अलकानगरी—कुबेराची वैभवशाली राजधानी. सुवर्णमय रस्ते, रत्नजडित इमारती आणि यक्ष-किन्नरांच्या गगनचुंबी महालांनी नटलेली नगरी. इथे सौंदर्य हेच मूल्य आणि वैभव हेच धर्म. पण या झगमगाटाच्या आड एक गूढ, विषारी सत्य लपलेलं होतं.
आषाढाचा मेघ—वरुणराजाच्या आज्ञेने—अलकानगरीकडे निघाला होता. त्याच्या उदरात अमृतासारखं पाणी होतं, पण वातावरणात मिसळलेल्या धुरामुळे ते आता विषासमान झालं होतं. यक्षप्रिया, अलकानगरीतील एका महालात राहात होती, आपल्या प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली. तिच्या मनात आशा होती की मेघ तिच्यासाठीच विजा चमकवत आहे.
आकाशात विजेचा कडकडाट ऐकून यक्षप्रियेचा आनंद गगनात मावेना. ती धावतपळत इमारतीच्या गच्चीवर पोहोचली. तिला आकाशात भला मोठा काळाकुट्ट मेघ दिसला. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून तिला वाटलं, बहुतेक मला शोधण्यासाठीच या विजा चमकत आहेत. तिला प्रियकराचे बोलणे आठवले—"प्रिये, तू अंधारातही विद्युतलतेसारखी सुंदर दिसतेस. साक्षात रंभाच जणू. दिव्याची काय गरज?" प्रियकराची आठवण येताच स्त्रीसुलभ लज्जा तिच्या गालावर पसरली. ती अधिकच सुंदर दिसू लागली. काही क्षणात जोरात पाऊस सुरू झाला. ती आज पहिल्यांदाच आषाढच्या पावसात मनसोक्त भिजली. पण हे काय! अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. आपला चेहरा जळतो आहे, असं तिला वाटलं. ती कसेबसे आपल्या कक्षात आली. दर्पणात बघितलं. तेजाबी पाण्याने तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जागोजागी घाव झाले होते. दर्पणात स्वतःचा चेहरा पाहून ती किंचाळली. अनेक चित्रविचित्र विचारांचे वादळ तिच्या मनात उठले. आपला कुरूप चेहरा पाहून प्रियकर पूर्ववत प्रेम करेल का? त्याने तिचा त्याग केला तर? यक्षांच्या राज्यात सुंदर शरीरच स्त्रीचं आभूषण होतं. अखेर तिने कठोर निर्णय घेतला.
पाऊस थांबला. वातावरण स्वच्छ झालं. पण खालील जमिनीवरचं दृश्य पाहून आषाढच्या मेघाने धसकाच घेतला. वृक्ष-लता तेजाबी पाण्याने जळून काळ्या पडलेल्या होत्या. अनेक पक्षी मृत झालेले दिसले. "अरेSरे! माझ्या उदरातलं अमृतसमान पाणी वातावरणात पसरलेल्या तेजाबी हवेत मिसळून विषासमान झालं!" अचानक त्याला यक्षप्रियेची आठवण आली—तीही प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली असेल. मेघाने खाली चहूकडे पाहिलं. एका इमारतीकडे मेघाचं लक्ष गेलं—बहुतेक यक्षाने वर्णन केलेली हीच ती इमारत. पण इमारतीखाली एवढी भीड का? एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे विद्रूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते—"हिचा नवरा परदेशी गेलेला आणि हिला पावसात भिजायला हौस. माहित नव्हतं का हिला, राज्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच पावसापासून सावधान राहण्याचा अलर्ट दिला होता. एवढ्या टीव्ही, रेडिओवर घोषणा होतात. ऐकल्या नव्हत्या का हिने?" एक म्हणाला, "सौंदर्य नष्ट झाल्यावर जगणार तरी कशी?" दुसरा म्हणाला, "आपण सर्वच या विषारी वातावरणात हळूहळू रोज मरतो आहोत. कुणालाच चिंता नाही. राजाच जबाबदार आहे हिच्या मृत्यूला." जमलेले लोक सरकारविरोधात घोषणा देऊ लागले.
आषाढचा मेघ वरून सर्व काही पाहत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला दुःख झालं. "या सर्वाला आपणच जबाबदार आहोत," असं त्याला वाटलं. आता परतताना रामगिरीवर यक्षप्रियेच्या संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार? काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला—उदरातील पाणी घेऊन परत फिरावं आणि समुद्रात रिकामं करावं. पण त्याला वरुणराजाचा आदेश आठवला—जमिनीवर काय घडत आहे याची चिंता न करता दिलेलं पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळून पुढच्या प्रवासाला निघाला.
No comments:
Post a Comment