Wednesday, April 25, 2018

आठवणीतून -चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग! खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात का तोडले? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. 'चिवताई ये दाणा खा', म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. एसीवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

No comments:

Post a Comment