Saturday, May 3, 2014

भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ?

   

युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी बरोबर धनुर्धारी, पदाती बरोबर पदाती युद्ध करेल. सूर्यास्त झाल्यावर युद्ध बंद होईल.   स्त्रिया, किन्नर, सेवक  हे युद्धात भाग घेणार नाही आणि यांच्यावर  कुणी हात ही उचलणार नाही. अश्या अनेक बाबींवर सर्वांचे एकमत झाले.

 

अचानक शकुनी म्हणाला, पण काही लोक एका जन्मात काही काळ स्त्री म्हणून राहतात आणि काही काळ पुरुष म्हणून, अश्या लोकांना युद्धात भाग घेता येईल का? पितामह म्हणाले, असे लोक किन्नर समान असतात, धर्मानुसार यांना युद्धात भाग घेता येणार नाही.  पितामह म्हणाले धृष्टद्युम्न, शिखंडी, पूर्वी शिखण्डीनी होता, स्थूलकर्ण या यक्षाने त्याला पुरुषत्व प्रदान केले असेले तरी ही तो या जन्मांत स्त्री आणि पुरुष दोन्ही रुपात वावरला आहे म्हणून त्याला युद्धात भाग घेता येणार नाही. शिवाय तो गेल्या जन्मी स्त्री होता अशी ही वाच्यता आहे.  धृष्टद्युम्न उतरला, पितामह, पण शिखंडीगेल्या जन्मी स्त्री होता, त्याला काही पुरावा नाही. या घटकेला  तो पुरुष आहे, हेच सत्य. शिखंडी  पांडवांचा एक प्रमुख सेनापती आहे. तरी ही पितामह तुमचा आदर म्हणून  तुम्ही जर शिखंडी वर शस्त्र उचलण्याचा  निर्णय घेतला असेल तर शिखंडी ही तुमच्या वर शस्त्र उचलणार नाही, हे वचन मी देतो.

  

शकुनीच्या म्हणाला, शिखंडीचे एक वेळ चालेल, तो आपणहून स्त्री म्हणून वावरत नव्हता. शिवाय एका यक्षाने त्याला पुरुषत्व प्रदान केले असल्यामुळे, त्याला पुरुष मानता येते. पण जो  पुरुष असूनही स्त्रियांप्रमाणे राजा विराटच्या रनिवासात वावरत होता.  अश्या ब्रह्न्नलेला स्त्री समजावे कि पुरुष? अश्या किन्नरा बरोबर आम्ही युद्ध करणार नाही. युद्धाच्या नियमानुसार त्याला युद्धापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.  सात्यीकी  रागाने म्हणाला, अजून युद्धाला सुरुवात झाली नाही, आणि तुम्ही अर्जुनाला घाबरून त्याला युद्धापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र करीत आहात. त्याचे वाक्य मधेच तोडत दुर्योधन उतरला, सात्यीकी, अर्जुनापेक्षा ही श्रेष्ठ धनुर्धर असा माझा प्रिय मित्र कर्ण आहे. तो भीष्म सेनापती असें युद्धात उतरणार नाही असा त्याचा निश्चय आहे. तरी ही आम्ही  युद्धात उतरलो आहे. पितामह भीष्म, गुरु द्रोण सारखे सेनानी असल्यामुळे आम्हाला अर्जुनाची मुळीच भीती नाही. प्रश्न तत्वाचा आहे, अर्जुनाला जर किन्नर मानले, तर तो युद्धास अपात्र ठरेल. पितामह भीष्म धर्मवेत्ता आहे, ते जो काही निर्णय करतील आम्हाला मान्य आहे. 

 

पितामह  म्हणाले सेनापती धृष्टद्युम्न,  अर्जुन काही काळ स्त्री वेशात वावरला, हे सत्य आहे. धर्मानुसार तो युद्ध करण्यास अपात्र आहे. यावर धृष्टद्युम्न म्हणाला, पितामह हा अन्याय आहे, आम्हाला तुमचा निर्णय स्वीकार्य नाही. पितामह उतरले, धृष्टद्युम्ना, मी आपला निर्णय ऐकविला आहे, माझा निर्णय मान्य आहे कि नाही हे ठरविण्याचा अधिकार  धर्मराज युधिष्ठिर  यांना आहे, तुला नाही. बैठक समाप्त झाली. सात्यकी आणि धृष्टद्युम्न निघून गेल्या वर, दुर्योधन शकुनीस  म्हणाला, मामाश्री, पास  तर तुम्ही मस्त टाकला, काही फायदा होईल का? शकुनी म्हणाला, बघू  या, कर्ण युद्धात उतरणार नाही आहे, आता अर्जुन जर युद्धापासून दूर झाला तर उत्तमच , आपल्याला युद्ध सहज जिंकता येईल.


पांडवांच्या छावणी कडे परतताना, धृष्टद्युम्न सात्यीकीला म्हणाला, मला चिंता वाटते, महाराज युधिष्ठिर यांनी, पितामह भीष्म यांचा निर्णयाचा स्वीकार केला तर काय होईल. सात्यीकी हसत-हसत म्हणाला, कशाला चिंता करतो मित्र, मी माझ्या कृष्णाला चांगलेच  ओळखतो. या भारतीय युद्धात ठरलेल्या कुठल्या ही नियमांचे पालन होणार नाही. युद्ध जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष कुठल्या ही थरावर जातील, हे या घटकेला सांगणे अशक्य. पण एक सांगतो, अर्जुन शिखंडीच्या मागे उभा राहून पितामह वर बाणांचा वर्षाव करीत आहे, हे दृश्य मला आत्ताच डोळ्यांसमोर दिसत आहे.  मित्र, दुर्योधन आणि शकुनी यांनी किती ही कट-कारस्थान रचले तरी ही या युद्धात आपलाच विजय होणार आहे. कृष्ण सारखा कुटील या जगात कुणी ही नाही. जिथे कृष्ण तिथे धर्म आणि तिथेच विजय. 

No comments:

Post a Comment