Thursday, June 29, 2023

वार्तालाप (14) : रेड्यामुखी वेदवाणी

रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची 
ओवी ज्ञानीयाची.

आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला. आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही. मग या कथे मागचे सत्य काय?  ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्‍या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते. आपल्या धर्मग्रंथात काय आहे, धर्म काय आहे, धर्माच्या मार्गावर चालत जीवन-यापन कसे करावे. हे जनतेला कळेनासे झाले होते. अश्याच परिस्थितीत धर्माच्या नावावर जनतेला मूर्ख बनविणार्‍यांचा बाजार भरतो. समर्थांच्या शब्दांत "शास्त्रांचा बाजार भरलाl देवांचा गल्बला जालाl लोक कामनेच्या व्रतालाl झोंबोन पडतीl आमच्या शास्त्राचे पारायण करा, आमच्या देवाला नवस बोला किंवा फक्त देवाचे नाव घ्या, मेहनत-मजूरी  करण्याची गरज नाही, तुम्हाला इछित फळे मिळतील. सुख समाधान ऐश्वर्य तुमच्या दारी येईल. समर्थांच्या शब्दांत  समाज नासून गेला होता. समाजाची स्थिति "अजगर करे ना चाकरी. पंछी करे ना काम. दास मलूका कह गये सबके दाता राम" अशी झाली होती. चमत्काराच्या आशेने प्रजा कर्महीन झाली, आळशी झाली। गरीबी आणि भुकेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले होते. 

समाजात धर्माच्या बाबतीत माजलेला गोंधळ पाहून संत निवृतींनाथांनी संत ज्ञानेश्वरांना भगवद्गीता मराठी भाषेत प्रगट करण्याची आज्ञा दिली. आता भगवद्गीताच का? हा प्रश्न मनात येणारच. वेद, उपनिषद यांचे सार भगवद्गीतेत आहे. भगवद्गीता माणसाच्या मनातून भय, भ्रम, संशय, निराशा दूर करते. आत्मग्लानि आणि अकर्मण्यतेने ग्रस्त माणसाला  स्वकर्तव्य, स्वधर्माची जाणीव करून देते. माणसाला निष्काम कर्म आणि अखंड पुरुषार्थ करत जगण्याचा मार्ग दाखविते. ज्ञानेश्वरी मराठीत असल्याने अशिक्षित आणि निरक्षर जनतेला ही वेदांचे ज्ञान सहज उपलब्ध झाले. अनेक संतांनी आणि प्रवचनकारांनी वेदांचे ज्ञान महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात पोहचविले. दुसर्‍या शब्दांत रेडा वेद गायन करू लागला होता. 

आज ही तीच परिस्थिति आहे. हजारो पंथ आणि धर्म आहेत. चमत्कारांच्या गाथा आहेत. या शिवाय सरकार मान्य गेमिंग एप ही आहेत. आयपीएल वर  पैसा लावा, दोन कोटी मिळवा. जिंकणार्‍यांच्या नावांचा उदो-उदो होतो.  कोट्यवधी युवा मेहनत मजूरी सोडून विभिन्न गेमिंग खेळयांत त्यांच्या जवळ असलेला पैसा ही कोट्यधीश बनण्याच्या लालसेने उडवीत आहे. चमत्कार होईल या आशेने कथा पारायण, नवस बोलत आहेत, कधी तरी नशीब उघडेल या आशेने. देशात कोट्यवधी लोकांनी कामधंधे करणे सोडून दिले आहे.(राशन पाणी सरकार फ्री देतेच, मग काम करायची गरज काय).  जेंव्हा माणूस स्वकर्तव्य आणि स्वकर्म विसरून जातो त्याच्या नशिबी उपासमार, गरीबी आणि भूक येणारच. थोडक्यात आज ही भगवद्गीतेचा संदेश पुन्हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमाने महाराष्ट्रात सर्वत्र पोहचविण्याची गरज आहे.  
 

No comments:

Post a Comment