दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. सवयी प्रमाणे माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. चिरंजीवांना माझ्या खाद्य प्रयोगांची भीती वाटते. तो सदैव सौ.ची अर्थात आईंची घेतो. पण आज सोन्याचा दिवस उगवला वरक् फ्रॉम होम असले तरी चिरंजीव आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जातात. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 असते. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनकपुरी- विकासपुरी भागातील सांस्कृतिक चळवळींचे आदान-प्रदान करून, पोटातला भार हलका करून तीन एक वाजेपर्यंत सर्व प्रसन्न मनाने घरी परततात.
दुपारी बारा वाजता गच्चीवर जाऊन कढीपत्ता तोडून आणला. डाळ धुवून पाणी निथळायला चहाच्या गाळणीत ठेवून दिली. दोन चमचे दही आणि त्यात एक चमचा बेसन घालून मिक्सीत फेटाळून घेतले आणि ४०० ml दहा रू वाली छाज मध्ये मिसळून कढईत टाकले. त्यात अंदाजे हळद, मीठ, चिमूट भर हिंग, एक चहाचा चमचा जिरे आणि सौंप, दोन लाल मिर्च्या, कढी पत्ता आणि आले किसून टाकले. गॅस लावला. आता मिक्सर मध्ये चार लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि चार पाच काळी मिरी टाकून भिजलेली डाळ पिसून घेतली. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळद, गरम मसाला, मीठ आणि एक मोठा चमचा बेसन मिश्रण एक जीव आणि घट्ट केले. कढईत टाकलेली कढी उकळू लागल्यावर त्यात मिश्रणाचे दहा एक छोटे-छोटे गोळे टाकले. तीन एक मिनिटात गोळे वर दिसू लागले. आता मिश्रणाच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी टाकून उरलेले मिश्रण ही कढीत टाकले. दोन एक मिनिटात कढ़ीचा रंग बदलून पिवळा झाला. आता एक गोळा काढून तपासला. थोडा कच्चा वाटला. थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ स्वाद ठीक करण्यासाठी टाकले. दोन एक मिनिटांनी एक चहाचा चमचा काश्मिरी लाल मिरची टाकली. कढ़ी थोडावेळ उकळू दिली. गॅस बंद केला. मोबाईल वर कढईतल्या कढ़ीचा फोटो घेतला. समाधान झाले नाही. पुन्हा नेहमीसारखा फोटू घेतला.
कढ़ी खरोखर मस्त झाली होती. अर्धी सौ. आणि चिरंजीवासाठी ठेवली. दोघांना आवडली.
No comments:
Post a Comment