सन १९८५ची गोष्ट असेल. नागपूरहून दिल्लीला परत येत होतो. गुप्ता (टोपणनाव) नावाच्या एका इसमाशी परिचय झाला. २७-२८ एक वर्षाचे वय असेल, माझ्या वयापेक्षा थोडे जास्त. लवकरच आमची गट्टी जमली. तो धंद्याच्या कामानिमित्त दिल्लीला चालला होता. त्याने पत्रकारिताचा अभ्यास केला होता. विदर्भात एका हिंदी वर्तमानपत्रात काही महिने त्याने उपसंपादक या पदावर काम केले होते. परंतु त्याला ती नौकरी सोडावी लागली. मी त्याचे कारण विचारले. तो म्हणाला सत्यं वद धर्मम चर असे शास्त्रात म्हंटले आहे, पण असत्यं वद, धनं चर असे कुठेच म्हंटलेल नाही. शास्त्र नियमांचे पालन केले, त्याचेच परिणाम भोगावे लागले.
पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केल्यावर त्याला, एका वर्तमानपत्रात उपसंपादक पदाची नौकरी मिळाली. नवीन नौकरी, साहजिकच रात्री पाळीची ड्युटी. रात्री ११ वाजता वर्तमान पत्र छापण्याचे काम सुरु व्हायचे. त्या दिवशी रात्रीचे ९ वाजले होते. अचानक एक ताजी बातमी मिळाली. एका मोठ्या ब्रान्डेड, मिठाईच्या दुकानदारावर छापा पडला होता. त्याने ती बातमी छापायचा निश्चय केला. तासभराने त्याला फोन आला. 'साहेब, मी मिठाईच्या दुकानदाराचा मेनेजर बोलतो आहे, तुम्ही ती बातमी छापू नका'. गुप्ताने उत्तर दिले, वर्तमानपत्र छापण्याची तैयारी पूर्ण झाली आहे, बातमी काढणे आता शक्य नाही. दुसरी कडून उत्तर आले, 'साहेब अजून तास भराचा अवकाश आहे, शिवाय आम्ही तुम्हाला विज्ञापन हि देतो'. विज्ञापन देऊन काही उपकार करत नाही, आम्ही नाही छापली तरी दुसरे छापतीलच, उद्या मला या बाबत विचारले तर मी काय उत्तर देणार म्हणत रागानेच गुप्ताने फोन ठेवला.
अर्धा तास आणखीन गेला असेल, एक माणूस मिठाईचा डब्बा घेऊन, गुप्ताचा केबिन मध्ये शिरला. शिरताच म्हणाला, 'साहेब, मला कळले आहे, तुम्ही इथे नुकतेच आला आहात, तुम्हाला या धंद्याची कल्पना नाही. कुठल्या हि वर्तमानपत्रात हि बातमी येणार नाही याचा बंदोबस्त आम्ही केला आहे. उद्या जर तुमच्या वर्तमान पत्रात हि बातमी छापल्या गेली तर आमचे नाव उगाच खराब होईल आणि आपले संबंध हि. हि छोटीसी भेट घेऊन इथे आलो आहे म्हणत मिठाईचा डब्बा समोर ठेवला. गुप्ताने विचारले काय आहेत यात. साहेब, मिठाई आहे, शुद्ध देसी तुपातली. काळजी करू नका यात काही भेसळ नाही. साहेब एवढे मोठे दुकान आहे, काही शाखा हि आहेत. कुठवर लक्ष ठेवणार आम्ही. कधी कधी चूक होतेच. त्यासाठी आम्हाला बदनाम करावे हे उचित नाही. तुमच्या वर्तमानपत्रात हि कधी-कधी चुकीच्या बातम्या छापल्या जातात. पुढच्या अंकात क्षमा मागून तुम्ही तो विषय संपवतात. त्याने डब्बा उघडून गुप्ता समोर ठेवला. यात मिठाई सोबत १००० रुपये हि आहेत, तो म्हणाला. पैशे पाहून गुप्ताचे डोके सटकले,तो ओरडला, हे काय आहे, मला काय समजले आहे, इथून तत्काळ निघून जा. अन्यथा धक्के मारून बाहेर काढेन. त्या माणसाला हि राग आला, जाता जाता म्हणाला, साहेब, आमचे तर काही नुकसान होणार नाही, थोड्या दिवसांत लोक विसरून जातात. पण तुम्हाला याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
जवळपास ७-८ दिवसांनी, वर्तमानपत्राच्या संपादकानी गुप्ताला ऑफिसमध्ये बोलविले. गुप्ता संपादकाच्या केबिनमध्ये गेला. संपादकाने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले. संपादक महोदय शांत आवाजात म्हणाले, गुप्ता, आपल्या ऑफिसमध्ये फोन आहे, कुठलीही विवादास्पद बातमी छापण्या आधी, किमान मला तरी विचारले पाहिजे होते.
