गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी तिची दिल्लीची पाव भाजी खाण्याची इच्छा राहून गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे. वयाने मोठा झालो असलो तरी एखाद्या शैतान मुलासारखे दुसर्यांची विशेष करून बालगोपाळांची फिरकी घ्यायला अजूनही आनंद मिळतो. सौ.ला आमची कल्पना काही विशेष आवडली नाही. पण तिने विरोध हि केला नाही फक्त एवढेच म्हंटले, मी काही यात मदत करणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा.
रविवारी सकाळी चहा पिऊन, जवळपास ६ वाजता भाज्या चिरायला घेतल्या. घरी बाजी चिरण्यासाठी लाकडाचा ट्रे आहे. चाकूने बारीक बारीक भाज्या चिरायचे ठरविले. सर्व प्रथम ३-४ बटाटे (२५०ग्राम) बारीक चिरले, नंतर लाल भोपळा आणि दुधी भोपळा (प्रत्येकी २५० ग्राम) वरचे जाड साल काढून बारीक चिरला. एक वांगे (वरचे साल काढून टाकले) बारीक चिरले. वांग्यामुळे भाजीला एक वेगळा तेज स्वाद येतो. एक फुलगोबी (फ्लावर- ३०० ग्रामचे असेल) बारीक चिरले. मटार २५०ग्राम (एक वाटी) घेतला. दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून टाकल्या. या शिवाय लोबियाच्या हिरव्या शेंगा (मराठीत काय म्हणतात माहित नाही- तश्या कुठल्याही शेंगा चालतील) बारीक चिरून टाकल्या. ५ लिटरचे कुकर भाज्यांनी भरून गेल्यावर भाज्या कापणे बंद केले. भाज्या चिरायला १ तास लागला.

आता दीड गिलास पाणी टाकून कुकर गॅस वर ठेवले. एक पूर्ण लसूण,८-१० हिरव्या मिरच्या आणि १ इंच अदरक यांची पेस्ट तैयार करून घेतली. अर्धा किलो टमाटर (आंबट वाले नको) आणि अर्धा किलो कांदे बारीक चिरले. या पैकी काही फोडणी साठी आणि काही नंतर सर्व करण्यासाठी. एक जुडी कोथिंबीरआणि तीन लिम्बांचे चार-चार तुकडे करून ठेवले. दोन शिट्या झाल्यावर कुकर गॅस वरून उतरवून घेतले. तो पर्यंत चिंकीचे हि घरात पदार्पण झाले होते. काका कशी भाजी बनवितात आहे,हे पाहण्यासाठी स्वैपाकघरात आली. त्या वेळी मी पनीर (२५० ग्राम) बारीक चिरीत होतो. तिला पाहताच मी गुगली फेकली, म्हणालो चिंता करून नको तुझ्या आवडीच्याच भाज्या आहेत, यात फ्लावर, बटाटे, बिन्स आणि पनीर आहे. शिवाय माझ्या सारखा अडाणी तुझ्या सारख्या डॉक्टरीण बाईला मूर्ख बनवू शकतो का? काका तू किनई,.... म्हणत ती बाहेर पडली. तिने कुकर उघडून पाहण्याची जुर्रत केली नाही. हायसे वाटले. आता वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. घरात एक मोठी कढई आहे. ती गॅस वर ठेवली. २-३ डाव तेल टाकले. एक चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडलल्या वर अदरक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. नंतर कांदे घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर, टमाटर टाकले. टमाटरला तेल सुटे पर्यंत ४-५ मिनिटे लागतातच. तो पर्यंत वाट पहावीच लागते. घाई केल्यास टमाटर व्यवस्थित तळल्या जात नाही. अपेक्षित स्वाद हि मिळत नाही. कुकर उघडून, एका पळीने भाजी ढळवून काढली. टमाटरला तेल सुटू लागल्यावर, १ मोठा चमचा, हळद, तिखट आणि गरम मसाला आणि २ चमचे धने पूड त्यात घातली. नंतर भाजी घातली. आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून जास्त पाणी घातले नाही. नंतर बारीक चिरलेले पनीर त्यात घातले. एक उकळी आल्यावर तीन चमचे MDH पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ त्यात घातले. २-३ मिनिटानंतर गॅस बंद केला. कुठलाही पदार्थ झाल्यावर चिरंजीवाला स्वाद पाहण्यासाठी बोलवतोच. त्याची पावती मिळाली म्हणजे पदार्थ चांगला झाला आहे, हे समजावे. त्यांनी टेस्ट करून पावती दिली. मी स्वैपाक घरातून बाहेर आलो. घामाघूम झाल्यामुळे सरळ स्नान घरात जाऊन आंघोळ केली. तो पर्यंत सौ. ने स्वैपाकघराचा ताबा घेतला होता. घरात काढलेल्या लोण्यात पाव परतून पावभाजी सर्व केली.

चिंकीला पाव भाजी भारी आवडली. तरी हि तिने म्हंटले, मला माहित आहे काका, तुम्ही निश्चित मला न आवडणार्या भाज्या यात घातल्या असतील. आम्ही सर्व जोरात हसलो...
No comments:
Post a Comment