Thursday, December 18, 2025

फाइव स्टार नरकात सदू

भारतातील एका छोट्या तालुक्यात सदू नावाचा गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता. रोज सकाळी उठून तो मजुरीला जात असे. उन्हातान्हात काम करून, घाम गाळून, त्याचे पोट भरत असे. आयुष्य साधे होते. तो दररोज भगवंताला प्रार्थना करायचा "देवा, माझ्या नशिबात कधी श्रीमंत लोकांसारखी मौजमस्ती आहे का? मला काही दिवस तरी कामधंदा सोडून आराम करायचा आहे. पण माझ्याकडे पैसे नाहीत. तूच काही उपाय कर."
 
सदूची ही प्रार्थना देवापर्यंत पोहोचली. भगवंत त्याच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले:
"सदू, तुला एक महिना मौज करायची संधी देतो. पण तुला दोन पर्याय आहेत.
 
पहिला पर्यायगावातल्या शेतावर एका झोपडीत राहा. रोज तुला ताक, ज्वारीची भाकरी, दही आणि ताज्या भाज्या मिळतील. पक्ष्यांची गाणी, गायींचे हंबरणे, शुद्ध हवा आणि शांत वातावरण मिळेल.
 
दुसरा पर्यायदेशाच्या राजधानी दिल्लीत फाइव स्टार जीवन जग. आलीशान सोसायटीतील सर्वात वरच्या मजल्यावर फ्लॅट मिळेल. एसी, फ्रीज, टीव्ही, शॉवर, टबसगळ्या सुखसोयी असतील. खाण्यासाठी पिझ्झा, बर्गर, मोमो, चॉकलेट, आइसक्रीमजे हवे ते मिळेल."
 
भगवंत अजून बोलणार होते, पण सदू उतावीळपणे म्हणाला
"देवा, मला दिल्लीत पाठव. मला फाइव स्टार मौजमस्ती हवी आहे."
 
क्षणातच सदू दिल्लीतल्या फ्लॅटमध्ये पोहोचला. मऊ बिछान्यावर डोळे उघडले. एसी सुरू होता. फ्रीजमध्ये चॉकलेट, आइसक्रीम, फळे भरलेली होती. सुरुवातीला त्याला खूप आनंद झाला. पण काही मिनिटांतच त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
 
तो बाल्कनीत गेला. बाहेर काळसर धुके पसरलेले होते. दुपारचे दोन वाजले होते तरी सूर्य अंधुक दिसत होता. दिल्लीकर या धुक्याला "स्मॉग" म्हणतात. सदू सतत खोकू लागला, डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
 
अचानक त्याची नजर वर्तमानपत्रावर पडली. त्यात दिल्लीच्या स्मॉगमुळे होणाऱ्या आजारांचे वर्णन होते. त्याला कळले की इथे राहणारे लोक रोज या प्रदूषणाचा सामना करत आहेत. शुद्ध हवा नाही, श्वास घ्यायला त्रास होतो. हळूहळू त्यांचे आरोग्य खालावत जाते. अनेक जण श्वसनाचे रोग, हृदयविकार, डोळ्यांचे आजार यांना बळी पडतात. रोजच्या रोज ते या अदृश्य विषाने ग्रस्त होत आहेत आणि नकळत मृत्यूच्या दिशेने ढकलले जात आहेत. त्याला जाणवले  फाइव स्टार मौजमजेच्या नादात तो नकळत फाइव स्टार नरकात पोहोचला आहे. त्याला जाणवले की इथे महिनाभर राहिलो, तर तोही आजारी पडेल. काही महिन्यांनंतर त्याला पुन्हा आपल्या तालुक्याच्या छोट्या शहरात परतायचे आहेजिथे मेहनत आणि मजुरी करून जगायचे आहे. त्यासाठी प्रकृती उत्तम राहणे आवश्यक आहे इथे अधिक काळ राहणे योग्य नाही, हे ही त्याला स्पष्टपणे समजले.  
 
 तो पुन्हा देवाला प्रार्थना करू लागला"देवा, मला माझ्या तालुक्यात परत पाठव. मला मौज नको, मला माझे साधे आयुष्य परत हवे."
 
भगवंत हसले आणि म्हणाले"सदू, तू माझे बोलणे पूर्ण होऊ देता फाइव स्टार जीवन मागितलेस. इथे ऐशोआरामाची साधने आहेत, पण श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा नाही. सदू, जगात काहीच फुकट मिळत नाही; प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते. इथले रहिवासी भौतिक सुखासाठी शारीरिक आणि मानसिक दुःख भोगतात. किमान आता तरी तुला हे उमगले असेल." सदूने होकारार्थी मान हलवली. भगवंताने "तथास्तु" असे म्हणत आशीर्वाद दिला, आणि क्षणातच सदू पुन्हा आपल्या तालुक्याच्या छोट्या शहरात पोहोचला.'

(आज माझ्या राहत्या एनसीआरमधील फ्लॅटमधून दुपारी दोन वाजता आकाशात ढग नसतानाही सूर्य अंधुकसा दिसत होता. गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्दी-खोकला पिच्छा सोडत नाही आहे. वरील सर्वच रोगांचा त्रास आहे.  औषधांचा फारसा परिणाम होत नाही. डॉक्टर गमतीने म्हणाला"एनसीआर सोडून दूर जा.")


No comments:

Post a Comment