Wednesday, April 3, 2024

वाढदिवस स्पेशल आलू बोंडे

आज माझा ६३वां  वाढदिवस. सौ. ने  वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून  गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत  शिऱ्याचा नैवैद्य दाखविला. नंतर आलू बोंड्याची तैयारी सुरू केली.


पाच-सहा बटाटे कुकर मध्ये उकडायला ठेवले. कोथिंबीर, कैरी, पुदिना (घरचा), आले, लसूण आणि भरपूर हिरवी मिरची टाकून झणझणीत हिरवी चटणी बनवली. एक कांदा, चार टॉमेटो, लसूण, आले, आणि  थोडे तिखट टाकून थोडी टॉमेटोची लाल रंगाची सौम्य चटणी बनवली.

उकडलेले बटाटे थंड पाण्यात टाकून थंड करून किसले (असे केल्याने स्वाद उत्तम राहतो), त्यात १०० ग्राम पनीर ही किसून टाकले (पनीर हे पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही), थोडी फुल गोबी ही किसून टाकली.(चव मस्त येते). कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून टाकली. हळद, आंबट, तिखट, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ टाकून मिश्रण एक जीव केले. हळद आणि मीठ टाकून बेसनाचा घोळ तैयार केला. मिश्रणाचे गोळे करून बेसनात बुडवून तेलात तळले.  सौ. ने सोम बाजारातून कमी तिखट वाल्या मोठ्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. उरलेल्या बेसनाच्या घोळात बुडवून मिरचीचे भजे केले. आलू बोंड्या सोबत चवीसाठी काही मिरच्या तेलात तळल्या. त्या मिरच्यांवर लिंबू पिळले.

झणझणीत भजे खाल्यानंतर. शिऱ्यावर ताव मारला. अश्या रीतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. 

No comments:

Post a Comment