Tuesday, August 18, 2026

ईशोपनिषद आणि पर्यावरण: शाश्वत जगण्याचा वैदिक मार्ग

 
 

 
आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगतीचे शतक मानले जाते. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विज्ञानाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. परंतु, या तथाकथित प्रगतीच्या अंधाधुंद धावण्यात आपण ज्या निसर्गाच्या कुशीत जन्मलो, त्यालाच ओरबाडत चाललो आहोत. हवामान बदल, जलसंकट आणि वाढते प्रदूषण यांमुळे आज मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्वच धोक्यात आले आहे. या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्याचा आणि प्रगतीसोबतच निसर्गाचे रक्षण करण्याचा जादुई मंत्र हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी उपनिषदांच्या माध्यमातून देऊन ठेवला आहे. 'ईशावास्य उपनिषद' (ईशोपनिषद) आपल्याला केवळ अध्यात्म शिकवत नाही, तर निसर्गाचा आदर करून जगण्याचा खरा 'शाश्वत मार्ग' (Sustainable Way of Life) दाखवते.
 
वैदिक विचार आणि शांतीपाठ
 
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ 
(शांतीपाठ)

ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्॥१॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे॥२॥
[ईशोपनिषद (मंत्र १ व २)]
 
'ईशोपनिषद' हे शांतीपाठाने सुरू होते. ऋषी म्हणतात की, त्या ईश्वरीय पूर्णातून हे जगद्रूपी पूर्ण निर्माण झाले तरी ते पूर्णच शेष राहिले. उपनिषदाच्या पहिल्या मंत्रात ऋषी अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात-त्यागपूर्वक उपभोग घ्या’. दुसऱ्याच्या वाट्यावर किंवा हक्कावर गदा आणू नका. परमेश्वराने प्रत्येक जीवासाठी या सृष्टीत एक वेगळा आणि निश्चित वाटा ठेवला आहे; आपल्या वाट्याला आलेल्या घटकांचा कृतज्ञतेने उपभोग घेत प्रत्येक जीवाला इथे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसऱ्या मंत्रात ऋषी पुढे म्हणतात की, अशा रीतीने निसर्गाचा आदर करत जर तुम्ही कर्म केले, तर शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरली तरीही कर्मबंधने मानवाला बांधू शकत नाहीत.
 
उपनिषदकार ऋषींना मंत्रदृष्टा का म्हणतात, हे ईशोपनिषद वाचल्यावर सहज समजते. त्यांच्यात भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची अलौकिक क्षमता होती. निसर्गाच्या नियमानुसार विधात्याने निर्माण केलेली ही पृथ्वी आणि त्यावरील समस्त जीवसृष्टी कधी ना कधी नष्ट होणार, हे जरी अंतिम सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने पूर्ण आनंदाने व समाधानाने जगले पाहिजे. त्यासाठीच या मंत्रदृष्ट्या ऋषींनी या मंत्रांद्वारे आपल्याला जगण्याचा आदर्श मार्ग दाखवला आहे.
 
निसर्गाचे अनुकूल संतुलन आणि मानवी स्वार्थ
 
अग्नी, वायू, जल आणि माती या तत्त्वांपासून पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झाली. पृथ्वीवरील आजचे वातावरण, हवा, पाणी, ऊर्जा आणि माती यांचे संतुलन मानव आणि सध्या अस्तित्वात असलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अत्यंत अनुकूल आहे. जोपर्यंत हे वातावरण अनुकूल राहील, तोपर्यंतच मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवर टिकून राहील.
 
परंतु, आजचा माणूस स्वतःला बुद्धिमान आणि काही वेळा निसर्गापेक्षाही श्रेष्ठ समजू लागला आहे. आपल्या अवाजवी स्वार्थासाठी वातावरणात अनैसर्गिक बदल करण्याची घातक क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या सुखासाठी इतर मूक प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वार्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे समजत नाहीये की, जर पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले, तर मानवजातही टिकणार नाही. निसर्गाचा हा समतोल बिघडल्यास आपल्याच कर्माचे भयानक परिणाम मानवाला भोगावे लागतील. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे, जेणेकरून मानवजात आपले अस्तित्व टिकवून आपली शंभर वर्षे जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल? याचे अप्रतिम मार्गदर्शन ऋषींनी केले आहे.
 
