Sunday, May 25, 2014

स्वादिष्ट मिर्ची (तोंडी लावायला)

 

दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ  विदर्भातली).  पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली.

साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.


कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या. एका काचेच्या भांड्यात मिरच्या ,लिंबाचा रस, मोहरीची डाळ आणि मीठ कालवून  मिरच्याना १ दिवस मुरु द्या. या मिरच्या  फ्रीज मध्ये ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात. Saturday, May 24, 2014

जेल मधी जाऊ या, दिल्लीची बिल्लीजेल मधी जाऊ या


जेल मधी जाऊ या

राजनीती खेळ खेळू या. 

जेल मधी गेला नेहरू

गादी मिळाली देशाची. 

जेल मधी गेला लालू

गादी मिळाली बिहारची 

जेल मधी गेला केजरी

मिळेल का गादी दिल्लीची?

 

 

दिल्लीची बिल्ली


काशी मधी गेली

दिल्लीची बिल्ली. 

वाघाला म्हणाली

मी तुझी मावशी

पड माझ्या पाया.

 

वाघाने दिला मिशी वर ताव

जोरात फोडली डरकाळी एक.

मावशी उडाली हवेत तशी

जाऊन बुडाली दिल्ली तळी.   


 

Wednesday, May 14, 2014

अस्ताचलच्या सूर्याला शेवटची वंदना

सूर्य हा सूर्यच असतो. त्याचा तेजाने जगाचे कारभार चालते. तसेच देशाचे ही असते. पण सूर्य हा  अस्त होणारच, हा सृष्टीचा नियम आहे.  पश्चिमेला अस्त  होणाऱ्या  सूर्याची ही आपण वंदना करतो, हीच आपली परंपरा आहे.

Sunday, May 11, 2014

एका पुतळ्याची व्यथा कथा


एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकता-ऐकता मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, उद्घाटनाच्या, दुसऱ्याच दिवसांपासून, पुतळ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. कुणीही साफ-सफाई, स्वछता करायला फिरकत नव्हते. त्याचा अंगावर धूळ-माती घाण जमा होऊ लागली.  कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांनी  प्रात:विधी साठी उपयुक्त जागा म्हणून पुतळ्याचा वापर सुरु केला.  भटक्या कुत्र्यांना, त्या सोयी साठी उपयुक्त खांब वाटला. स्वत:ला शहाणे मानणारे लोक ही कचरा फेकण्याची सोयीस्कर जागा  समजून, घरातल्या कचरा तिथे फेकत होते.  शेवटी घाणीला  कंटाळून पुतळ्यानी डोळे बंद केले आणि तो समाधी अवस्थेत केला. काही वर्षांनी पुतळ्याला चांगल्या रीतीने कळले, वर्षाकाठी एक दिवस साफ-सफाई होणार, हार-तुरे घालण्यात येईल, भाषणे होईल आणि पुन्हा हरिदासाची गाडी मूळ पदावर येणार. तरी ही त्याने विचार केला वर्षाकाठी एक दिवस का होईना, डोळे उघडून जगाला बघता येईल म्हणतात ना, एक दिवस पुरे प्रेमाचा.

पण काही दिवसांपूर्वी, अचानक पुतळा खडबडून जागा झाला. अजून वर्ष पूर्ण झालं नाही कुणी झोप मोड केली बरें, पुतळ्याने डोळे उघडले, त्याची साफ-सफाई सुरु होती. नवीन रंग-रोगन त्याच्या संपूर्ण शरीरावर होत होता. आजू-बाजूचा परिसर ही चकाचक चमकविण्याचे काम सुरु होते. त्याचे संपूर्ण शरीर सजविले जात होते. पुतळ्याने विचार केला, काय बरे झाले असावे, कदाचित निवडणूक आली असेल त्याचा अंदाज खरा ठरला. एका दाढीवाल्या माणसाने त्याला एक मोठा हार घातला.  आणि विकास विकास' असे ओरडत एक जोरदार भाषण दिले आणि जमलेल्या जनतेपाशी मते मागितली. पुतळ्याने मनात म्हंटले,  खरंच, या माणसाने अल्पावधीत स्वत:चा  भरपूर विकास केला आहे,

दाढीवाला गेला, थोड्याच वेळानी पुतळ्याने बघितले, काही लोक मोठ्या-मोठ्या हंड्यांमध्ये गंगाजल आणि दूध घेऊन येत आहेत. जवळ येताच, त्राहीमाम, त्राहीमाम, शांतम पापं, शांतम पापं च्या घोषणा देत, त्यांचा नेता म्हणाला, हे पुतळे देवा आम्हाला क्षमा करा, त्या नीच माणसाच्या जाणून बुजून  स्पर्श करून आणि तुम्हाला अपवित्र केले आहे.  पण चिंता करायची गरज नाही, गौ-ब्राह्मणांच्या साक्षीने गंगाजल आणि दुग्ध अभिषेक करून, तुम्हाला पुन्हा पवित्र करू.  पुतळ्याने मनात म्हंटले, च्यायला, देश स्वतंत्र होऊन कित्येक दशक झाले, तरी अस्पृश्यता ही आहेच. आपल्याला काय करायंच दुग्ध आणि गंगा स्नानाचा आनंद घेऊ, पुन्हा असा मौका कधी मिळेल काही सांगता येणार नाही.

