Monday, May 4, 2015

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते.  

त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता.  काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला. बाहेर प्रचंड तापलेले होते, जोराचे गरम वारे ही चालत होते. तेवढ्यात विजयला अतुल पायी-पायी येताना दिसला. अतुल, विजयचा लंगोटी यार होता.  दोघांचे बालपण जुन्या दिल्लीत गेले होते. दोघांचे शिक्षण ही एकाच शाळेत झालेले. पुढे विजय सरकारी नौकरीत लागला आणि अतुल एका कंपनीत सेल्समन. त्याला कामानिम्मित बाहेर हिंडावे-फिरावे लागायचे. तरी महिन्याकाठी ते एक दोनदा तरी ते भेटायचेच. कुठले ही काम एका दुसर्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते करायचे नहीं. सात-आठ महिन्यापूर्वी अतुलचे लग्न झाले होते. बायको मुंबईकर होती. लग्नानंतर घरी पटले नाही, म्हणून बायको सोबत जनकपुरी येथे भाड्याच्या फ्लेट घेऊन वेगळा राहू लागला होता. त्याला पाहताच विजयने विचारले, कुठून  येतो आहे. अतुल म्हणाला, सेक्टर १२ पासून येतो आहे, इथे भिकाजी कामात काही काम आहे.  विजय ने विचारले, अतुल, बस का नाही घेतली. अतुल, एक-दीड किलोमीटर अंतर साठी बस काय घ्यायची. जेवढा वेळ बसची वाट पहावी लागणार, तेवढ्या वेळात तर आपण पायी पोहोचतो सुद्धा. विजय, अरे ते ठीक आहे, पण उघड्या डोक्स्यानी का फिरतो आहे,  डोक्स्यावर काहीतरी घालायला पाहिजे होते, उगाच लू लागेल. अतुल हसत म्हणाला, यार, माझ्या कामात उन्हातान्हात फिरावेच लागते. आता उन्हाची सवय झाली आहे. लू काय बिगाडेल आपल्या सारख्यांचे.  विजयला त्याच्या बोलण्याचा रागच आला, दिवसाचे दीड वाजले आहे,  बाहेर भयंकर तापलेले आहे, प्रचंड गरम वारे चालत आहे आणि या गाढवाला त्याची काही फिक्र नाही, कमीत-कमी रुमाल तरी त्याने डोक्यावर बांधायचा होता. तो रागातच म्हणाला, लेका गाढवा तुझ्या लग्नाला वर्ष  ही झाले नाही आहे, कशाला वर जाण्याचा खटाटोप करतो आहे. वहिनीचा तरी जरा विचार कर. असाच नंग्या डोक्स्याने उन्हातान्हात फिरेल तर, गाढवा तू लू लागून वर जाशील, तिथे वर गेल्या वर विचार यमराजाला, लू क्या बिगाडेगी. अतुल जोरात हसत म्हणाला, जिसके लंगोटिया यार मरने की दुआ देते हों, उसे दुश्मनों की क्या जरुरत. काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. तेवढ्यात उत्तम नगरची बस येताना दिसली, दोघांचे बोलणे तुटले,  अतुलला टाटा करून विजय घरी परतला.


 दुसर्या दिवशी अर्थात रविवारी सकाळचे सातचा वाजले असेल, फोनची घंटी वाजली. सकाळी-सकाळी कुणाचा फोन आला, हा विचार करत विजयने फोन उचलला. फोनवर दिनेश होता, तो म्हणाला, विजय, एक वाईट बातमी, काल रात्री अतुल गेला. विजय सुन्न झाला रिसीवर त्याच्या हातून खाली पडले, काही क्षण काय करावे त्याला सुचेनासे झाले, सर्वांग घामाने डबडबले. कालची भेट आठवली,  अतुलला आपण म्हटलेल डायलॉग गाढवा तू लू लागून वर जाशील  ही आठवला.


झाले असे होते, कामावरून अतुल चार वाजेच्या सुमारास घरी पोहचला. थोड्या तापासारखे वाटले म्हणून, चहा सोबत, PCMची गोळी घेतली आणि पलंगावर जाऊन झोपला. नवरा इतक्या उन्हात थकून भागून आला आहे. त्याल शांत झोपू द्या, हा विचार तिने केला. उन्हाळ्यात अचानक ताप येण्याचा अर्थ काय आणि ताप आल्यावर काय केले पाहिजे, त्या बिचार्या मुंबईकर नववधूला कळणे शक्य नव्हते. संध्याकाळी जनकपुरीतल्या शनी बाजारातून भाजी-पाला आणला. स्वैपाक केला. होता-होता रात्रीचे ९ वाजले, तरी ही नवरा का उठत नाही. तिच्या मनात पाल चुकचुकली. नवर्याला उठवायला ती बेडरूम मध्ये आली.  अतुल तापाने फणफणत होता. त्याची शुद्ध हरपली होती, ताप डोक्यात पोहचला होता.  ती घाबरली, रात्री अतुलला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले.  पण तो वाचला नाही.


उन्हाळ्यात लू ने मरणार्यांच्या बातम्या वाचताना, विजयला नेहमीच अतुलची आठवण येते. अतुलची आठवण येताच, तोंडातून न कळत निघालेले, पण खरे ठरलेले शब्द गाढवा तू लू लागून वर जाशील, सतत कानांत वाजतात. अपराधीपणाची भावना त्याला जाणवते. त्या दिवशी जर त्याने तोंडावर ताबा ठेवला असता तर कदाचित्, अतुल आज ही जिवंत असता.....

1 comment: