Tuesday, October 7, 2025

जिन्नने प्रदूषण दूर केले

अलादीन सकाळी-सकाळी लोधी गार्डनमध्ये फेरफटका मारत होता. अचानक एक झणझणीत वाऱ्याचा झोत आला आणि पेट्रोलच्या तीव्र वासाने त्याचे नाक जळजळले. नाक मुरडत तो पुटपुटला, “निसर्गाच्या कुशीतसुद्धा शुद्ध हवा नाही! या प्रदूषणावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा.”

तेवढ्यात त्याचा पाय एका कठीण वस्तूला लागला. तो थोडा डगमगला, पण पडला नाही. खाली पाहिलं तर एक जुना, मळलेला दिवा पडलेला होता. उत्सुकतेने त्याने तो उचलला. “खूप जुना दिसतोय… कदाचित चांगला भाव मिळेल,” असं म्हणत त्याने रुमालाने दिवा  पुसायला सुरुवात केली.

अचानक दिव्यातून धूर निघाला—आणि एक जिन्न प्रकट झाला.

“काय आज्ञा आहे, मालिक?” जिन्नने विचारलं.

अलादीन दचकला. गोंधळून म्हणाला, “काही आज्ञा नाही. दिव्यात परत जा.”

जिन्नने  मान झुकवली आणि म्हणाला, “मालिक, मी तुमची एखादी आज्ञा पूर्ण केल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. तुम्हाला काहीतरी आज्ञा द्यावीच लागेल.”

अलादीनने स्वतःला सावरलं. “ठीक आहे. सांग—तू काय करू शकतोस?”

“माझ्यासाठी काहीही अशक्य नाही,” जिन्न म्हणाला. “जे मनुष्य करू शकत नाही, ते काम पण मी करू शकतो.”

अलादीन हसला. त्याने जिन्नची फिरकी घ्यायचे ठरविले. त्याने जिन्नला आदेश दिला,  "पृथ्वीवरील सगळं प्रदूषण तात्काळ आणि पूर्णपणे नष्ट करून टाक.”

जिन्न हात जोडून शांत उभा राहिला.

अलादीनने जिन्नला टोमणा मारला, “काय झालं? प्रदूषणाने तुलाही हरवलं का? मला माहीत होतं—हे काम तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तो दिव्यात  परत जा आणि झोप घे. जेव्हा तुझ्या लायकीचं काही काम असेल, तेव्हा मी तुला बोलावीन.”

जिन्नच्या आवाजात एक कंप होता— खोल दुःखाचा. तो म्हणाला “मालिक, मी प्रदूषण मूळासकट नष्ट करू शकतो… पण—”

“पण, किंतु, परंतु!” अलादीन चिडून म्हणाला. “तू तर माणसांसारखी बहाणेबाजी शिकलीस वाटतं. आपल्या मालकाची आज्ञा पाळ—किंवा मान्य कर की तू असमर्थ आहेस.”

जिन्नने मान झुकवली, जणू तो अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करत होता. “जशी आज्ञा, मालिक.” त्याने डोळे मिटले, एक मंत्र उच्चारला आणि आकाशात एक विचित्र शांतता पसरली.

क्षणभरात मानवजातीचा श्वास थांबला. अलादीनसह सर्व मानव—आपापल्या पापांच्या ओझ्याने—नरकाच्या ज्वाळांमध्ये विलीन झाले. पृथ्वीने सुटकेचा श्वास घेतला… आणि पुन्हा एकदा हिरवीगार झाली.

 

No comments:

Post a Comment