जगात जगण्यासाठी आपल्याला मुखवटा घालावाच लागतो. हा मुखवटा म्हणजे फसवणूक नाही, तर एक सामाजिक गरज आहे. मुखवटा आत्मसंरक्षणाची कवच-कुंडले आहेत. रंगमंचावर आणि सिनेमात काम करणारे कलाकार तर रोजच वेगवेगळे मुखवटे घालतात—कधी राजा, कधी भिकारी, कधी खलनायक, कधी देवता. पण हे मुखवटे केवळ अभिनयापुरते मर्यादित नाहीत. खऱ्या आयुष्यातही प्रत्येकजण मुखवटे घालून अभिनय करत असतो.
नवरा-बायकोचे उदाहरण घ्या. जे एकमेकांना माघारी शिव्या देतात, तेच घरी आल्यावर प्रेमाचा मुखवटा घालून गोड बोलतात. कारण त्यांना घर टिकवायचं असतं, समाजात प्रतिष्ठा राखायची असते.
राजकारणात तर मुखवट्यांचा खेळ अधिकच गुंतागुंतीचा असतो. एका देशाचा राष्ट्राध्यक्ष शत्रू देशाच्या राष्ट्राध्यक्षाला मिठी मारतो, चेहऱ्यावर मैत्रीचा मुखवटा ठेवतो, हे आपण टीव्हीवर नेहमी पाहतो. पण त्या मुखवट्याखाली असते शंका, धोका, आणि रणनीती.
वकील न्यायालयात जातात, असत्याच्या मुखवट्याखाली जनतेला लुटणाऱ्यांची वकिली करतात. त्यांचं काम असतं युक्तिवाद करणं, सत्य शोधणं नाही. शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसमोर आदर्श व्यक्तिमत्त्वाचा मुखवटा घालतात, त्यांच्या मनात असलेल्या वैयक्तिक वेदना, असमाधान, थकवा इत्यादि ते विद्यार्थ्यांपासून लपवितात. नोकरी करणारा कर्मचारी असंतुष्ट असला तरी बॉस समोर नम्रतेचा मुखवटा घालतो. कारण त्याला चांगला पगार पाहिजे असतो आणि बढती ही पाहिजे असते. सामाजिक प्रसंगात मनात असलेला एकटेपणा, तणाव, दुःख. सारे विसरून आपण प्रसन्नतेचा मुखवटा घालून सर्वांशी हसत खेळत बोलतो. जारी आपण आतून कोसळत असलो तरी "ठीक आहे" असं सांगतो.
जगात यशस्वी व्हायचं असेल तर मुखवट्यांचा एक सुसंगत संग्रह जवळ असावा लागतो. आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगासाठी एक वेगळा मुखवटा—कधी नम्रतेचा, कधी आत्मविश्वासाचा, कधी करुणेचा, कधी कठोरतेचा जवळ ठेवावा लागतो. ज्याला हे मुखवटे योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापरता येतात, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. त्याच्या घरी लक्ष्मी येते. कोठी, गाडी, पैसा आणि सुंदर बायकोही त्याला मिळते. समाजात त्याला प्रतिष्ठा मिळते.
या मुखवट्यांच्या खेळात आपण आपला खरा चेहरा विसरून जातो? आपण इतके मुखवटे घालतो की शेवटी स्वतःला ओळखणं कठीण होतं. आपली खरी भावना, खरे विचार, खरे दुःख कुठे तरी दडपले जातात. आपल्याशी संवाद साधणारा खरा चेहरा आहे की मुखवटा हेच आपल्याला कळत नाही. मानसिक तनाव आणि अवसादाने आपण ग्रस्त होतो.
संसारात जगण्यासाठी मुखवटे मुखवतटे अवश्य घातले पाहिजे. पण वेळप्रसंगी त्यांना काढून ही जगाशी संवाद करता आला पाहिजे. त्यासाठी रोज थोडा वेळ काढून काही मिनिटे तरी स्वतच्या अंतर्मनाशी संवाद साधला पाहिजे. स्वतच्या अंतर्मनाला यातना देणार्या मुखवटयांना, मानसिक आणि शारीरिक ताण देणार्या मुखवटयांना चेहर्यावरून काढून फेकले पाहिजे. दुसर्यांना काय वाटते या एवजी काय योग्य आहे, हे बिना मुखवटा घालता सांगता आले पाहिजे.

No comments:
Post a Comment