Tuesday, June 23, 2015

फादर्स डे स्पेशल -मिक्स पनीर भाजी (झणझणीत नागपुरी स्टाईल)


रविवारचा दिवस होता तरी सकाळी योग पाहण्यासाठी सकाळी ६ वाजताच उठलो. योग संपण्याचा आधीच आमच्या भागात पाऊस सुरु झाला.  सकाळी ९ वाजता आमच्या चिरंजीवाने ‘हैप्पी फादर्स डे’ केले. संध्याकाळी बाजारातून २५०ग्रम पनीर घेऊन आलो होतो. आल्यावर सौ. ला म्हंटले आज फादर्स डे आहे. शाही पनीर करते का? सौ. उतरली, मिक्सर खराब झाले आहे. मोटर कामातून गेली आहे. गेल्याच वर्षी ठीक केली होती. आता नवीन ‘फूड प्रोसेसर’ घेऊन  मगच  अश्या ग्रेवीवाल्या भाज्या करायचा ऑर्डर करा.
च्यायला सौ.चा मूड पार बघडलेला पाहून, सौ.ला खुश करणे गरजेचे होते.  मी म्हणालो, आता पनीर आणले आहे, तर मीच करतो काहीतरी. फादर्स डेला फादरने काहीतरी केलेच पाहिजे. फ्रीज उघडला, त्यात शिमला मिरच्या (ढोबळी मिरची) होत्या  ४ उचलल्या (१५० ग्रम), थोड्या हिरव्या शेंगा (काय म्हणतात ते फ्रेंच बिन्स) उरलेल्या होत्या त्या सर्व घेतल्या. मला कधी-कधी कळत नाही, बायका थोडी भाजी उरवून का ठेवतात? चिरताना आळस येतो कि बायकांना अशी सवयच असते. कारण एक दिवस आधी फ्रेंच बिन्सची भाजी केली होती.  आकारानुसार हिरवी मिरची (३-४), टमाटर (३-४), लसूण (७-८ पाकळ्या), आले एक तुकडा आणि कांदा (२ मध्यम आकाराचे). आधी हिरवी मिरची, लसूण आले, बारीक चिरून घेतले. नंतर साबणाने हात धुऊन घेतला. हात नाही धुतले तर चुकून मिरचीचा हात डोळ्यांना हा लागतोच. (नवऱ्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले कि बायकांना खुश होण्याचा मौका मिळतो). हिरव्या शेंगा बारीक चिरून घेतल्या. जमेल त्या आकृतीचे कांदे, टमाटर आणि शिमला मिरची चिरून घेतली. आपल्यालाच भाजी खायची आहे कशीही चिरली तरी चालते.  
 

 आता झणझणीत नागपुरी स्टाईलची पनीरची भाजी बनविण्याचे ठरविले. चांगले ३-४ टेबल स्पून तेल कढ़ाईत टाकले,(तेल भरपूर टाकले कि भाजी आपसूक चांगली बनते, अनुभवाचे बोल आहेत हे, खास करून वांगे [मुटे साहेबांच्या शेतातले मिळाले तर अति उत्तम]).  तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली, मोहरी फुटल्यावर,  तमालपत्र, दालचिनी आणि २ लवंग टाकल्या नंतर  बारीक चिरलेली मिरची, आले आणि लसूण टाकले. १-२ मिनिटे परतल्यावर ३ वाळलेल्या लाल मिरच्या टाकल्या (आमच्या साळीने खास मध्यप्रदेशातून पाठविलेल्या, भयंकर जळजळीत आहेत त्या मिरच्या). नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या शेंगा टाकल्या. शेंगा तेलावर परतल्यामुळे भाजीत त्यांच्या स्वाद ही मस्त आला.  त्या थोड्या परतल्यावर, हळद, तिखट (झणझणीत पाहिजे असेल तर ३-४ चमचे ही चालतील), २ चमचे धने पूड, १ चमचा गोड  मसाला टाकला. नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि पनीरचे तुकडे त्यात टाकले. (पनीरचे तुकडे कापत असताना ते ५० ग्रम कमी झाले, कसे कळले नाही).   चवीनुसार मीठ ही त्यात टाकले. गॅस मध्यम करून ४-५ मिनिटांसाठी झाकण ठेवले. नंतर त्यात शिमला मिरची मिसळी. पुन्हा २ मिनिटे झाकण ठेवले आणि गॅस बंद केला. (शिमला मिर्च जास्ती शिजवली तर तिचा स्वाद बिघडतो).

भाजी खरोखरच मस्त आणि झणझणीत झाली होती.  जेवण झाल्यावर चिरंजीवाने बाजारातून आणलेल्या खास अमूल मिक्स फ्रुट आईसक्रिमला कापून फादर्स डे साजरा केला. (अमूलच्या मिक्स फ्रुट आईसक्रिमचा स्वाद चांगला आहे, लहान मुलांना निश्चित आवडेल).

 

No comments:

Post a Comment