दररोज न चुकता परिसराची आणि पुतळ्याची स्वच्छता होत होती. पुतळ्यापाशी ही जागा कडे बघायला भरपूर वेळ होता. पुतळा असला म्हणून काय झाले त्याला ही  भावना या होत्याच, सुंदर, अल्पवस्त्र धारी कुंतले सारख्या आधुनिक सुंदर ललनांना बघून त्याचे डोळे ही तृप्ती मिळत होती.  दुसऱ्या दिवशी एक बहनजी आली, तिने ही पुतळ्याला हार घातला. ती जोर जोरात म्हणत होती, त्या शुद्धीकरण वाल्यांचे आणि नीच माणसाची आपसांत मिली भगतआहे. त्यांचा बहिष्कार करा.  वोट मलाच द्या, पण असे भाषण देत असताना तिच्या पायाखालची जमीन का खिसकतेआहे हे पुतळ्याला कळले नाही.

पुन्हा एक-दोन दिवसांनी, एका बाबा समान वाटणाऱ्या माणसाने पुतळ्यावर हार घातला, तो जोर जोरात म्हणत होता, गेल्या ६० वर्षांपासून आंम्ही गरीबी दूर करीत आहोत. गरीबी दूर करण्यासाठी आमच्या कडे पुष्कळ योजना आहेत. आम्हालाच मते द्या, आम्ही गरिबी दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहू. लोक हो, गरिबी दूर करण्यासाठी, गरीब हे हवेच. तुम्हीच सांगा गरिबांचे अस्तित्व संपले तर आम्ही कुणाची गरिबी दूर करणार.

पुन्हा एक-दोन दिवसांनी, एक छोट्या कद-काठीचा, टोपीवाल्या माणसाने, पुतळ्याला हार घातला. तो म्हणाला, सर्व चोर आहे, मीच एक इमानदार आहे.  माझ्यापाशी  इमानदारीचे सर्टिफिकेट वाटण्याचा ठेका आहे.  जोर-जोरात अम्बानी अडाणी म्हणत असताना त्याला जोरदार खोकला आला. खंक खंक करत तो थांबला.  इमानदार माणूस भाषण देऊन निघून गेला. तेवढ्यात गर्दीतून    सीआईए, फोर्ड फोन्डेषण, असे काही शब्द पुतळ्याला ऐकू आले.

पुतळ्याने विचार केला ज्या प्रमाणे पूर्वी टाटा, बिरला,बजाज असायचे, त्याच प्रमाणे आज अंबानी-अडाणी असतील. सीआईए, फोर्ड फोन्डेषण म्हणजे काय पूर्वी जसे नाजी पक्ष आणि जर्मनी होती तसें तर नाही ना. पुतळ्याला त्या कालच्या माताहारीची पण आठवण  आली.

एकदाचा निवडणुकीचा प्रचार थांबला. पुन्हा पूर्वीची परिस्थिती निर्माण झाली, तोच कचरा, तेच कावळे आणि कुत्रे. पुन्हा घाण असह्य झाली. पुतळ्याने पुन्हा डोळे मिटले आणि तो समाधी अवस्थेत गेला.   

Saturday, May 3, 2014

भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ?

   

युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी बरोबर धनुर्धारी, पदाती बरोबर पदाती युद्ध करेल. सूर्यास्त झाल्यावर युद्ध बंद होईल.   स्त्रिया, किन्नर, सेवक  हे युद्धात भाग घेणार नाही आणि यांच्यावर  कुणी हात ही उचलणार नाही. अश्या अनेक बाबींवर सर्वांचे एकमत झाले.

