विचारूनि बोले विवंचूनि चाले।
तयाचेनि संतप्त तेही निवाले॥
बरें शोधल्यावीण बोलो नकों हो।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥(म.श्लोक १३२)
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, बोलण्याआधी माणसाने विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्याचा उद्देश काय आहे, याची काळजीपूर्वक आणि समजूतदारपणे विवंचना केली पाहिजे. योग्य उद्देशाने केलेले बोलणे आणि वर्तन संतप्त लोकांनाही शांत करू शकते. पूर्ण माहिती आणि तथ्य न घेता बोलू नका. समाजात आपले आचरण शुद्ध, नियमबद्ध आणि शिस्तबद्ध ठेवा. समर्थ रामदास स्वामी यांचा हा उपदेश मनाला समजावतो की, विचारशून्य बोलणे हे संकटाचे मूळ आहे. उलट, विचारपूर्वक बोलणे हे शांती आणि यशाचे साधन आहे. हाच आशय मनुस्मृतीत ही आहे,
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यं अप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥ ( म.स्मृ. 4/138)
भगवान मनू म्हणतात, सत्य बोलावे, प्रिय (आनंददायक, सौम्य) बोलावे, पण सत्य असले तरी अप्रिय (दुखावणारे, कटू) बोलू नये. प्रिय वाटेल असे खोटेही बोलू नये. हा सनातन धर्म आहे.
माणसाने सदा सत्य बोलले पाहिजे, प्रिय बोलले पाहिजे आणि विचार करून बोलले पाहिजे. सत्य आणि प्रियता यांचा समन्वय साधता आला पाहिजे. अप्रिय सत्य बोलण्याने संबंध बिघडतात, वैर निर्माण होते आणि अनेकदा मोठे संघर्ष उद्भवतात. दुसरीकडे, दुसऱ्याला प्रसन्न करण्यासाठी खोटे बोलण्याने नैतिकता नष्ट होते, विश्वासघात होतो आणि परिणाम वाईटच होतात. इतिहासात याचे अनेक उदाहरण मिळतात:
राजा दशरथ सदैव सत्य धर्माचे पालन करणारा होता. देवासुर युद्धात ते जखमी झाले असता राणी कैकेयीने त्यांचे प्राण वाचवले. प्रसन्न होऊन दशरथ म्हणाले, “तुला दोन वर माग, मी देईन.”
विचार न करता दिलेल्या या वचनामुळे, कैकेयीने रामराज्याभिषेकाच्या वेळी दोन वर मागितले: १. भरताला राज्याभिषेक. २. रामाला १४ वर्ष वनवास. सत्यवचनी दशरथाने वचन पाळले. परिणाम? श्रीराम वनात गेले आणि दशरथांचा शोकाने मृत्यू झाला. गिरधर कविराय म्हणतात: “बिना विचारे जो करै, सो पाछे पछिताय”, विचार न करता केलेल्या कृतीचा पश्चाताप नंतर उपयोगी पडत नाही.
दूसरा प्रसंग महाभारतातला आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी महाराणी द्रोपदी दुर्योधनाला उद्देश्यून म्हणाली आंधळ्याचे पुत्र आंधळे असतात. महाराणी द्रोपदीने बोलण्या आधी विचार केला नाही. आपल्या कटू शब्दांनी दुसर्याचा अपमान होईल असा क्षणिक विचार ही तिने केला नाही. परिणाम महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरू वंशाचा विनाश झाला.
एका राजकारण्याने बिना तथ्य तपासता म्हटले की गुजरातचे लोक अशिक्षित आहेत आणि त्यांना कोणीही फसवू शकतो. या विधानाचा तीव्र विरोध झाला. नेत्याने माफी मागितली. पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाहीत. अशा बिना विचारी वक्तव्यांचा परिणाम निवडणुकीत पक्षाला भोगावा लागतो. भारतीय राजकारणात असे अनेकदा घडले आहे, एका नेत्याच्या एका चुकीच्या बोलण्याने संपूर्ण पक्षाला हानी झाली आहे.
दुसरीकडे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करून बोलतात. जे बोलतात ते करून दाखवतात. त्यांनी म्हटले होते,
“प्रत्येक घरात शौचालय बांधणार.” प्रत्यक्षात १२ कोटी शौचालये बांधून दाखवली. त्यांनी जाहीर केले, “प्रत्येक गरीबाला बँक खाते मिळेल.” आज ५० कोटीहून अधिक जनधन खाती उघडली गेली आहेत.
ते म्हणाले,
“पैसा थेट गरीबांच्या खात्यात जाईल, मध्यस्थ संपतील.” JAM
ट्रिनिटी (जनधन + आधार + मोबाइल) द्वारे ४४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम Direct
Benefit Transfer (DBT) ने थेट खात्यात पोहोचवली. यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आणि प्रत्येक रुपया योग्य हातात पोहोचला.
जर त्यांनी बोललेले पूर्ण करून दाखवले नसते, तर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नसते. विचारपूर्वक बोलणे आणि त्यानुसार कृती करणे यामुळे लाखो कुटुंबांचे जीवन बदलले. हेच खरे यशाचे साधन आहे. जसे समर्थ रामदास म्हणतात: “विचारूनि बोले, विवंचूनि चाले.”
No comments:
Post a Comment