुगाचा अंत असाच असेल. 

म्हणजे पिताजी, तुम्हालाहि माहित नाही, मानवाचे भविष्य? 

नारदा, माझे कार्य फक्त निर्मितीचे, सृष्टीचा अंत कसा होणार, याची कल्पना मलाहि नसते. 

अखेर, विषाणू विश्वामित्रच्या प्रयोगशाळेतून  निसटला. पृथ्वीवर मृत्यूचे थैमान सुरु झाले. मानव विरुद्ध विषाणू युद्ध सुरु झाले. कोट्यावधी जीव गेले. एवढे होऊनही आजचा विश्वामित्र अधिक घातक विषाणूंच्या निर्मितीत व्यस्त आहे.