 

अचानक शकुनी म्हणाला, पण काही लोक एका जन्मात काही काळ स्त्री म्हणून राहतात आणि काही काळ पुरुष म्हणून, अश्या लोकांना युद्धात भाग घेता येईल का? पितामह म्हणाले, असे लोक किन्नर समान असतात, धर्मानुसार यांना युद्धात भाग घेता येणार नाही.  पितामह म्हणाले धृष्टद्युम्न, शिखंडी, पूर्वी शिखण्डीनी होता, स्थूलकर्ण या यक्षाने त्याला पुरुषत्व प्रदान केले असेले तरी ही तो या जन्मांत स्त्री आणि पुरुष दोन्ही रुपात वावरला आहे म्हणून त्याला युद्धात भाग घेता येणार नाही. शिवाय तो गेल्या जन्मी स्त्री होता अशी ही वाच्यता आहे.  धृष्टद्युम्न उतरला, पितामह, पण शिखंडीगेल्या जन्मी स्त्री होता, त्याला काही पुरावा नाही. या घटकेला  तो पुरुष आहे, हेच सत्य. शिखंडी  पांडवांचा एक प्रमुख सेनापती आहे. तरी ही पितामह तुमचा आदर म्हणून  तुम्ही जर शिखंडी वर शस्त्र उचलण्याचा  निर्णय घेतला असेल तर शिखंडी ही तुमच्या वर शस्त्र उचलणार नाही, हे वचन मी देतो.

  

शकुनीच्या म्हणाला, शिखंडीचे एक वेळ चालेल, तो आपणहून स्त्री म्हणून वावरत नव्हता. शिवाय एका यक्षाने त्याला पुरुषत्व प्रदान केले असल्यामुळे, त्याला पुरुष मानता येते. पण जो  पुरुष असूनही स्त्रियांप्रमाणे राजा विराटच्या रनिवासात वावरत होता.  अश्या ब्रह्न्नलेला स्त्री समजावे कि पुरुष? अश्या किन्नरा बरोबर आम्ही युद्ध करणार नाही. युद्धाच्या नियमानुसार त्याला युद्धापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.  सात्यीकी  रागाने म्हणाला, अजून युद्धाला सुरुवात झाली नाही, आणि तुम्ही अर्जुनाला घाबरून त्याला युद्धापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र करीत आहात. त्याचे वाक्य मधेच तोडत दुर्योधन उतरला, सात्यीकी, अर्जुनापेक्षा ही श्रेष्ठ धनुर्धर असा माझा प्रिय मित्र कर्ण आहे. तो भीष्म सेनापती असें युद्धात उतरणार नाही असा त्याचा निश्चय आहे. तरी ही आम्ही  युद्धात उतरलो आहे. पितामह भीष्म, गुरु द्रोण सारखे सेनानी असल्यामुळे आम्हाला अर्जुनाची मुळीच भीती नाही. प्रश्न तत्वाचा आहे, अर्जुनाला जर किन्नर मानले, तर तो युद्धास अपात्र ठरेल. पितामह भीष्म धर्मवेत्ता आहे, ते जो काही निर्णय करतील आम्हाला मान्य आहे. 

 

पितामह  म्हणाले सेनापती धृष्टद्युम्न,  अर्जुन काही काळ स्त्री वेशात वावरला, हे सत्य आहे. धर्मानुसार तो युद्ध करण्यास अपात्र आहे. यावर धृष्टद्युम्न म्हणाला, पितामह हा अन्याय आहे, आम्हाला तुमचा निर्णय स्वीकार्य नाही. पितामह उतरले, धृष्टद्युम्ना, मी आपला निर्णय ऐकविला आहे, माझा निर्णय मान्य आहे कि नाही हे ठरविण्याचा अधिकार  धर्मराज युधिष्ठिर  यांना आहे, तुला नाही. बैठक समाप्त झाली. सात्यकी आणि धृष्टद्युम्न निघून गेल्या वर, दुर्योधन शकुनीस  म्हणाला, मामाश्री, पास  तर तुम्ही मस्त टाकला, काही फायदा होईल का? शकुनी म्हणाला, बघू  या, कर्ण युद्धात उतरणार नाही आहे, आता अर्जुन जर युद्धापासून दूर झाला तर उत्तमच , आपल्याला युद्ध सहज जिंकता येईल.


पांडवांच्या छावणी कडे परतताना, धृष्टद्युम्न सात्यीकीला म्हणाला, मला चिंता वाटते, महाराज युधिष्ठिर यांनी, पितामह भीष्म यांचा निर्णयाचा स्वीकार केला तर काय होईल. सात्यीकी हसत-हसत म्हणाला, कशाला चिंता करतो मित्र, मी माझ्या कृष्णाला चांगलेच  ओळखतो. या भारतीय युद्धात ठरलेल्या कुठल्या ही नियमांचे पालन होणार नाही. युद्ध जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष कुठल्या ही थरावर जातील, हे या घटकेला सांगणे अशक्य. पण एक सांगतो, अर्जुन शिखंडीच्या मागे उभा राहून पितामह वर बाणांचा वर्षाव करीत आहे, हे दृश्य मला आत्ताच डोळ्यांसमोर दिसत आहे.  मित्र, दुर्योधन आणि शकुनी यांनी किती ही कट-कारस्थान रचले तरी ही या युद्धात आपलाच विजय होणार आहे. कृष्ण सारखा कुटील या जगात कुणी ही नाही. जिथे कृष्ण तिथे धर्म आणि तिथेच विजय.