तेंव्हा माझं वय सुमारे १२ वर्षांचं असेल. अर्थात, थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो होतो. जुन्या दिल्लीत आमचं खेळायचं ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुनेपर्यंत पसरलेले विस्तीर्ण बाग.
मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं मैदान होतं. मैदानाचा एक भाग स्टीफन कॉलेजचा होता, म्हणून त्या मैदानाला लोक ‘स्टीफन ग्राउंड’ म्हणायचे. सुट्टीच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम्स तिथे खेळत असत. एवढ्या गर्दीत कोणत्या क्षणी डोक्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पनाही करता येत नसे.
आम्ही ५-६ मराठी मुले, काही मोहल्ल्यातली आणि दोन-चार मुस्लिम मुले, अशी आमची टीम असायची. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैसे गोळा करून २-३ रुपये जमवून कॉर्कचा चेंडू विकत घ्यायचो. त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १०-१४ रुपयांना मिळत असे.
श्रीमंत मुलं पांढऱ्या शुभ्र कपड्यांत, चांगल्या दर्जाच्या बॅट्ससह आणि खरी क्रिकेट बॉल घेऊन खेळायची. त्यांना पाहून आम्हाला इर्षा वाटणं साहजिकच होतं. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल, असं वाटत नव्हतं.
एक दिवस मैदानात गोटू भेटला. माझ्याच वयाचा असेल. त्याच्याकडे २-३ क्रिकेटचे चेंडू होते. त्याच्या जवळ असलेल्या क्रिकेट बॉल्सची क्वालिटी पाहून आम्हाला राहवलं नाही. सहज विचारलं, “कितीला देतो?”
तो म्हणाला, “१ रुपयापासून ५ रुपयांपर्यंतच्या बॉल्स आहेत. घ्यायच्या असतील तर सांग.” माझ्या मित्राला शंका आली. त्याने विचारलं, “इतक्या स्वस्त बॉल्स कुठून आणतोस?”
गोटू ऐटीत म्हणाला, “DDCAमध्ये ओळख आहे. मॅच संपल्यावर जुने बॉल्स ओळखीच्या लोकांना स्वस्तात मिळतात. काही तर एक-दोन ओव्हरच वापरलेले असतात.” तो डझनच्या भावाने बॉल्स घेतो आणि मग ३-४ रुपयांना विकतो. थोडे जुने असतील तर १-२ रुपयांना. आम्हीही कधी १ रुपया, कधी दीड, तर कधी अगदी नवा कोरा बॉल ३ रुपयांना त्याच्याकडून विकत घेऊ लागलो.
गोटू क्रिकेटही चांगला खेळायचा. कधी-कधी सकाळी आमच्यासोबत खेळत असे. २-३ दिवसांनी कळलं की ‘गोटू’ हे त्याचं टोपण नाव आहे. खरं नाव असलम. तो बल्लीमारान भागात राहायचा.
हिवाळी सुट्टी लागली. गोटूने वादा करूनही बॉल आणून दिला नाही. नंतर कळलं की आमच्यासाठी ठेवलेला बॉल त्याने दुसऱ्या टीमला २ रुपयांना विकला होता. माझ्या मित्राने त्याला झापलं. अखेर त्याने सांगितलं की तो सकाळी ११ वाजता फिरोजशाह कोटला येथे जाणार आहे. बॉल मिळाले तर उद्या आणून देईल.
आमचा विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की आपणही तिथे जाऊन पाहू, कुणाकडून तो बॉल घेतो. एकदा कळलं की आपणही थेट थोकात बॉल विकत घेऊ शकतो. आणि विकून पैसे कमवू शकतो.
सकाळी ११च्या सुमारास आम्ही पायी दिल्लीगेटवर पोहोचलो. त्या काळात फिरोजशाह कोटला स्टेडियम आजसारखं मोठं नव्हतं. एक रस्ता दिल्लीगेटहून राजघाटकडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत, मागे दरियागंज, समोर बाग. दुसऱ्या बाजूला फुटबॉल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ स्टेडियमकडे जाते.
गोटू त्या गल्लीच्या टोकावर बसलेला होता. मैदानात मॅच सुरू होती. आम्हाला पाहताच तो म्हणाला, “धंद्याचा राज जाणायला आला का? विश्वास नाही माझ्यावर?”
मी म्हणालो, “विश्वास असता तर इथे आलो नसतो. आम्हाला फक्त बॉल पाहिजे.” तो म्हणाला, “सध्या मॅच सुरू आहे. थोडा वेळ इथे उन्हात बसावं लागेल.”
मी म्हणालो, “इतक्या दूरून मॅच पाहण्यापेक्षा झाडाखाली हिरवळीवर बसू.”तो हसला आणि म्हणाला, “अब आ ही गये हो, तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.”
थोड्याच वेळात फलंदाजाने एक जोरदार फटका मारला. चेंडू आमच्या दिशेने उसळत रस्त्यावर आला. गोटू जणू याच क्षणाची वाट पाहत होता. तो धावत गेला, बॉल उचलला आणि ओरडला, “भागो, भागो!”
आम्ही काही समजण्याच्या आत तो रस्ता पार करून पळत होता. आम्हीही त्याच्या मागोमाग धूम ठोकली. भिंतीसमोरच्या बागेत बरीच मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांची पर्वा न करता आम्ही भिंतीतल्या एका भेगेतून आत शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.
गोटू हसत म्हणाला, “क्यों, मजा आया ना? अबे बेवकूफों की तरह बैठे क्यों रहे. थोडी अजूनच वेळ झाली असती तर पकडले गेलो असतो. खूप मार पडतो. कधी-कधी पोलिसांकडेही सोपवतात.”
मी विचारलं, “इतका धोका पत्करून तू बॉल चोरून विकतोस. मिळालेल्या पैशाचं काय करतोस?” काही क्षण तो माझ्याकडे पाहत राहिला. डोळे पाणावले. म्हणाला, “घरात माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ आणि एक बहिण आहे. दोन वर्षांपूर्वी आई गेली. वडिलांनी दुसरी लग्न केले. संध्याकाळी वडील भाजीची रेडी लावतात. मी त्यांना मदत करतो. पण ते एक छदामही देत नाहीत. सावत्र आई भावंडांना नीट खायला देत नाही. वडिलांना काही सांगितलं तर ओरडतात, कधी हात उगारतात.”
“या जान-जोखिममध्ये टाकून मिळवलेल्या पैशांनी मी भावंडांना खायला आणतो. आईला न कळता.” पुढे काय बोलावं, हे त्या वयात मला कळलं नाही. मुकाट्याने घरी निघालो. जाताना त्याला वचन दिलं की आजची घटना कुणालाही सांगणार नाही. त्या हिवाळी सुट्टीत आम्ही वचन पाळलं. पुढच्या उन्हाळी सुट्टीत मात्र तो मोरीगेटच्या मैदानात दिसला नाही.
या वर्षी आयपीएलचा सामना पाहताना, कुणास ठाऊक, तब्बल ४२ वर्षांनंतर त्याची आठवण आली. काय करत असेल तो?
No comments:
Post a Comment