खरं प्रेम शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला. संध्याकाळच्या कुंद प्रकाशात-पायाखाली वाळलेली पाने चुरडत, तो चालत होता. त्याला अनुभवायचा होता प्रेमाचा खरा स्पर्श- जो शब्दांपलीकडचा होता. पण प्रेमाच्या वर्तुळाचे दुसरे टोक त्याला कधीच सापडलं नाही. तो आयुष्यभर कोरडाच राहिला… आणि खरं तर, कोणालाच सापडले आहे का?
हे जग म्हणजे मोह, माया आणि वासनांचे भोवरे. आपण या भोवर्यांतच गटांगळ्या खात राहतो. प्रेमाच्या गूढ, अथांग महासागरचा स्पर्श आपल्याला होतच नाही. तो अनुभवायचा असेल तर, गरज आहे अहंकाराने बंद झालेल्या हृदयाच्या कपाटांना उघडण्याची. जेव्हा हे कपाट उघडतील, तेव्हा प्रेमाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसेल.
त्या प्रकाशात कळेल, जल, थल, नभ- संपूर्ण चराचर सृष्टीत फक्त एकच तत्त्व व्यापलेलं आहे. ते म्हणजे प्रेम. प्रेम दृश्य ही आहे आणि अदृश्य ही आहे. ह्या प्रेमामुळे जगाचे अस्तित्व टिकून आहे.ते अनुभवायचं असेल, तर स्वतःच्या आत डोकवावं लागत, बाहेर ते कधीच मिळणार नाही.
No comments:
Post a Comment