Monday, April 15, 2024

बद्ध लक्षण समासाचे निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ


आज श्रीमद् दासबोधातील बद्ध निरूपण समासाचे निरूपण करण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्पबुध्दीने करत आहे. समर्थ म्हणतात सृष्टीत अनंत जीव आहेत तथापि त्यांचे चारच वर्ग आहेत.  बद्ध,  मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. पहिला प्रश्न मनात घेणार बद्ध म्हणजे काय? बद्ध म्हणजे बांधलेला जीव. याचे एक छोटेसे उदाहरण, एक माणूस कुत्र्याला साखळीने बांधून सकाळी फिरायला जातो. साखळीने बांधलेला कुत्रा प्रशिक्षित असेल तर तो मालकाच्या मागे निपुटपणे चालतो. पण प्रत्यक्षात आपण काय पाहतो. कुत्रा पुढे-पुढे पळत आहे आणि मालक त्याच्यामागे कसे तरी धडपडत साखळी पकडून कुत्र्याच्या मागे चालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कधी- कधी कुत्रा साखळी तोडून पळू लागतो. कुणालातरी चावतो. मग वादावादी, हाणामारी, ज्याला चावला त्याचा उपचाराचा खर्च, कधी-कधी कोर्ट केसेस इत्यादी ही मालकाच्या नशिबी येतात. कुत्रा पाळण्याचे सुख त्याला मिळत नाही. पण मनस्ताप मात्र नशिबी येतो. दुसऱ्या शब्दांत इथे कुत्र्याच्या मोहात पडून कुत्र्या ऐवजी मालकच साखळीने बद्ध झालेला आहे. आपल्यापाशी  नाक, कान, डोळे, स्वाद, स्पर्श, हात, पाय इत्यादी इंद्रिय रुपी कुत्रे आहेत. आपण जर या इंद्रिय रूपी कुत्र्यांच्या मोहात बद्ध झालो तर हे कुत्रे स्वैराचार करू लागतील. आपली दशा कुत्र्याच्या मालका सारखी होईल.


चौऱ्यांशी लक्ष योंनीत भटकल्या नंतर आपल्याला मानव जन्म मिळतो. मानवाला देवाने बुद्धी दिलेली आहे. आपण या बुध्दीचा उपयोग जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी परमार्थ साधण्यात करणे अपेक्षित. समर्थांनी, आपल्याला परमार्थ साधण्याचा सोपा मार्ग कळला पाहिजे आणि आपल्या इंद्रिय रुपी कुत्र्यांना  मोह- माया पासून दूर ठेवण्यासाठी या समासात बद्ध लक्षणांचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात:


आता बद्ध तो जाणिजे ऐसा 

अंधारींचा अंध जैसा. 

चक्षुविण दाही दिशा.

शून्याकार.


ज्याच्या डोळ्यांसमोर सर्वत्र अंधकार आहे त्याला:


न कळे सारासार विचार.

न कळे स्वधर्म आचार.

न कळे कैसा परोपकार.

दानपुण्य.


न कळे भक्ती न कळे ज्ञान.

न कळे वैराग्य न कळे ध्यान.

न कळे मोक्ष न कळे साधन.

या नाव बद्ध.


डोळे नसलेल्या माणसाला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याच प्रमाणे बद्ध माणूस अंधारातच चाचपडत असतो. त्याला धर्माचा मार्ग माहीत नसतो. त्याला कर्माचा मार्ग माहीत नसतो. स्वधर्म, आचार, विचार माहीत नसतो. तीर्थ, व्रत, दान, पुण्य,ज्ञान, वैराग्य  तो जाणत नाही. दया, करुणा,  मैत्री, शांती, क्षमा त्याला माहित नसते. तो सदैव इंद्रिय जनित स्वार्थ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. तो सदा सर्वकाळ काम, क्रोध, गर्व, मद, मत्सर आणि असूयात बुडालेला असतो.  अश्या बद्ध व्यक्तीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:

नैंत्री द्रव्यधारा पाहावी. 

श्रवणी द्रव्यदारा ऐकावी. 

चिंतनी द्रव्यदारा चिंतावी

 या नाव बद्ध.


समर्थ म्हणतात, असा व्यक्ती काया, वाचा, मनसा द्रव्य दारेच्या भजनात व्यस्त असतो. स्वार्थापोटी सदैव अविचार त्याच्या मनात येत राहतात. तो कपट- कारस्थान रचतो, भ्रष्टाचार करतो, निष्ठुर  होऊन दुसऱ्यांचा जीव ही घेतो. सर्व प्रकारचे पातक तो करतो. शेवटी कोर्ट, कचेरी जेल यात्रा त्याच्या नशिबी येते.  


