Wednesday, October 10, 2018

अहरित क्रांतीच्या जाळ्यात बळीराजा.


देशात हरित क्रांती झाली. खाद्यान्न उत्पन्न कित्येक पट वाढले. बळीराजाच्या घरी मात्र लक्ष्मी आली नाही. विचार केला कारण काय असावे. म्हणतात ना! प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. हरित क्रांतीची मागची बाजू म्हणजे अहरित क्रांती. आज बळीराजा या अहरित क्रांतीच्या जाळ्यात न कळत अडकलेला आहे. 

पहिले शेतकर्यांच्या घरात स्वत:चे बियाणे राहायचे. त्या साठी रुपये  मोजावे लागायचे नाही. आता बियाणे शेतकर्या जवळ नाही. बाजारातून भारी किंमत देऊन विकत घ्यावे लागतात. शिवाय बियाण्यांवर विदेशी कंपन्यांचा कब्जा झालेला आहे. 

पहिले बळीराजापाशी बैल जोडी होती. शेण व मूत्र होते. बैलाचा उपयोग शेतीच्या कामांसाठी, शेताला पाणी देण्यासाठी व्हायचा. शेणाचा उपयोग खतांसाठी. मूत्राचा उपयोग परंपरागत ज्ञानाचा आधारावर कीटनाशक इत्यादी बनविण्यासाठी करायचा. आता खत बाजारातून विकत घ्यावी लागतात. किटनाशक इत्यादीं साठी हि पैशे मोजावे लागतात. शेत नांगरण्यासाठी ट्रक्टर भाड्याने घ्यावे लागते किंवा विकत घ्यावे लागते.  

पहिले बैलांच्या मदतीने शेताला पाणी दिले जायचे. बैलांना मदतीतून जमिनीतून जास्त खोलातून पाणी उचलणे शक्य नव्हते पण आता ट्यूबवेलच्या मदतीने ३००-४०० फूट खोलातून पाणी उचलले जाते. परिणाम शेतातील पाणी हि संपले. पाण्यासाठी लाखो रुपये शेतकर्याला मोजावे लागतात.

पहिले शेतकरीच ठरवायचा कुठले पीक घ्यायचे. हरित क्रांती सोबत एमएसपी, नावाचा सरकारी प्रकार आला आणि पीक घेण्याचे स्वातंत्र्य हरवले. शेतकरी जास्त नफ्याच्या मागे लागला. त्यासाठी जास्त पाणी आणि जास्त खत व किटनाशक वापरू लागला. 

पहिले शारीरिक मेहनत जास्त आणि खर्च कमी होता. पीक हातातून गेले तर नुकसान कमी व्हायचे. पण आता एक पीक जरी हातातून गेले किंवा भाव नाही मिळाला तर शेतकर्याला जबरदस्त नुकसान होते. आज जवळपास सर्वच शेतकरी कर्जबाजारी आहे. आज कर्जाला कंटाळून शेतकार्यांनी आत्महत्या करणे  सामान्य  बातमी आहे.

सारांश, पहिले शेतकरी आत्मनिर्भर होता, शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य त्याच्या घरातच होते. आता तो परावलंबी झाला, भारी पैशे मोजून सर्व साहित्य विकत घ्यावे लागते. परिणाम, हरित क्रांतीने खाद्यान्न उत्पादन वाढले, पण अहरित क्रांतीने शेतकर्यांचे दिवाळे काढले. हेच आजचे सत्य आहे.

No comments:

Post a Comment