Monday, February 10, 2025

बजेट आले आणि लग्न तुटले.


ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले.  ग्राऊंड फ्लोर वर  एक मोठा हॉल, दोन बेड रूम,  मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम  आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर  पाहुण्यासाठी एक रूम ही.  घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती. जाई जुई, मोगरा, गुलाब, सदाफुली  इत्यादि फुलांच्या झाडे आणि वेली ही होत्या. मुंबई पुण्याच्या भाषेत एक बंगलो त्यांनी बांधला होता.

सदाने नागपूरच्या एका महाविद्यालतून आयटी शिक्षण घेतले. एमबीए ही केले. पण  भरपूर प्रयत्न करून ही त्याला नागपुरात नौकरी मिळाली नाही.  अखेर त्याने पुण्याची वाट धरली. त्याला पुण्यात एका आयटी कंपनीत 25 हजार पगारावर नौकरी मिळाली. एका बंगल्यात राहणारा सदा पुण्यात दोन-चार तरुणांसोबत एका फ्लॅट मध्ये राहू लागला. पुण्यात पंचवीस हजारात  एका व्यक्तीचे  जीवन निर्वाह होणे कठीण, संसार थाटणे शक्यच नाही. सदाचा पगार कमी असल्याने पुण्याच्या नौकरी करणार्‍या मुलींनी त्याला भाव देणे शक्यच नव्हते. तसे ही पुण्याच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात. त्यामुळे सदाने लग्नाचा विचार सोडून दिला. त्यात करोंना आला, कंपनी ने दोन वर्ष पगार वाढ रोखून ठेवली. पण अखेर सदाचे नशीब बदलले. 

नागपुरात ही आयटी कंपन्या येऊ लागल्या होत्या. सदाला गेल्यावर्षी एका कंपनीत 50 हजारची नौकरी मिळाली. त्यात नौकरी ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यन्तची. सदा तर भलताच खुश झाला. नुकतीच त्याची 30 उलटली होती. त्याला लग्नाची घाई झाली होती. नौकरी करणारी मुलगी भेटली नाही तरी वडिलांची पेन्शन आणि त्याच्या पगारात उत्तम रीतीने जगता येणे शक्य होते. त्याच्या वडीलांनी वधू संशोधांनाची मोहीम हाती घेतली.  पण इथेही लोचा झाला. जिथे पुण्या-मुंबईच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात, तिथे नागपुरकर मुलींना पुण्या-मुंबईचे डोहाळे लागलेले असतात. अखेर गेल्या महिन्यात एका मुलीने होकार दिला. 

एक तारखेला निर्मला ताईंनी बेजेट पेश केले. इन्कम टॅक्स लिमिट 12 लाखांपर्यंत वाढविली. पाच फेब्रुवारीच्या माघाष्टमीच्या शुभ दिवशी  सदाचे वडील पुढील बोलणीसाठी मुलीवाल्यांकडे केले. सदा ऑफिसात गेला. संध्याकाळी सदा घरी पोहचला. वडील बैठकीत बसलेले दिसले नाही. त्याने आईला विचारले बाबा कुठे, त्याची आई म्हणाली बाबा वरती गच्चीवर गमल्यातील फुलांच्या झाडांना पाणी देत आहे. तू हात पाय धूऊन कपडे बदलून ये, मी चहा ठेवते. सदा हात पाय धूऊन कपडे बदलून बैठकीत आला. त्याची आई चहा घेऊन आली. वडील ही चहासाठी खाली आले. सदाने वडिलांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. त्याचे वडील म्हणाले सदा, मुलीवाल्यांनी नकार दिला. सदाने त्याचे कारण विचारले. त्याचे वडील म्हणाले मुलीवाले म्हणतात मुलगा किमान इन्कम टॅक्स भरणारा असावा. .....

होणारा जावई इंकम टॅक्स भरत नाही. ही तर आम्हासाठी लजास्पद बाब आहे. अश्या घरी मुलगी देणे शक्य नाही. सदा आपल्या पे स्लिपला पाहत विचार करू लागला पगार पन्नास हजार ते लाख रुपये पोहचायला किमान पाच वर्ष तरी लागतील. पाच वर्षांनी पुन्हा इन्कम टॅक्स लिमिट वाढली तर आपले कधीच लग्न होणार नाही. 



No comments:

Post a Comment