इंद्रिय सुखांचा बहु आनंद घेतल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी माणूस ग्रस्त होतो.  सांसारिक भोगांचा आनंद ही त्याला घेता येत नाही. अश्या बद्ध जीवाला परमार्थ साध्य होण्याच प्रश्नच येत नाही. त्याची स्थिती कुत्र्याच्या मालका सारखी होते त्याला मालक आपण आहोत की कुत्रा हेच कळत नाही. अश्या व्यक्तींसाठी समर्थ म्हणतात:


न कळे परमार्थाची खूण.

न कळे अध्यात्म निरूपण.

न कळे आपणास आपण. 

न कळे तत्वतः केवळ.

या नावबद्ध


साडे तीनशे वर्ष आधी समर्थांनी ज्या बद्ध लक्षणांची वर्णने केली आहे ती आज ही आपण सर्वत्र पाहतो. आज आपण घर राहण्यासाठी नाही तर इंद्रियांना सुख देणाऱ्या एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादींनी सजविण्यासाठी घेतो. डोळ्यांना घर सुंदर दिसावे म्हणून भिंतींवर रासायनिक पेंट लावतो. अंघोळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही, तर शरीर सुंदर दिसण्यासाठी करतो. त्यासाठी रासायनिक साबण, शेंपू, क्रीम वापरतो. केसांना कलर करतो. जेवण शरीराच्या पोषणासाठी ऋतु अनुसार नव्हे, तर जिभेच्या स्वादासाठी करतो. पित्झा, बर्गर, चॉकलेट, केक, मैग्गी, इत्यादी खातो. स्टेटससाठी एसी कार वापरतो. स्वतःच्या अपरमित अनंत ईच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात नवरा बायको दोन्ही जीवापाड मेहनत करतात. क्षण भराचा अवकाश ही त्यांना मिळत नाही.


 इंद्रिय भोगात आत्मकेंद्रित झाल्याने ते अति व्यवहारी बनतात.  त्यांना आई वडील ही इंद्रिय सुखाच्या मार्गात बाधा वाटतात. काहींना तर मुल-बाळ ही नकोसे वाटतात. कुत्रा पाळून हौस भागवतात. आजच्या या अश्या पिढीसाठीच बहुतेक समर्थांनी साडे तीनशे वर्षापूर्वी म्हंटले आहे:


जागृति स्वप्न रात्रि दिवस

ऐसा लागला विषय ध्यास.

नाही क्षणाचा अवकाश.

या नाव बद्ध.


अश्या परिस्थितीत परमार्थ  देव धर्माचा विचार ही त्यांच्या मनात येणे  शक्य नाही.


पण शेवटी परिणाम काय.  त्वचेचे आजार,  वायू प्रदूषणामुळे होणारे अस्थमा  इत्यादी श्वसनाचे आजार. प्रदूषित पाणी आणि जेवणामुळे मधुमेह, हृदय रोग, कॅन्सर, इत्यादी आजार. लिव्हर किडनी खराब होतात. शरीराचे अवयव दुर्बल होतात. डोळे तर जवळपास सर्वांचे खराब होतात. जीवापाड मेहनत करून कमविलेला पैसा आजारात खर्च होतो. परिस्थीती अशी आहे जवळ पैसा असला तरी ५० टक्केहून जास्त वरिष्ठ नागरिक भविष्यात वृद्धाश्रमात दिसतील. आज जवळपास संपूर्ण समाज इंद्रिय सुखानसाठी बद्ध झाला आहे. माणसाच्या अति उपभोगामुळे पृथ्वीचे पर्यावरण बिघडले आहे. त्याचे वाईट परिणाम ही आपण भोगतो आहे. शेवटी बद्ध व्यक्ती संसारात तर अपेशी राहतोच, पण त्याला परमार्थ ही साध्य होत नाही.त्याची स्थिती ‘धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का’ सारखी होते.


समर्थांनी आजच्या पिढीला सावध करण्यासाठी आणि आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रुपी कुत्र्यांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी, पहिली पायरी म्हणून या समासात जवळपास  १०० बद्ध लक्षणांचे विस्तृत वर्णन केले आहे. एकदा आपल्याला आपले इंद्रिय जनीत दोष कळले की आपण त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करूच. हे दोष कसे दूर करायचे याचे वर्णन समर्थांनी पुढील मुमुक्षु लक्षण या समासात केले आहेत.


जय जय रघुवीर समर्थ




No comments:

Post a Comment