गुप्ताला थोडी कल्पना आली, तरी हि त्याने विचारले, कुठली बातमी.
'ती छाप्यावाली बातमी छापण्या आधी मला का नाही विचारले'.?
गुप्ता म्हणाला, मला तशी गरज वाटली नाही. शिवाय त्यांचा माणूस मला रिश्वत देत होता. ते लोक चुकीचे काम करतात. त्यानां धडा मिळालाच पाहिजे.
संपादक म्हणाले, हे सर्व मलाही कळते. पण आपल्या वर्तमानपत्रात शनिवारी आणि रविवारी त्यांचे पूर्ण पानभर विज्ञापन राहते. त्यांनी आपल्या वर्तमान पत्राला विज्ञापन न देण्याचा निर्णय घेतला आहे आणि गेल्या शनिवार आणि रविवारी आपल्या वर्तमानपत्राला त्यांचे विज्ञापन मिळाले नाही. आपण जर त्यांचा स्वार्थ जपणार नाही तर दुसरे लोक हि आपल्या वर्तमान पत्रात विज्ञापन देण्याचे टाळतील. स्वार्थाची दुनिया आहे हि. आता तूच सांग बिना विज्ञापनाचे वर्तमान पत्र चालविणे शक्य आहे का?
या वर गुप्ता मौन राहिला. संपादक पुढे म्हणाले, आपल्या मालकांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहे. ते पुन्हा विज्ञापन द्यायला तैयार झाले आहेत, फक्त एका अटीवर.
गुप्ताने विचारले कुठल्या अटीवर. संपादक म्हणाले, तुला नौकरी सोडावी लागेल.....
मी विचारले, पुढे काय झाले. गुप्ता म्हणाला होणार काय, राजीनामा दिला. त्याच दिवशी शपथ घेतली, पुन्हा वर्तमानपत्रात तर सोडा कुठे हि नौकरी करायची नाही. एक छोटेसे दुकान उघडले आहे. दिल्लीच्या सदर बाजारातून माल मागवितो आणि नागपूरला विकतो. जास्त नाही, पण पोट-पाण्याचा प्रश्न कि सुटलेला आहे. आता कुठले हि वर्तमानपत्र वाचीत नाही. बातम्यांवर विश्वास ठेवीत नाही. पत्रकारीताची डिग्री हि अग्नीदेवाला समर्पित करून टाकली आहे.
त्या काळी, एक मोठा मिठाईचा दुकानदार, छोट्या शहरात एका वर्तमान पत्राला आपल्या इशार्यावर नाचवू शकत होता. आज मोठे व्यवसायिक आणि सरकार हि कोट्यावधी रुपये विज्ञापनांवर खर्च करतात. समाचार वाहिनी चालवायला हि कोट्यावधी रुपयांची गरज असते. अश्या परिस्थितीत ब्रेकिंग न्यूज इत्यादींवर विश्वास कसा ठेवायचा? विशिष्ट उद्देश्याने चर्चा सुरु ठेवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त दराने विज्ञापन दिल्याचे नुकतेच ऐकिवात आले आहे. जुना किस्सा आठवला.
आजकालचे पत्रकार मोठ्या- मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात. कोठी, कार आणि बंगला त्यांना सहजच प्राप्त होतो. मान-सम्मान, पद-प्रतिष्टा आणि धन मिळत असेल तर सत्यं वद धर्मम चरला कोण विचारणार. अधिकांश पत्रकारांच्या दृष्टीकोणातून असत्यं वद धनं चर हीच आजची पत्रकारिता आहे.
chan
ReplyDelete