Thursday, February 22, 2024

वार्तालाप (३१):: गजेंद्रू महासंकटि वाट पाहे

 जय जय रघुवीर समर्थ 

गजेंद्रू महासंकटि वाट  पाहे
तया कारणे श्रीहरी धांवता आहे.
उडी घातली जाहला जीवदानी 
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी.(११८)

समर्थ म्हणतात, एकदा महा बलशाली गजेंद्र एका सरोवरात आपल्या परिवारासंगे जल क्रीडा करत होता. अचानक एका मगराने त्याचे पाय धरले आणि त्याला पाण्यात ओढू लागला. गजेंद्र जमिनीवर भल्या मोठ्या वृक्षांना सोंडेने उपटून टाकू शकत होता. सिंहलाही आपल्या पायदळी तुडवू शकत होता. पण पाण्यात या शक्तींचा काही एक उपयोग नव्हता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गजेंद्रने भगवंताचे स्मरण केले आणि मदतीची याचना केली. गजेन्द्रची आर्त हाक ऐकून भगवंत धावत गेले आणि गजेंद्रला मगर पाशातून मुक्त केले.

अनेक सुशिक्षित लोकांची ही धारणा असते, पुराण कथा म्हणजे भाकड कथा. प्रत्यक्षात पुराण कथा आपल्याला सांसारिक भोग भोगून ही परमार्थाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवितात. 

गजेंद्र म्हणजे बुद्धिमान मानव. सरोवरातील जलक्रीडा म्हणजे सांसारिक भोग. मगरपाश म्हणजे कधी न तृप्त होणारी भोगलिप्सा. भोगलिप्सेत बुडालेल्या मानवाच्या नशीबी अखेर फक्त सांसारिक दुःखच येतात. त्याला जन्म मरणाच्या  चक्रातून त्याला मुक्ती मिळणे अशक्यच. 

आजच्या घटकेला मानवाला आपल्या शक्ती आणि बुध्दीचा अहंकार झाला आहे. अहंकार सोबत मद, मोह, मत्सर आणि वासना ही बलवती होतेच. मानवाला वाटते सर्व पृथ्वी फक्त आपल्याच भोगण्यासाठी आहे. आपल्या अपरिमित इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण समस्त वनस्पती आणि जीव सृष्टीचे विनाश करतो आहे. एक उदाहरण, कीटक, पशु-पक्षी शेतीला त्रास देतात. पशु - पक्षी, जनावरांना मारून टाका. जमिनीत जहर टाका, विषाक्त रसायन हवेत उडवा. कीटकांचा विनाश करा. असे करताना आपण विसरून जातो की हे विषाक्त अन्न आपल्यालाच खायचे आहे. मानवाचा अहंकार तर एवढा मोठा की जो कोणी माझ्या भोग मार्गात आडवा येईल त्याला मी नष्ट करणार, मग तो मानव का असेना. एवढे सर्व करून मानवाची भोगलिप्सा शांत झाली आहे का. उत्तर नाही. पण या सर्व मानवीय दुष्कृत्यांचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. पृथ्वी मातेच्या अति दोहनामुळे अन्न जल आणि वायू दूषित झाले आहे. ग्लोबल वॉर्मिग मुळे पृथ्वीच्या वातावरण बिघडले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ रोजचे झाले आहे. हजारो लोक दरवर्षी युद्धात मरत आहे, वनस्पती जीव सृष्टी वेगाने नष्ट होत आहे. दर दुसरा व्यक्ती  शारीरिक आणि मानसिक व्याधीने ग्रस्त आहे. आपण असेच भोगरुपी मगर पाशात अडकून राहू तर सांसारिक सुख मिळणार नाहीच आणि परमार्थ सिद्ध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  याशिवाय  मानव जातीच नष्ट झाली तर अब्जावधी वर्षे आपल्याला लक्षावधी हीन योनीत भटकावे लागेल. कारण मोक्ष मार्गावर चालण्याची बुद्धिमत्ता फक्त मानवापाशी आहे, असे विद्वानांचे मत आहे.

प्रश्न मनात येणारच, या भोगरूपी मगर मिठीतून मुक्तीसाठी कुणाला याचना करायची.  समर्थ म्हणतात,  

दीनानाथ हा राम कोदंडधारी
पुढें देखतां काळपोटीं भरारी.
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. (२८)

जेंव्हा श्रीराम हातात धनुष्य बाण  घेऊन दुःखी भक्तांच्या मदतीला धावत येतात, तेंव्हा काळाचेही काही चालत नाही. कारण कोदंडधारी राम आपल्या भक्ताची  कधीही उपेक्षा करीत नाही. समर्थ पुढे म्हणतात,"नुपेक्षी कदा राम दासाभिमानी" माझे वाक्य १०० टक्के सत्य आहे.

भगवंताचे नामस्मरण सांसारिक भोगातून मुक्तीचा सर्वात सौपा उपाय आहे. गजेंद्रने भगवंताचे नामस्मरण केले आणि तो मोह पाशातून मुक्त झाला. भगवंताचे  नाव घ्यायला काहीही खर्च येत नाही. कोणत्याही विधि- विधानाचे पालन करावे लागत नाही. जेंव्हा ही वेळ मिळेल, तेंव्हा उठता-बसता, जेवता, काम करता भगवंताचे  नामस्मरण करता येते. सतत नामस्मरण केल्याने हळू-हळू आपली वृत्ती पालटते. अहंकार नष्ट होतो. सांसारिक जीवनात उभोगाची आणि वासनेची मर्यादा आपल्याला कळते. भगवंताने निर्मित केलेल्या समस्त जीवसृष्टी प्रति प्रेम उत्पन्न होते. उपनिषदात स्वयं भगवंत म्हणतात, जो सर्व प्राण्यांमध्ये मला पाहतो, कुणाशीही घृणा करत नाही, सर्वांच्या जगण्याचा अधिकार जपतो, तोच मला प्राप्त करतो. असा व्यक्ती पूर्ण आयुष्य जगतो आणि सांसारिक मोहपाशातून मुक्त होतो. भगवंताच्या नाम स्मरणाने परमार्थाचा मार्ग सहज सुगम होतो. एवढेच नव्हे तर या मार्गावर चालून आपण समस्त मानव जातीला ही विनाशापासून वाचविण्यात हातभार लावू शकू. माझ्या मते समर्थांनी मनाच्या या श्लोकाच्या माध्यमाने मानव जातीला हाच उपदेश केला आहे.



No comments:

Post a Comment