निर्मिती’ विरुद्ध ‘उत्पादन’ आणि त्यागाचा सिद्धांत
 
अन्न, वस्त्र आणि निवारा’ (रोटी, कपडा और मकान) या आपल्या तीन मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि त्यांचा ‘उपभोग’ घेतो. आज आपण निसर्गाचा कोणताही विचार न करता, केवळ मानवी फायद्यासाठी कच्च्या मालापासून नवीन वस्तू बनवतो (उदा. प्लास्टिक, रासायनिक पदार्थ). आपण यालाच निर्मिती किंवा उत्पादन समजतो. परंतु, ऋषी खऱ्या उत्पादनाचा” (True Production) अर्थ सांगताना म्हणतात, खरे उत्पादन तेच आहे जे ‘शाश्वत’ (Sustainable) असते, ज्याच्यामुळे निसर्गाचे चक्र तुटत नाही आणि पर्यावरणाची झालेली हानी भरून काढली जाते; अर्थात ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत नाही.
 
आता मनात प्रश्न निर्माण होणारच की, निसर्गाचे संतुलन न बिघडवता कोणत्याही वस्तूची निर्मिती करणे माणसाला कसे शक्य आहे? कारण मानवी निर्मितीमुळे वातावरणात काही ना काही बदल हा होतोच. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, आपण जे काही उपभोगतो, “त्याचा त्याग करा.” याचा अर्थ असा की, आपण निसर्गाकडून जे काही घेतो, त्याचा योग्य प्रमाणात त्याग करणे गरजेचे आहे. म्हणजेच, निसर्गाकडून जे घेतले, ते दुसऱ्या स्वरूपात निसर्गाला परत दिले पाहिजे.  हे कसे शक्य आहे, हे समजून घेण्यासाठी आपण निसर्गातीलच काही उदाहरणे पाहूया:

  • झाडे आणि वनस्पती: जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात, परंतु बदल्यात आपली पिकलेली पाने जमिनीवर गाळून मातीला पुन्हा सुपीक (खत) करतात. तसेच ती वातावरणाला प्राणवायू (ऑक्सिजन) देतात आणि पावसाचे पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात.
  • प्राणी: जनावरे निसर्गातील चारा खातात आणि विष्ठेच्या (शेणाच्या) स्वरूपात उत्कृष्ट सेंद्रिय खत जमिनीला पुन्हा परत करतात. यामुळे निसर्गाचे चक्र आणि संतुलन अविरत कायम राहते.
 
मानवाचे निसर्गविरोधी वर्तन आणि त्याचे दुष्परिणाम
 
याउलट आपण काय करतो? आपण जेवढी प्रगती करत आहोत, तेवढे निसर्गचक्र अधिक असंतुलित करत आहोत आणि त्याचे गंभीर परिणामही भोगत आहोत. हे चक्र जर असेच सुरू राहिले, तर पृथ्वीवरील मानवजात एक दिवस नष्ट होईल आणि विधात्याने दिलेले १०० वर्षांचे आयुष्य आपण जगू शकणार नाही. आपल्या वाढत्या गरजांमुळे आपण खालील प्रमुख घटकांमध्ये असंतुलन निर्माण केले आहे:

१. लाकडाचा अनिर्बंध वापर आणि जंगलतोड: झाडे वातावरणातील दूषित वायू शोषून घेऊन हवा शुद्ध करतात आणि हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढवतात. मानव आपल्या वाढत्या गरजांसाठी (जळण, फर्निचर, इमारती) मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरतो. याशिवाय, देशाच्या विकासासाठी रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि विविध पायाभूत उद्योग उभे करताना मोठ्या प्रमाणावर जुनी व घटstandard झाडे कापली जात आहेत.

शासनाचे प्रयत्न (One for Ten Tree Plantation): विकासाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी सरकारने एका झाडाऐवजी दहा झाडे लावणे’ ही महत्त्वपूर्ण आणि बंधनकारक योजना सुरू केली आहे. यामुळे तोडलेल्या झाडांची नुकसानभरपाई तर होत आहेच, शिवाय लोकांमध्येही वृक्षारोपणाची जाणीव वाढली आहे.

सामाजिक पुढाकार: उदाहरणार्थ, आचार्य बाळकृष्ण आपला वाढदिवस 'जडी-बुटी दिवस' म्हणून साजरा करतात आणि त्यांचे अनुयायी त्या आठवड्यात लाखो औषधी वृक्ष आणि वनस्पतींची लागवड करतात. अश्याच सामान्य लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारताचे हरित क्षेत्र (Green Cover) १८ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा एक आदर्श मेळ देशात साधला जात आहे.
 
२. वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील संकट: पृथ्वीच्या पोटातून कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थ काढून मानव वातावरणात विषारी वायू उधळत आहे. या दूषित वायूचे परिणाम आज आपण आजारांच्या रूपाने भोगत आहोत. वायू प्रदूषण ही आजच्या काळातील एक अत्यंत गंभीर समस्या बनली असून, प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या आजारांमुळे (जसे की श्वसनसंस्थेचे रोग, हृदयरोग, निमोनिया आणि फुफ्फुसांचे आजार) भारतात दरवर्षी किमान १८ लाख लोकांचा मृत्यू होतो; आणि दुर्दैवाने ही संख्या दरवर्षी वाढतच जाणार आहे. झाडे काही प्रमाणात हवेचे प्रदूषण दूर करू शकतात, पण जर आपल्याला निसर्गाची ही हानी पूर्णपणे भरून काढणे शक्य नसेल, तर या विनाशकारी जीवाश्म इंधनांचा (Fossil Fuels) वापर आपण कमी केला पाहिजे.  यासाठी भारत सरकारने उचललेली पाऊले:
 
अपारंपरिक ऊर्जेची क्रांती: भारत सरकार या बाबतीत सकारात्मक पावले टाकत आहे. गेल्या १० वर्षांत भारताने सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून, ऋषींनी सांगितलेल्या 'निसर्गाला धक्का न लावता केलेल्या आदर्श उत्पादनाचे' हे उत्तम उदाहरण आहे. या काळात देशातील सौर ऊर्जेचे उत्पादन तब्बल १५ पटीने वाढून १०० गिगावॉट (GW) पर्यंत पोहोचले आहे, तर पवन ऊर्जाही २६ गिगावॉटवरून ४६ गिगावॉट झाली आहे. शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आता गावागावांमध्ये हर घर सौर घर’ योजना प्रभावीपणे राबवली जात आहे, ज्यामुळे ग्रामीण भाग ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे.

इतर गैर-पारंपरिक स्रोत: सौर आणि पवन ऊर्जेव्यतिरिक्त जलविद्युत ऊर्जा, जैवभार ऊर्जा (Biomass), बायोगॅस, भू-औष्णिक ऊर्जा (Geothermal), सागरी लाटांची ऊर्जा (Tidal) आणि 'ग्रीन हायड्रोजन' यांसारख्या प्रदूषणमुक्त मार्गांचा वापर वाढवला जात आहे. यामुळे निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता ऊर्जा मिळवणे शक्य होत आहे, परंतु ही फक्त सुरुवात असून अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.
 
३. पाण्याचे प्रदूषण आणि जलसंकट: विहिरी किंवा बोअरवेलद्वारे जमिनीखालचे पाणी उपसणे म्हणजे 'उपभोग' आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरवून ते पुन्हा पृथ्वीला देणे म्हणजे 'त्याग'. पाण्याच्या शाश्वत उपयोगासाठी हे संतुलन साध्य करणे गरजेचे होते, पण ते बिघडल्यामुळे आज मोठे जलसंकट उभे राहिले आहे.

शेतीमधील अति-वापर: शेतीमध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी आपण गहू, तांदूळ आणि ऊस यांसारखी नगदी पिके (Cash Crops) घेण्यावर भर देत आहोत, ज्यांना अफाट पाणी लागते. रासायनिक खते, कीटकनाशके आणि जिवाणूनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीखालील पाणी आणि नद्यांचे स्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. नद्यांचे पाणी पिण्यालायक सोडा, आता अंघोळीसाठीही योग्य राहिलेले नाही.

शहरी जीवनशैलीतील अपव्यय: शहरांमधील आधुनिक घरांमध्ये पाण्याचा अपव्यय कमालीचा वाढला आहे. बाथटब, कुलर, पाश्चात्य पद्धतीची स्वच्छतागृहे आणि रोज तीन-तीन वेळा कपडे धुण्याची सवय यांमुळे पाण्याचा वापर प्रमाणाबाहेर वाढला आहे. रासायनिक साबण आणि कारखान्यांतून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जलवाहिन्या मृत होत आहेत.

परिणाम: या दुहेरी मार्यामुळे भूजल पातळी (Groundwater Level) प्रचंड खाली गेली असून, अनेक ठिकाणी ३०० फुटांपेक्षाही जास्त खोल बोअरवेल खणाव्या लागत आहेत. या अति-उपशामुळे शेतजमिनीचा पोतही बिघडत चालला आहे. जर हीच परिस्थिती अशीच सुरू राहिली, तर पंजाबसारखी देशातील अत्यंत सुपीक जमीनही येत्या काही वर्षांत वाळवंट बनण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल.

