कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार.
हा खेळ
बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून
जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतली
नाचविणार्याचे हात दिसायचे. क्षणात स्वप्न
भंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची.
एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार
करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या
प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो. प्रजेला कष्ट देणार्यांना चोर, डाकू,
तस्कर, काळाबाजार करणार्यांना धडा शिकवितो. सर्वत्र आनंदी आनंद. लोक हि टाळ्यावाजवून
राजाची प्रशंसा करतात. खेळ संपतो.
एकदा असाच खेळ सुरु होता. पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र धारण करून, पांढर्या शुभ्र
घोड्यावर स्वार इमानी राजा मंचावर
अवतारला. येताच त्याने आरोळी ठोकली, प्रधानजी
कुठे आहात. अचानक, काळ्या घोड्यावर स्वार एक काळाकुट्ट माणूस मंचावर प्रगटला. राजाने
विचारले, कोण रे तू, आणि एवढा काळा का.? लोक तुला पाहून घाबरतील. त्याने राजाला मुजरा करीत म्हंटले, महाराज, मी
तुमचा प्रधान. पूर्वी मी असा काळा नव्हतो. काळ्याकुट्ट अमावस्याच्या रात्रीत मी
काळ्या लक्ष्मीची कठोर अघोरी उपासना केली. काळ्यालक्ष्मीची कृपा मजवर झाली.
त्यामुळे मी असा काळा आहे. मला आपल्यासोबत राज्याच्या दौऱ्यावर घेऊन चला, काळ्या
लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हि होईल. त्याचे बोलणे ऐकून, राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण
राजाने असे काहीही केले नाही. माणसाच्या हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या
नशीबात होते. तेवढ्यात संगीत सुरु झाले, घोड्यांच्या टापा आणि माणसाचा आवाज
गुंजला, आधीच उशीर झाला आहे, चला प्रधानजी निघू या, टप टप, दुड दुड करत राजा काळ्याकुट्ट
प्रधानासोबत दौर्यावर निघाला, प्रजेच्या कल्याणासाठी ????
No comments:
Post a Comment