रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत राहत होता. इतर मुलांसारखीच त्यालाही दिवाळीत अनार, चरखी, रॉकेट उडवायची खूप इच्छा होती.
त्याच्या बाबांनी त्याला एक छोटंसं पिस्तूल दिलं होतं. दिवसभर टिकल्या उडवून तो कंटाळला होता. संध्याकाळी आकाशात उडणारे रॉकेट्स पाहून त्याला जाणवू लागलं—आपले बाबा आपल्यासाठी अनार आणू शकत नाहीत... आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली आणि तो उदास झाला.
"चिन्या, आत का बसलाय? बाहेर ये! समोरचा कोठीवाला मोठा अनार उडवणार आहे!" बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला. समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडवला. रंगबिरंगी कारंजा आकाशात चमकला.
"काय मजा आली ना!" बाबांनी विचारलं.
"कसली मजा? मी थोडा अनार उडवला आहे?" चिन्या म्हणाला.
"पाह ना, समोरची मुलं कशा टाळ्या पिटतायत, उड्या मारतायत. त्यांनीही अनार उडवला नाही," बाबा समजावत म्हणाले.
"ते नाही, पण त्यांच्या नोकराने उडवला ना!" चिन्या उतरला.
"तसं असतं तर फक्त नोकरालाच आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही," बाबा शांतपणे म्हणाले.
चिन्या काहीच बोलला नाही.
"हे बघ चिन्या," बाबा पुढे म्हणाले, "मोठे लोक, राजा-महाराजे, सेठ—ते स्वतः काही करत नाहीत. त्यांचे नोकर त्यांच्यासाठी काम करतात. समज, हा नोकर आपल्यासाठी अनार उडवतोय. बघ, काय मजा येईल!"
"म्हणजे तो आपला नोकर आहे, असं समजायचं?" चिन्या विचारात पडला.
तेवढ्यात चिन्याचं लक्ष समोर गेलं. "बाबा! तो नोकर पुन्हा अनार उडवणार आहे!" तो आनंदाने ओरडला.
त्या नौकराकडे पाहत चिन्या ओरडला , "ए नोकर! आमच्यासाठी अनार उडव!"
नोकराने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि रस्त्याच्या पलीकडे, झोपडीसमोर छोटा चिन्या उभा असल्याचं त्याला दिसलं." त्याला गावातल्या आपल्या मुलाची आठवण झाली—तोच हळवा चेहरा, उत्साहाने उजळलेला. नोकराने एक मोठा, जाड अनार उचलला, चिन्याला दाखवत तो पेटवला. लाल, निळे, सोनेरी रंग आकाशात उडाले, नाचले, आणि आकाश उजळून निघालं. लाल, निळे, आणि पांढरे रंग आकाशात चमकले.
चिन्या टाळ्या वाजवत आनंदाने उड्या मारू लागला. चिन्याला आनंदाने उड्या मारत हसताना पाहून वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
No comments:
Post a Comment