Friday, April 10, 2020

कारल्याची भाजी

कारल्याची भाजी माझी अत्यंत आवडती भाजी. कोवळे कारले दिसले की मला भाजी करण्याचा हुरूप येतो. कारल्याची भाजी म्हणजे कडू, गोड, तिखट आणि आंबट स्वादाचा अप्रतिम अनुभव. 

काल सौ.ने एक पाव कारले विकत घेतले. कारले मस्त व कोवळे होते. मी आधी कारले गोल-गोल पातळ चिरले बटाटे चिप्स सारखे. कापताना कारल्याच्या बिया वेगळ्या होतात त्या मी फेकत नाही.  भाजीत या बिया खाताना मस्त करकर असा आवाज येतो. मजा येते. 

गॅस वर कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल टाकले. ही भाजी तेलातच जास्त स्वादिष्ट बनते. तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी टाकली. मोहरी फुटल्यावर गॅस हळू करून त्यात स्वादानुसार तिखट आणि हळद टाकून लगेच कारले त्यात घातले. अशाने हळद आणि तिखट जळत नाही. कढईवर झाकण ठेवले. दर दोन मिनिटांनी झाकण काढून, कारले परतून घेतले. अशाने कारले जळणार नाही. सात-आठ मिनिटांनी भाजी तेल सोडू लागेल. मग भाजीत स्वादानुसार आंबट, गूळ, धने पावडर आणि मीठ टाकून भाजी परतून घेतली. पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेऊन वाफ काढली. नेहमी प्रमाणे भाजी मस्त झाली होती.

No comments:

Post a Comment