Monday, December 22, 2025

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका  प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर  चित्रगुप्त विराजमान होते . ते  धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. 

चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?”

तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.”

चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला. त्याच्या पानांवर त्या आत्म्याचे संपूर्ण जीवन, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार नोंदलेले होते. तो ग्रंथ पहात चित्रगुप्त म्हणले “पण माझ्या रेकॉर्डमध्ये तुझ्या क्षमायाचनेचा उल्लेख नाही.” 

तो आत्मा चकित झाला. “असं कसं होईल? मी मंदिरात गेलो होतो. फोटो घेतले, सेल्फी काढले, रिल बनवली. साक्ष आहे!”

चित्रगुप्त थोडं हसले. “हो, साक्ष आहे. मंदिराच्या सिंहद्वारासमोर तू सेल्फी घेतलीस. परिसरातील मूर्त्यांसोबत घेतलेले फोटो आहेत. धार्मिक विधींचे व्हिडिओ ही आहेत. देवतेच्या दर्शन घेताना  क्षमा मागण्याची  रिलही आहे. पण...”

चित्रगुप्त थोडं थांबले. “तुझं लक्ष फक्त कॅमेऱ्यात होतं. क्षमा मागताना तुझं अंतःकरण मौन होतं. तुझ्या डोळ्यांत भक्ती नव्हती, फक्त फ्रेम होती. तुझ्या मनात पश्चात्ताप नव्हता, फक्त पोस्टची घाई होती. त्यामुळे तुझं पाप नष्ट झालं नाही.”

तो आत्मा गप्प झाला. हिरमुसला.  

चित्रगुप्त म्हणाले, “मी तुला नरकात पाठवणार नाही.  तुला पृथ्वीवर परत पाठवतो—दिल्लीच्या चिडियाघरात, माकड रूपात.”

“माकड?” तो आत्मा चकित झाला.

“हो. तिथे तू माकड चेष्टा करशील. लोक तुझ्या सोबत  सेल्फी घेतील, फोटो काढतील, रिल बनवतील. जसं तू देवतेसमोर केलं होतंस. पण आता तू त्यांच्या फ्रेममध्ये असशील. लोक तुझ्या रूपात हास्य, करुणा आणि विसंगती पाहतील. तुला तुझा पूर्वीचा जन्म आठवेल ‘आपणही कधी असं केलं होतं आणि त्याच्या परिणाम भोगतो आहे. तेंव्हा तू खर्‍या अंतकरणाने केलेल्या पापांची क्षमा मागितली तर पुढच्या जन्मी तुला स्वर्ग मिळेल.   

तो आत्मा आता शांत होता. त्याला समजलं होतं—फोटो पुरावा नाही, भावनाच पुरावा आहे.

 


No comments:

Post a Comment