Wednesday, July 1, 2026

वडाचे झाड आणि चिमणा



आयुष्यभर
वडाच्या झाडाने हजारो पक्ष्यांना आसरा दिला होता. त्याच्या फांद्यांवर कितीतरी पिढ्यांनी घरटी बांधली, प्रेम फुलवलं, पिल्लांना उडायला शिकवलं. प्रत्येक चिवचिवाटात झाडाचं हृदय धडधडत होतं.

पण आता वड थकला होता. त्याचा बुंधा वाळवींनी पोखरला होता. पाने गळून पडली होती. उरल्या होत्या फक्त कोरड्या, थकलेल्या फांद्याजणू आठवणींचे अवशेष.

सर्व पक्षी एकेक करून निघून गेले. आकाशात नव्या आश्रयाच्या शोधात. पण एक चिमणा मात्र अजूनही वडाच्या कोटरात रहात होता. एकटा, पण आठवणींनी भरलेला.
 
एक संथ संध्याकाळी वडाने थरथरत्या स्वरात चिमण्याला सांगितले,

"चिमणा भाऊ, तूही निघून जा. माझा आता काही भरवसा नाही. पावसाळा जवळ आलाय. आभाळात विजा चमकत आहेत. मला वाटत नाही की येणाऱ्या वादळासमोर मी तग धरू शकेन."

चिमणा थोडा वेळ गप्प राहिला. मग हळुवारपणे म्हणाला,

"दादा, याच झाडावर मला माझी चिवताई भेटली होतीतिच्या नजरेतून प्रेमाचा स्पर्श मला जाणवला. आम्ही दोघांनी इथेच घरटे बांधलं. तूच आम्हाला दाणा-पाणी आणि आसरा दिला. आमची पिल्लं तुझ्याच फांद्यांवर खेळत मोठी झाली. आणि एक दिवस... माझी चिवताई याच घरट्यात प्राण सोडून गेलीतिच्या आठवणी इथेच दडल्या आहेत. कसा सोडून जाऊ मी तुला?"

त्या रात्री आकाश फाटलं. वादळ कोसळलं. विजांचा कडकडाट, मूसळधार पाऊस. वडाचं झाड उन्मळून पडलं. त्याच क्षणी चिमणाही खाली पडला.

पण दूर, आकाशाच्या एका शांत कोपऱ्यात, चिवताई त्याची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यांत पुन्हा एकदा प्रेमाची ओल होती. ती म्हणाली,

"किती वाट पाहिली तुझी..."

चिमणा हसला, डोळे मिटले. आणि काही क्षणात दोघं पुन्हा एकत्र आकाशात विहार करू लागलेकधीच विलग होण्यासाठी.

 
 

No comments:

Post a Comment