सृष्टीच्या प्रारंभात, सृष्टीकर्त्याने सर्वप्रथम पृथ्वीची निर्मिती केली. त्याने पृथ्वीवर समुद्र आणि धरतीची रचना केली. या नवसर्जित जगात चैतन्य निर्माण व्हावे, जीवन फुलावे, यासाठी सृष्टीकर्त्याने त्यांच्या मनात प्रेम आणि कामभावना उत्पन्न केल्या.
पण एक समस्या होती- जर समुद्र आणि धरती कामातुर होऊन एकमेकांच्या सान्निध्यात आले, तर त्यांचे मिलन प्रलय घडवेल. धरती समुद्राशी एकरूप होईल आणि साऱ्या सृष्टीचा अंत होईल. म्हणूनच सृष्टीकर्त्याने समुद्राकडून एक वचन घेतले: "युगाच्या अंतापर्यंत तुला धरतीपासून दूर राहावे लागेल."
प्रेम आणि कामभावने शिवाय पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती अशक्य होती. पण जिथे प्रेम असते, तिथे मार्ग सापडतो.
सूर्याच्या प्रखर उन्हात धरती विरहाग्नीत जळू लागली. तिच्या अंतःकरणात समुद्राची ओढ पेटू लागली. समुद्राचीही तीच अवस्था झाली—तो घामाने बेजार झाला. त्याचे पाणी वाष्परूप घेऊन नभात जाऊ लागले. त्या वाफेने वादळाचे स्वरूप घेतले. ते वादळ प्रेमाने ओथंबलेले होते.
समुद्राच्या प्रेमाने भरलेले ते वादळ आकाशात उंच गेले. काळ्याकुट्ट मेघांच्या रूपात ते धरतीच्या दिशेने आले. धरतीने त्या वादळाकडे पाहिले आणि त्यात तिला समुद्राची आत्मा दिसली. तिने दोन्ही बाहू उंच करून त्या वादळाचे स्वागत केले.
प्रेमाच्या वर्षावात धरती चिंब भिजली. तिच्या गर्भात जीवन अंकुरले. ती प्रसूत झाली. आणि अखेर, पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती झाली.
वादळ पुन्हा-पुन्हा येतं आणि जातं. प्रत्येक वेळी, पृथ्वी आणि समुद्र क्षणभर एकमेकांना स्पर्श करतात. नवजीवन जन्म घेतं. सृष्टीकर्त्याचे वचन नियम न राहता, एक अखंड परंपरा बनते. निर्मितीचा जणू एक यज्ञच.
No comments:
Post a Comment