रात्री पोलिसांनी तिथे छापा मारला. प्रतिष्ठित शाळेत शिकणाऱ्या, उच्चशिक्षित कुटुंबातील १५-१८ वयोगटातील मुलांना नशेच्या अवस्थेत पकडलं. दम देऊन सोडलं. त्यात सोनलही होती.
आईचा आवाज घरभर घुमला,
"अशीच वागत राहिलीस, तर समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही!"
सोनल फणकारली,
"बSSस! तुझे प्रवचन ऐकून कान पिकले माझे! काय केलं मी? थोडी विस्की घेतली, मित्रांबरोबर मजा केली, एवढंच ना!
घरात कॉकटेल पार्टी असते, आणि तुझे डान्स मॅनर्स? त्या दिवशी उघड्या पाठीचं स्लिव्हलेस घालून, बासच्या गळ्यात-गळे घालून नाचत होतीस... आणि त्याचा हात—"
खटाक! सोनल किंचाळली.
वडील, मतिभ्रष्टासारखे, माय-लेकींच्या ओक्साबोक्सी रडण्याकडे पाहत, मनात विचार करत होते—
"आपलं काय चुकलं?"
सोनलच्या आईवडिलांनी जे आदर्श शिकवले, ते स्वतःच्या वागणुकीत जगू शकले नाहीत. त्यांच्या वैयक्तिक वर्तनात आणि सामाजिक नैतिकतेत विसंगती होती, ज्यामुळे मुलगी गोंधळली. जेव्हा आदर्श फक्त शब्दांत राहतात, तेव्हा त्यांचं मार्गदर्शन संपतं.
No comments:
Post a Comment