जलसंकटावर आवश्यक उपाययोजना
 
ऋषींच्या "निसर्गाकडून जे घेतले, ते परत दिले पाहिजे" या नियमानुसार, खालील उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे:

1.  शेती क्षेत्रातील सुधारणा (Agricultural Reforms): ऊस आणि गव्हासारख्या पिकांना मोकळे पाणी देण्याऐवजी ठिबक आणि तुषार सिंचन वापरणे बंधनकारक केले पाहिजे, ज्यामुळे ५०% पाण्याची बचत होते. तसेच, टंचाईच्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्ये, तेलबिया किंवा भरडधान्ये (ज्वारी, बाजरी) घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.

2.  सेंद्रिय शेतीला प्राधान्य: रासायनिक खतांना पर्याय म्हणून शेतीत शेणखत, कंपोस्ट खत यांसारख्या सेंद्रिय (ऑर्गेनिक) खतांचा व जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकून राहते.

3.  पाण्याचे ऑडिट आणि जलसंधारण: प्रत्येक गावात 'Water Audit' करून पिके ठरवली पाहिजेत. तसेच पावसाचे पाणी अडवण्यासाठी 'जलयुक्त शिवार' सारख्या योजना आणि ग्रामीण भागात सांडपाण्यासाठी 'शोष खड्डे' (Soak Pits) मोठ्या प्रमाणावर तयार केले पाहिजेत.

4.  शहरी भागातील कायदेशीर उपाय: शहरांमधील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेसाठी (Housing Society) सांडपाण्याचा पुनर्वापर (Mandatory Water Recycling) आणि इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे (Rainwater Harvesting) कायद्याने सक्तीचे केले पाहिजे. उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचा पुनर्वापर (त्याग) केला नाही, तर येणारी पिढी पाण्यासाठी तडपडेल.
 
वन्यजीव संवर्धन आणि मानवी सहअस्तित्व: 

ऋषी म्हणतात की, या सृष्टीतील प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार आहे, कारण पृथ्वीवरील सर्वच जीव अन्नसाखळीसाठी आणि अस्तित्वासाठी एकमेकांवर निर्भर आहेत. ही साखळी तुटली तर माणूसही शंभर वर्षे जिवंत राहू शकणार नाही.
 
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे जंगले नष्ट झाल्याने वन्यजीव धोक्यात आले आहेत. यावर उपाय म्हणून भारताने वन्यजीव संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, ज्याच्या परिणामी आज देशातील अभयारण्यांची संख्या ५६० च्या पार गेली आहे. ‘प्रकल्प वाघ’ (Project Tiger) आणि ‘प्रकल्प हत्ती’ यांसारख्या मोहिमांसोबतच, मानवी वस्ती आणि जंगलांमधील संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर विशेष इको-ब्रिज’ (Eco-Bridges) आणि प्राण्यांसाठी भुयारी मार्ग (Underpasses) तयार केले आहेत; ज्यामुळे वन्यजीव कोणत्याही अपघाताशिवाय जंगलात सुरक्षितपणे वावरू शकत आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना सरकारतर्फे तातडीने मोठी आर्थिक मदत (नुकसानभरपाई) दिली जाते. तसेच, वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे किंवा पाळीव जनावरांचे नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून मानवी व वन्यजीव सहअस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
'ईशावास्य उपनिषद' आणि निसर्गाचा नियम आपल्याला एकाच सूत्रात बांधतो—"जे काही आपण पर्यावरणातून घेतो, ते आपल्याला त्याच किंवा अधिक चांगल्या स्वरूपात निसर्गाला परत करता आले पाहिजे." निसर्गाची झालेली हानी भरून काढणे (त्याग करणे) जर आपल्याला शक्य नसेल, तर निसर्गाच्या संसाधनांचा अनिर्बंध उपभोग घेण्याचा मोह आपण तातडीने टाळला पाहिजे. ज्या घटकांची भरपाई मानवाला करणे शक्य आहे, त्यांचाच उपभोग घ्यावा. ऋषींनी सांगितलेला त्यागसहित भोग’ हाच खऱ्या अर्थाने सृष्टीचा “सर्वोत्तम उपभोग” आहे. निसर्गाकडून घेतलेले कर्ज जेव्हा आपण वृक्षारोपण, जलपुनर्भरण आणि प्रदूषणमुक्तीच्या माध्यमातून परत करू, तेव्हाच सृष्टीचे संतुलन कायम राहील. अशा प्रकारे निसर्गाशी ताळमेळ ठेवून जगल्यास, आपण आणि आपली येणारी पिढी निश्चितपणे समृद्ध आयुष्य जगून विधात्याने दिलेली ‘शंभरी’ गाठू शकेल.
 
 

No comments:

Post a Comment