Sunday, June 28, 2026

युवकांनो, आधी स्वतःला घडवा; मग लोकशाही मार्गाने राष्ट्र घडवा.


भारत हा जगातील सर्वात तरुण लोकशाही राष्ट्रांपैकी एक आहे. आपल्या देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या हातात आहे. आज सोशल मीडियाच्या युगात अनेक संघटना, नेते आणि आंदोलने युवकांना आपल्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने भावनेपेक्षा विवेक, अभ्यास आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
 
दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरवर कोट्यवधी अनुयायायी असलेल्या कोक्रोच संघटनेचे आंदोलन झाले. भारतीय आणि जागतिक माध्यमांचे लक्ष त्या आंदोलनाकडे होते. मात्र ते आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरले. युवा पिढी आंदोलनापासून दूरच राहिली. त्यामागचे कारण काय?" सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की कोणत्याही राष्ट्राची उभारणी  केवळ घोषणांनी, आंदोलनांनी किंवा सोशल मीडियावरील प्रचाराने होत नाही. राष्ट्रनिर्माणासाठी शिक्षण, चारित्र्य, कौशल्य, संघटनशक्ती आणि समाजसेवा यांची आवश्यकता असते. इतिहास साक्ष देतो की समाजात कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणणाऱ्या व्यक्तींनी आणि संघटनांनी अनेक वर्षे अभ्यास, तपश्चर्या आणि जनसेवा केली होती. 
 
 
भारतीय लोकशाहीवर युवकांचा विश्वास नेहमीच दृढ राहिला आहे. याचे उदाहरण म्हणजे विविध काळात सुशिक्षित युवकांनी लोकशाही मार्गाने सत्ताबदल घडवून आणला आहे. आसाममधील विद्यार्थी चळवळीमधून नेतृत्व निर्माण झाले आणि लोकशाही प्रक्रियेतून सत्ता प्राप्त झाली. अरविंद केजरीवाल यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून लोकशाही मार्गाने सत्ता मिळवली. दक्षिण भारतात अभिनेता विजय यांनीही राजकारणात प्रवेश करून लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला. यावरून स्पष्ट होते की भारतातील युवक परिवर्तनासाठी मतपेटी आणि लोकशाही व्यवस्थेलाच सर्वात प्रभावी साधन मानतात.

युवकांनी हेही लक्षात घ्यावे की सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनाधार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लाखो फॉलोअर्स असणे आणि हजारो समर्पित कार्यकर्ते असणे यात मोठा फरक आहे. एखाद्या संघटनेची खरी ताकद तिच्या सेवा कार्यात, संघटनशक्तीत आणि समाजाशी असलेल्या जिवंत नात्यात असते. जी संघटना शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण आणि समाजसेवा यासाठी सातत्याने कार्य करते, तिलाच टिकाऊ जनसमर्थन प्राप्त होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुयायी मिळतात, पण खरे जनसमर्थन मिळत नाही, हे आपण नुकतेच अनुभवले आहे. यामधून एक महत्त्वाचा धडा मिळतो: केवळ प्रचार पुरेसा नसतो. समाजाचा विश्वास जिंकण्यासाठी सातत्यपूर्ण सेवा, संपर्क आणि संघटन उभारणी आवश्यक असते. उदाहरणार्थ, शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एक सामाजिक संघटना म्हणून जनतेत लोकप्रिय आणि प्रभावी आहे.
 
विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी  आंदोलनांमध्ये सहभागी होताना विवेकाने निर्णय घेतला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय आणि कायदेशीर आंदोलन हा नागरिकांचा अधिकार आहे. परंतु कोणत्याही आंदोलनात अराजक प्रवृत्तीचे लोक घुसले आणि हिंसा किंवा तोडफोड झाली, तर त्याचे परिणाम अनेकदा निरपराध युवकांनाही भोगावे लागू शकतात. न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्षे चालू शकते. अशा वादांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, स्पर्धा परीक्षांवर आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो. आजच्या स्पर्धात्मक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रत्येक कृतीचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले पाहिजेत.
 
याचा अर्थ असा नाही की युवकांनी समाज आणि राष्ट्राच्या प्रश्नांपासून दूर राहावे. उलट त्यांनी प्रथम स्वतःला सक्षम बनवावे. ज्ञान, कौशल्य, चारित्र्य आणि आर्थिक स्वावलंबन प्राप्त केल्यानंतर समाजासाठी केलेले कार्य अधिक प्रभावी ठरते. इतिहासातील अनेक महान नेत्यांनी प्रथम शिक्षण पूर्ण केले, स्वतःला घडवले आणि त्यानंतर समाजकार्यात प्रवेश केला.महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी केवळ विरोध केला नाही, तर राष्ट्रनिर्माणाची व्यापक दृष्टीही दिली.
 
सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात स्वामी दयानंद सरस्वती यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या गुरु विरजानंद यांच्याकडून वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा भ्रमण करून समाजातील समस्या समजून घेतल्या. अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र, जादूटोणा, खर्चिक कर्मकांड आणि विविध सामाजिक कुरीतींविरुद्ध त्यांनी जागृती केली. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढे शिक्षणाच्या प्रसारासाठी डी..व्ही. संस्थांसारख्या शैक्षणिक परंपरांना प्रेरणा मिळाली. हे उदाहरण आपल्याला सांगते की चिरस्थायी सामाजिक परिवर्तनासाठी सखोल अध्ययन, चिंतन आणि संघटन उभारणी आवश्यक असते.
 
आजचा विद्यार्थी जर खरोखर समाजपरिवर्तन घडवू इच्छित असेल, तर त्याने तीन गोष्टी केल्या पाहिजेत. प्रथम- स्वतःच्या शिक्षणावर आणि कौशल्यविकासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. द्वितीय- एखाद्या प्रत्यक्ष समाजसेवा कार्याशी जोडले जावे, जसे की गरजू मुलांना शिकवणे, पर्यावरण संवर्धन, रक्तदान किंवा कौशल्य प्रशिक्षण. तृतीय- लोकशाही प्रक्रियेचे ज्ञान घेऊन सजग आणि जबाबदार नागरिक बनावे.

लोकशाहीत सरकार बदलण्याचे सर्वात प्रभावी आणि स्थायी साधन म्हणजे निवडणूक. जर एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला वाटत असेल की सरकारच्या धोरणांमध्ये त्रुटी आहेत, तर त्यांनी लोकांना आपल्या विचारांशी जोडावे, संघटना उभी करावी आणि लोकशाही मार्गाने जनसमर्थन मिळवावे. हाच मार्ग संविधानसुसंगत आहे आणि दीर्घकालीन यश मिळवून देणारा आहे.
 
शेवटी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, क्षणिक भावनेपेक्षा दीर्घकालीन निर्मिती अधिक महत्त्वाची असते. घोषणा देण्यापेक्षा ज्ञान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा चारित्र्यनिर्मिती अधिक महत्त्वाची आहे. आणि केवळ विरोध करण्यापेक्षा समाज राष्ट्राला पुढे नेणारा सकारात्मक पर्याय उभा करणे अधिक महत्त्वाचे आहे.

 

No comments:

Post a Comment