Tuesday, June 30, 2015

रामायण कथा - रुमा - एक मूक स्त्री



रामायणात रुमाची ओळख सुग्रीव पत्नी असे आहे. जिथे ताराच्या प्रखर व्यक्तित्वाची जाणीव रामायणात होते,  तिथे रुमाच्या अस्तित्वाची जाणीवच होत नाही. कारण स्पष्ट आहे, रुमा एक सामान्य स्त्री होती. सर्व अन्याय चुपचाप सहन करणारी.  अश्या सामान्य स्त्री साठी कोण कवी आपले शब्द सामर्थ्य खर्च करेल.  तरीही तिला काय सहन करावे लागले याची कल्पना आपण करू शकतो.

वानर समाजात पतीच्या मृत्यू नंतर  स्त्री पुन:विवाह करू शकत होती. वालीने जर सुग्रीवचा वध केला असता तर रुमाला सुग्रीवच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा तरी मिळाला असता. पण वालीने सुग्रीवचा वध केला नाही अपितु त्याला पळवून लावले आणि त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याची पत्नी रुमा हिला आपल्या जवळ ठेवले. वानर समाजात ही नवरा जिवंत असताना, स्त्री दुसरा पती करू शकत नव्हती. बिना विवाह न करता परपुरुषा बरोबर संबंधाना त्या काळी समाजात मान्यता नव्हती.  सुग्रीव जिवंत असल्यामुळे रुमाला वालीच्या कनिष्ठ पत्नीचा दर्जा मिळणे सुद्धा अशक्य होते. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर  रुमा वालीची केवळ भोगदासी होती. वालीने तिच्या बरोबर जबरदस्तीचे शारीरिक संबंध निश्चितच ठेवले असतील आणि त्या संबंधातून अपत्य ही झाले असतील. त्या काळच्या परंपरेनुसार अवैध संबंधातून होणार्या  अपत्यांना वानर समाजात ही दासीपुत्रांचा  दर्जाच मिळाला असेल. अश्या दयनीय परिस्थितीत रुमाला  जगावे लागले. त्या वेळी  तिला  किती मानसिक त्रास होत असेल, याची कल्पना करणे ही अशक्य.  

सुग्रीव पुन्हा राजा झाला.  म्हणायला रुमा किष्किंधा नगरीची पट्टराणी झाली होती.  पण  सुग्रीवच्या हृदयाची पट्टराणी तर ताराच होती. सुग्रीव  अधिकांश वेळ तारेचाच निवासी राहायचा. राजदरबारात ही तारेचीच चलती होती. कठीण प्रसंगी सुग्रीव तारेचाच सल्ला घ्यायचा. एकारितीने तारा त्याची तारणहार होती.  एवढेच नव्हे, रुमाच्या जखमेवर मीठ म्हणून तारेचा पुत्र अंगद किष्किंधानगरीचा युवराज झाला होता. भविष्यात तोच  राजा होणार होता.  हे सर्व पाहून रुमाच्या मनात किती जळफळाट होत असेल, सध्या मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या खंडोबा या मालिकेत 'बानू' वरून  खंडोबाच्या प्रथम पत्नी म्हाळसाबाईचा होणारा जळफळाट पाहून आपण कल्पना करू शकतो.

वाली पासून उत्पन्न होणार्या रुमाच्या पुत्रांचे भविष्य तर अंधकारमय होतेच. सुग्रीव पासून उत्पन्न पुत्रांवर ही एकारितीने म्हणाल तर अन्यायच झाला होता. राजाचे पुत्र असूनही ते सिंहासनाचे अधिकारी नव्हते.  

पट्टराणी असूनही  रुमाने  सर्व अन्याय  निमूटपणे सहन केला.  त्या  विरुद्ध आपला आवाज कधीच उठविला नाही.  अत्याचार सहन करणाऱ्या दुर्बल लोकांचा इतिहास कधीच गुणगान करत नाही.  कुठल्या ही कवी, चारण, भाट यांना त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा मिळत नाही. साहजिकच आहे रूमाला ही कुणी  लक्षात ठेवले नाही.


रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ

रामायण कथा : सीता ???

 


 







2 comments:

  1. खुपच छान. कधी ऐकण्यातही नसलेले वाचकांसमोर आणल्याबद्दल आभार.

    ReplyDelete