Friday, January 2, 2026

"विरही स्पर्श"

(काल्पनिक कथा)

त्या दिवशी शनिवार होता, कनॉट प्लेस इथल्या सरकारी कार्यालयातून  दुपारी अडीच वाजता काम पूर्ण करून बाहेर पडलो. मेट्रो स्टेशनकडे  जाताना, मला ती माझ्याच दिशेने चालत येताना दिसली. तिने ही मला पाहिले, 

"विवेक", ती धावतच माझ्या जवळ आली. जणू तिला मला मिठी मारायची होती. पण जवळ येताच ती थबकली. आज ही ती तशीच दिसत होती. सड-पातळ, पंजाबी उजळ रंग, फक्त केस थोडे पांढरे झालेले होते. तिच्या चेहर्‍यावर आनंद आणि भीतीचे मिश्र भाव  दिसत होते. 

मी "तुझ्यात काहीच बदल नाही. अगदी तशीच दिसते आहे जशी 35 वर्षांपूर्वी दिसत होती". ती हसत म्हणाली तू ही अगदी तसाच आहे, फक्त केस पांढरे झाले आहे. 

मी हसत म्हणालो "वय झाले आहे आता आपले. कॉफी हाऊस चलते का? आपल्याला गप्पा ही मारता येतील".  न कळत मी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि आम्ही कॉफी हाऊसच्या दिशेने चालू लागलो. 

1981 बहुतेक ऑगस्ट महिना असेल. मला राजेंद्र प्लेस इथल्या एका व्यापारीक संघटनेत तात्पुरती नौकरी मिळाली होती. तीही याच परिसरात एका दुसर्‍या कंपनीत काम करत होती. माझ्याच वयाची होती. तिळक नगर येथे राहत होती. चार्टर बस मध्ये तिची ओळख झाली. ती बी.कॉमच्या  फायनल मध्ये होती. तिला अकाऊंट मध्ये समस्या होती. माझे अकाऊंट उत्तम होते. रविवारी आणि वेळ मिळाल्यास अकाऊंटच्या अभ्यासासाठी आमच्या घरी येऊ लागली. असेच एक दिवस अभ्यास झाल्यावर, मी तिला सोडायला जेल रोड जात असताना, आमच्या भागातील काही टवाळखोर मुले माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत गेले. मला चुकचुकल्या सारखे वाटले. मला जाणवले, माझ्या हात तिच्या खांद्यावर ठेवलेला आहे. मी हळूच हात हटविला आणि तिला म्हणालो, "चुकून हात खांद्यावर ठेवला, सॉरी". तिने माझा हात पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवला आणि माझ्याकडे पहात हसत म्हणाली, मूर्ख आहे तू, तुला काहीच कळत नाही. ती माझ्या प्रेमात पडली होती. त्याकाळी शनिवारी आफिसांमध्ये दुपारी एक वाजता सुट्टी होत होती. सुट्टी झाल्यावर तिच्या सोबत राजेंद्र प्लेसच्या रचना सिनेमा हॉल मध्ये दोन-तीन सिनेमे बघितले असतील. बॉलीवूड हीरो-हिरोईन आम्ही  सारखे बुद्ध गार्डन मध्ये ही फिरलो. 

पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. काही दिवसांपासून ती भेटली नव्हती. एक दिवस तिची ऑफिस मधली मैत्रीण लंच टाइमला तिचा निरोप घेऊन आली. ती म्हणाली, विवेक तिला भेटण्याचा प्रयत्न करू नको, आमच्या ऑफिस मध्ये ही येऊ नको. मी विचारले, काय झाले. ती म्हणाली, काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी, तिच्या मोठ्या भावाच्या मित्रासोबत तिला लग्ना बाबत विचारले. तिने नकार देत म्हंटले, त्याच्या दारुड्या मित्राशी मी लग्न करेल असा विचार तुमच्या मनात आला तरी कसा. तिचा भाऊ भडकला, वडिलांना म्हणाला, "मी म्हणत होतो तिला नौकरी करू देऊ नका. बाहेर  "नैनमटका" करत असेल". भावाचे म्हणणे ऐकून, तिला ही राग आला, हो करते, काय करणार तू. तो तुझ्या सारखा दारुडा नाही. निर्व्यसनी आहे आणि चांगल्या ब्राह्मण परिवाराचा आहे. त्या काळात दिल्लीत खालिस्तानी वारे वाहत होते. तिच्या बापाचा पारा चढला. कमरेवरचा बेल्ट काढून तिला मारणे सुरू केले. तिच्या बापाला तिच्या कडून तुझे नाव वदवून घ्यायचे होते. पण ती मार खात राहिली पण तिने तोंडातून तुझे नाव घेतले नाही. शेवटी तिच्या आईने कसे-बसे तिला वाचविले. तिच्या भावाने तर तुला मारण्याचा प्रण केला आहे. मी विचारले, तुला हे सर्व कुणी संगितले. त्या दुर्दैवी घटनेच्या दोन किंवा तीन दिवसांनी तिचा भाऊ ऑफिसला आला आणि म्हणाला तिचा अपघात झाला आहे. तिला भरपूर मार लागला आहे. बहुतेक ती आता ऑफिसला येऊ शकणार नाही. नंतर माझ्या जवळ येऊन म्हणाला, "तिचा एक बॉयफ्रेंड आहे, तिला त्याला भेटायचे आहे. मला तिचा निरोप त्याला द्यायचा आहे". त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून माझी सहावी इंद्रिय जागी झाली. मी त्याला म्हणाले, माझी तिची मैत्री फक्त ऑफिसची आहे. बाहेर ती काय करते मला माहीत नाही. तो पुटपुटला, नका सांगू कुठे जाईल तो. आमच्या मॅनेजरला ही तिच्या सोबत काही वाईट घडले आहे, याची शंका आली. दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळी मॅनेजरसोबत मी तिच्या घरी गेले. घरी फक्त तिची आई होती. तिची आई आमच्यासाठी चहा ठेवला स्वैपाक घरात गेली. तेंव्हा ती हळूच मला म्हणाली, "विवेकला सांग सध्या काही महीने मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. माझा भाऊ कॅनडा जाण्याचा प्रयत्न करतो आहे. तो गेला की मी  स्वत:हून विवेकला  भेटेल". 

नोव्हेंबर महिन्यात मला सरकारी नौकरी लागली. घरची आर्थिक परिस्थिति थोडी बदलली. जानेवरी 83 मध्ये आम्ही हरिनगर येथील एलआयजी फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो. एक दिवस मी तिच्या ऑफिस मध्ये गेलो. तिची मैत्रीण म्हणाली "ती काही पुन्हा ऑफिसला आली नाही. काही दिवसांपूर्वी मी, तिच्या घरी गेली होती. तिचे घर बंद होते. मला एवढेच कळले तिच्या वडिलांनी मुलाला कॅनडा पाठविण्यासाठी घर विकले आणि उरलेल्या पैश्यांनी एक फ्लॅट विकत घेतला आहे". 

मी निस्तब्ध झालो. एवढ्या मोठ्या दिल्लीत मी  तिला शोधणार कुठे? माझी प्रेमाची कथा इथेच अर्धवट संपली होती. 

कॉफी पिताना तिने मला विचारले, विवेक तुझा संसार कसा काय सुरू आहे. मी म्हणालो, तुझा काही पत्ताच लागला नाही. पंचविसी उलटताच आईने पसंद केलेल्या मुलीशी लग्न केले. दोन अपत्य आहे.  तुझे काय. ती म्हणाली. सहा महिन्यांनी भाऊ कॅनडाला गेला. त्याच आठवड्यात आई-बाबांचा अपघात झाला. त्यांच्या स्कूटरला एका ट्रक ने धडक दिली होती. वडील नहमीसाठी अंथरूण पकडून बसले. आई ही वर्षभर अंथरुणावर होती. माझा पूर्ण दिवस त्यांच्या सेवेत निघून जायचा. स्वत:चा विचार करण्याचा वेळ ही नव्हता. वडिलांची दुकान विकली. लाख रुपये फिक्स मध्ये टाकले. त्या व्याजवर आणि भाऊ पैसे पाठवायचा त्यातच कसाबसा गुजारा होऊ लागला. वर्षभरानंतर आई वाकरच्या मदतीने चालू लागली होती. एक दिवस वेळ काढून तुझ्या घरी गेली. पण तुम्ही तिथून शिफ्ट झाला होता. माझी ऑफिसची मैत्रीण ही नौकरी सोडून गेली होती. तुझा पत्ता कुणापाशी नव्हता. तू कुठे आहे, कळण्याचा मार्ग नव्हता. भावाने कॅनडात लग्न केले आणि पैसे पाठविणे बंद केले. आई-वडिलांच्या उपचारात  बॅंकेतली  जमा बचत ही कमी होऊ लागली होती. मी घरी ट्यूशन घेणे सुरू केले आणि सरकारी नौकरीसाठी जोमाने तैयारी सुरू केली. 1986 अखेर मला सरकारी नौकरी मिळाली. पुन्हा तुझी आठवण आली. एक दिवस तुझी माहिती मिळाली. तुझे लग्न झाले आहे, कळले. मी हताश आणि निराश झाली. बहुतेक माझ्या भाग्यात आई वडिलांची सेवा होती, म्हणून नियतीने आपल्या दोघांना दूर केले असावे. "आता कसे आहेत दोघे", मी विचारले. ती म्हणाली, वडील पुढे चार-पाच वर्षानी गेले. माझे आजोबा पाकिस्तानातून एकटेच जीवंत आले होते. बाबा ही एकुलते एक होते. एक भाऊ होता, तो ही अंतिम संस्कारासाठी आला नाही. मीच वडिलांचा अंतिम संस्कार केला. आई ने मला अनेकदा लग्नाबाबत विचारले. पण अपंग आईला सोडून मी कुठे जाणार. अखेर गेल्या वर्षी ती ही वर गेली.   

