Monday, June 2, 2025

समर्थ विचार: कीर्तनकार आणि कीर्तन



हा लेख लिहाण्यापूर्वी अनेक विठू माऊलीचे गुणगान करणार्‍या आणि संतांच्या गाथा सांगणार्‍या वारकरी संप्रदायांच्या आणि इतर कीर्तनकारांचे कीर्तन यूट्यूब वर बघितले. कीर्तन बघताना मला जाणवले अनेक कीर्तनकारांना कीर्तनाचा उद्देश्य ही माहीत नाही. ते श्रोत्यांना प्रसन्न करण्यासाठी पांचट आणि राजनीतिक विनोद करतात. बहुतेक जास्त प्रसिद्धी आणि बिदागी साठी श्रोत्यांच्या मनोरंजनावर भर दिला जातो. ते संतांच्या कधी न केलेल्या चमत्कारांच्या गाथा ऐकवितात. आज महाराष्ट्रात आणि देशात कीर्तनाच्या माध्यमाने सत्य आणि धर्म मार्गावर चालण्याची आणि स्वधर्म रक्षणाची प्रेरणा देणारे कीर्तनकार कमीच. समर्थांनी दासबोधात कीर्तन कसे करावे, हे सांगितले असले तरी वारकरी कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनात समर्थांचा उल्लेख केलेला मला तरी दिसला नाही. काही कीर्तनकार तर कीर्तनाची आड  घेऊन जातिगत द्वेष वाढविण्याचे कार्य ही परोक्ष रूपेण करतात. त्या बाबत जास्त बोलत नाही. त्यांच्या दृष्टीने टाळ मृदंग वाजवून भगवंताचे गुणगान करणे म्हणजे कीर्तन. आजच्या लेखात कीर्तनकार कसा असावा आणि कीर्तन करण्याचा उद्देश्य काय असावा यावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. 

समर्थ म्हणतात, कीर्तनकाराची वेशभूषा स्वच्छ असली पाहिजे. त्याची आवाज उत्तम असली पाहिजे. त्याला नृत्य आणि संगीताचे थोडे बहुत ज्ञान असायला पाहिजे. कीर्तन करणार्‍याला कीर्तन करण्याचा उद्देश्य ही माहीत असला पाहिजे. त्यासाठीच समर्थ म्हणतात, नाना वचनें प्रस्ताविक. शास्त्राधारें बोलावीं. भक्ति ज्ञान वैराग्यलक्षण. नीती न्याय स्वधर्मरक्षण.  कीर्तनकाराने धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि पाठांतर केले पाहिजे. कीर्तनकाराने वेद, उपनिषद, श्रुति आणि स्मृतिंची थोडी माहीत घेतली पाहिजे. किमान भगवद्गीता तरी वाचली पाहिजे. दासबोध आणि सत्यार्थ प्रकाश सारखे ग्रंथ अवश्य वाचले पाहिजे. ग्रंथांचा अभ्यास केल्याने किंवा नुसत्याच वाचनाने सुद्धा सनातन धर्माविषयी कीर्तनकाराच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन ही होईल आणि त्याला कीर्तन करताना ग्रंथातले उदाहरण देऊन श्रोत्यांच्या मनातील शंका ही दूर करता येतील. 

फक्त भगवंताच्या लीलांचे गुणगान आणि चमत्कारांचे वर्णन म्हणजे कीर्तन नव्हे. आपल्या ऋषींनी मानवी आयुष्याला चार आश्रमात विभाजित आहे. ब्रम्हचारी आश्रमात शिक्षा ग्रहण करणे, ग्रहस्थ आश्रमात धर्म मार्गावर चालत प्रचंड पुरुषार्थ करून सांसारिक भोग भोगणे, वानप्रस्थ आश्रमात संसारीक भोगापासून विमुक्त होण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर संन्यास आश्रमात मोक्षाची वाटचाल करणे.  

कीर्तनकाराने कीर्तन असे केले पाहिजे की  श्रोत्यांच्या मनात भगवंता प्रति प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. त्यांच्या  मनात सकारात्मक ऊर्जा निर्मित झाली पाहिजे, पुरुषार्थ करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यांच्यात परस्पर प्रेम आणि सौहार्द उत्पन्न झाला पाहिजे. नीती आणि न्याय म्हणजे काय, हे श्रोत्यांना समजले पाहिजे. कीर्तनकाराने श्रोत्यांना स्पष्ट केले पाहिजे, भगवंत शरीर रूपी रथाला सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवितो, त्याच मार्गावर चालत सांसारीक आणि आध्यात्मिक मार्गात चालण्यासाठी पुरुषार्थ करणे हे जीवाचे कार्य आहे. भगवंत चमत्कार करत नाही. आपण जर धर्माच्या मार्गावर चालू तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या रथाचे सारथी बनतील. कर्म हे आपल्यालाच करायचे आहे. कीर्तनकाराने, श्रोत्यांना भगवंताचे नियमित नामस्मरण केल्याने सांसारीक कार्यांत नियमितता कशी येते,  गुरुचरणी बसून विद्या अध्ययन करून ज्ञान कसे प्राप्त करावे, इत्यादींचे उदाहरण देऊन श्रोत्यांना सांगितले पाहिजे.  कीर्तन ऐकून श्रोत्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मोक्षाच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळाली तरच कीर्तन सार्थकी लागते. 

स्वधर्माच्या रक्षणाला समर्थ अधिक महत्व देतात. कारण धर्म जीवित राहील तरच धर्म तुमचे रक्षण करणार. त्यासाठीच समर्थांनी शोर्याचे प्रतिक मारुतीच्या मंदिरांची स्थापना आपल्या मठांत केली होती. आज ही अनेक आखड्यांत मारूतीचे मंदिर असते. असो. नुकतेच पहलगांव हल्यात एका ही व्यक्तीने आतंकींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे मुख्य कारण कीर्तनकार मग ते भागवत कथा करणारे असो किंवा भगवती जागरण करणारे असो, श्रोत्यांना अधर्माविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणाच देत नाही. परिणाम, संत म्हणजे चमत्कार करणारे सिद्ध पुरुष अशीच श्रोत्यांची कल्पना झाली आहे. त्यांची पूजा अर्चना केल्याने सर्व संकटे दूर होतील अशीच आशा श्रोत्यांना असते.  अधर्माविरुद्ध संघर्ष न करण्याची प्रेरणा न मिळाल्याने  गत काळात आपली मंदिरे विध्वंस झाली. धर्माचा विध्वंस झाला. बहुधा देश आणि धर्माची अवस्था पाहूनच तुलसीदासांनी रामचरितमानसाची निर्मिती केली असावी. धर्माचा खरा अर्थ कळला पाहिजे याच साठी समर्थांनी दासबोधाची रचना केली. आजची परिस्थिति ही वेगळी नाही. आज कीर्तन करताना, कीर्तनकाराने स्वधर्म रक्षण करणारे छत्रपति, राणा प्रताप इत्यादींच्या शोर्याच्या एखाद्या गाथेचे अवश्य वर्णन केले पाहिजे. कीर्तन ऐकून श्रोत्यांना स्वधर्म रक्षणाची प्रेरणा मिळाली पाहिजे. मला एकाने विचारले तुमचा आवडता कीर्तनकार कोण? मी उत्तर दिले समर्थांनी कीर्तनकाराच्या जे गुण संगितले आहे ते ज्या माणसात आहे तो. ज्याला वेद, उपनिषद, स्मृति, श्रुति, षड दर्शन यांचे ज्ञान आहे. जो विरक्त सन्यासी आहे. ज्याला भगवद्गीता तोंडपाठ आहे. ज्याची आवाज आणि वाणी मधुर आहे. पंचवीस वर्षांपासून रोज सकाळी त्याचे कीर्तन अखंड सुरू आहे. जो श्रोत्यांना पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देतो, स्वस्थ आणि निरोग राहण्याचा मंत्र देतो. धर्म आणि सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.  ज्याचा प्रेरणेने आज देशातील हजारो उद्यानात योग कक्षा चालतात.  ज्याचा रूपात मला नेहमीच  समर्थांचे दर्शन होते. असो. 

 


 






 

 
 

No comments:

Post a Comment