समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या दशक दुसऱ्यातील समास दहाव्यात पढतमूर्खाची (शिकलेल्या मूर्खाची) लक्षणे आणि दोष अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. हे दोष बाह्य विद्वत्ता असूनही अंतरी विवेक आणि सदाचार नसल्यामुळे उद्भवतात. अशा मूर्ख व्यक्तीला अभिमान वाढवतो; तो स्वतःची स्तुती करतो, इतरांचे दोष शोधतो, क्रोधाने कठोर बोलतो, परंतु स्वतःचे अवगुण त्याला दिसत नाहीत. अशा पढतमूर्खांसाठी समर्थ म्हणतात:
बहुश्रुत व्युत्पन्न प्रांजळ बोले । ब्रह्मज्ञान दुराशा अभिमान धरी ॥३॥
समर्थ रामदास सांगतात की काही पुस्तके पाठ करून शिक्षण घेतलेले तथाकथित उच्च शिक्षित लोक स्वतःला विद्वान समजू लागतात. परंतु ग्रंथातील सत्य आणि विवेक त्यांना कळलेले नसते. अशा पढतमूर्खांचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:
समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां पाहे अवगुण तो एक पढतमूर्ख ॥२६॥
समर्थ म्हणतात, कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतरच त्या ग्रंथाची समीक्षा करावी. ग्रंथातील गुण-दोष यांचे चिंतन करून सार ग्रहण करावे. गुण स्वीकारावेत आणि दोष टाकून द्यावेत. पण पढतमूर्ख ग्रंथ पूर्ण न वाचता किंवा अर्धवट वाचून, एखाद्या श्लोकावरून संपूर्ण ग्रंथाचा विरोध करतो. उदाहरणार्थ, मनुस्मृती जाळणाऱ्यांपैकी बहुतेकांनी तो ग्रंथ वाचलेलाच नसतो.
वर्तल्याविण शिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी ।
पराधीन गोसावी तो एक पढतमूर्ख ॥३८॥
एखादा माणूस शास्त्र वाचतो, मोठमोठ्या सभा घेऊन ब्रह्म ज्ञानावर भाषण करतो, पण स्वतःच्या वर्तनात लोभ-क्रोध सोडत नाही . दुसरा एखादा साधू लोकांवर अवलंबून राहतो, प्रपंच हातातून निसटलेला असतो, पण परमार्थाचा साधा अंशही नसतो. \ तिसरा एखादा विद्वान देव- ब्राह्मणांचा द्वेष करतो, फक्त बोलण्यात ज्ञान दाखवतो, पण कृतीत नाही. अश्या सर्वांना समर्थांनी
पढतमूर्ख म्हंटले आहे.
सारांश: पढतमूर्ख प्रपंचात बुडालेला असतो, स्त्री-कामवासनेला अधीन राहतो, देव-धर्माची निंदा करतो, ब्रह्मज्ञान फक्त तोंडाने सांगतो पण कृतीत आणत नाही, परकीय संगत करतो, व्यसन आणि आळसात रमतो, अतिथी-शरणागतांना त्रास देतो, मत्सर आणि द्वेष धरतो, अनीतीने पैसा कमावतो, भक्तीमार्ग सोडून स्वार्थासाठी ज्ञान वापरतो. परिणामी प्रपंच हातातून निसटतो आणि परमार्थ मिळत नाही.
समर्थ म्हणतात विवेक जागृत करून वर्तन सुधारले तरच ज्ञानाचा उपयोग होतो. विवेकाने वागणारा मनुष्य प्रपंचात अडकत नाही, तर परमार्थाकडे वाटचाल करतो. सद्गुण स्वीकारल्याने जीवन सुखी, शांत आणि अर्थपूर्ण होते. लोभ, क्रोध, द्वेष यांचा त्याग करून सत्य, करुणा, संयम यांचा स्वीकार केला तर जीवनाला दिशा मिळते. हेच सद्गुण मनुष्याला शहाणपणाकडे नेतात. अंतरी विवेक, साधना आणि सद्गुण असले तरच जीवन खरेच सुखी आणि अर्थसंगत होते.
No comments:
Post a Comment