काही क्षण थांबून मी तिला विचारले, तुझा पत्ता आणि फोन नंबर देते का? काही गरज पडली तर... 

तिने माझा उजवा हात तिच्या हातात घेतला. तिच्या स्पर्शातील दाहकता मला जाणवली. ती म्हणाली, विवेक, मी आयुष्यात एकाच पुरुषाला स्पर्श केला आहे. त्याला मिठी मारली आहे. जेंव्हा रात्री मी बैचेन होते, जीव कासावीस होतो, तुझा स्पर्श आठवून मनाला सात्वना देते. मला जगण्यासाठी तो प्रेमाचा एक स्पर्श पुरेसा आहे. माझा पत्ता मी देणार नाही. फोन नंबर ही मागू नको. मी दिसली तर दुसर्‍या वाटेने निघून जा. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या भावनांचा बंध फुटला तर त्या ज्वालेत आपण दोघे भस्म होऊन जाऊ. माझ्या सोबत तुझा संसार ही उध्वस्त होईल. बोलताना तिचा वाढता श्वासोश्वास आणि आवाजातील कंप मला जाणवत होता. बोलता-बोलता ती उठली, तिने पर्स हातात घेतली आणि झपाझप पाऊले टाकत विरुद्ध दिशेने बाहेर निघून गेली. एकदाही तिने मागे वळून पहिले नाही. मी अवाक होऊन तिला जाताना पहात राहिलो. स्तब्ध आणि जडवत. माझ्या डोळ्यात अश्रु उभे राहिले. तिच्या स्पर्शचा दाह अजूनही जाणवत होता.  ती आतल्या आत जळत होती. तरीही तिने स्वतला सावरले आणि माझा स्पर्श घेऊन पुन्हा माझ्या आयुष्यातून निघून गेली. त्यानंतर मला कित्येक रात्र झोप आली नाही. मनात अनेक प्रश्न उठत होते. मी तिला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? लग्न करायची घाई का केली? तिच्या शब्दांवर विश्वास ठेऊन तिची वाट पाहू शकत नव्हतो का? पण गेलेल्या काळातील प्रश्नांचे उत्तरे कधीच मिळत नाही. शेवटी आपण नियतीचे गुलामच. 

तिला माझी माहिती मिळाली होती तरी एवढे वर्ष तिने माझ्याशी बोलण्याचा किंवा मला भेटण्याचा विचार ही केला नाही. तिला माझ्या सुखी संसाराला तिची नजर लागू द्यायची नव्हती. ती ही गॅजेटड ऑफिसर झालेली होती. तिचा पत्ता आणि फोन नंबर मिळविणे काही कठीण नव्हते. पण तिच्या शब्दांच्या बाहेर जाण्याचा विचार मी केला नाही. आता माझा स्पर्श हृदयात जपून ती उरलेले आयुष्य जगणार होती. तिने माझ्यावर खरे प्रेम केले होते. पण मी.... या प्रश्नाचे उत्तर अनेकदा शोधून ही मला मिळाले नाही



No comments:

Post a Comment