Monday, April 30, 2018

लेखक बनण्याचे फंडे - चौर्यकला


म्या लेखन चौर्यकला शिकलो 
कवी म्हणूनी प्रसिद्ध जाहलो.

आपले नाव जगात झाले पाहिजे अशी इच्छा सर्वांचीच असते.आपल्या छोट्याशा चौकटीत आयुष्य जगणार्या सामान्य माणसाला हे जमत नाही. मग प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा पूर्ण  करण्याचा सौपा उपाय तो शोधतो. सर्वात सौपा उपाय म्हणजे कवी आणि लेखक होणे. पण त्यासाठी लागणारी कल्पना व वेगळा विचार करण्याची क्षमता हि नसली तरीही चालेल.  ज्या प्रमाणे दुकानदार नकली माल प्रसिद्ध कंपनीचे लेबल लाऊन विकतो. त्याच प्रमाणे कवी बनण्यासाठी प्रसिद्ध कवींच्या कविता, थोडा फेर-फार करून स्वत:च्या नावाने बेधडक खपविल्या म्हणजे कवी म्हणून मान्यता मिळालीच समजा. 

एका कार्यक्रमात गेलो होतो. २०-२५ लोक जमले होते त्यात काही माझे मित्र हि होते. एकाने आपली स्वरचित हिंदी कविता ऐकविली. नंतर ३-४ कवींनी हि त्यांच्या स्वरचित हिंदी कविता ऐकविल्या. मला हि विचारणा केली तू ब्लॉगवर एवढ्या कविता लिहितो, एखादी ऐकव. मी म्हणालो, आजकाल मला स्वत:च्या कविता लक्षात राहत नाही. असा कसा कवी तू ज्याला स्वत:च्याच कविता लक्षात रहात नाही- एक कवियत्री. मी उत्तर दिले नाही, शांत राहिलो. कार्यक्रम संपल्यावर माझ्या एका मित्राने विचारले, तुझी बेइज्जती केली तरीही तू तिला उत्तर का दिले नाही. मी म्हणालो, काय म्हणू, तिने ऐकविली कविता कुठल्या प्रसिद्ध कवीची आहे ते. इथे सर्वांनीच हिंदीच्या प्रसिद्ध कवींच्या कविता स्वत:च्या नावाने खपविल्या आहेत. मला त्यांच्यातला एक व्हायचे नव्हते, म्हणून मी चूप राहिलो. मी त्या कवितांच्या मूळ कवींची नावे हि आपल्या मित्राला सांगितली. नकल करताना डोक वापरण्याचे कष्ट सुद्धा या तथाकथित कवींनी घेतले नव्हते. माझ्याजागी दुसरा असता तर निश्चित त्यांची सर्वांसमोरअब्रू घालविली असती. दुसर्याची कविता स्वत:च्या नावाने खपवायची असेल तर किमान प्रसिद्ध कवींना तरी टाळले पाहिजे. शब्दांना थोडे फिरविले तर अति उत्तम. सरकारी कार्यालयात हिंदी पखवाड्यात अश्या कवींच्या भरपूर कविता ऐकायला मिळतात. थोडीफार प्रसिद्धी त्यांना मिळतेच. शिवाय आजकाल कुणी वाचन करत नाही त्यामुळे अश्या कवींची चलती झाली आहे. 

तीस एक एक वर्ष आधीची गोष्ट, एक प्रसिद्ध हिंदी मासिक वाचत होतो. वाचता-वाचता ध्यानात आले, आपण हि गोष्ट वाचली आहे. सहज लेखकाच्या नावाकडे लक्ष गेले. लेखक आपला मराठी माणूस होता. त्याने चक्क मराठी गोष्ट हिंदीत अनुवाद करून स्वत:च्या नावाने खपविली होती आणि त्याला मानधन हि मूळ मराठी लेखकापेक्षा जास्त मिळाले असेल. हिंदीच्या प्रसिद्ध मासिकात चोरीची गोष्ट टाकणाऱ्या लेखकाला सलाम करण्याची इच्छा झाली.  पूर्वी प्रसिद्ध हिंदी सिनेमाचे मराठीत रिमेक होत होते, तसेच एका भाषेची कहाणी अनुवाद करून दुसर्या भाषेत स्वत:च्या नावाने सहज खपविता येतात. ९९ टक्के कुणालाही कळणार नाही याची शाश्वती. एखाद्याला कळले तरी तो तक्रार करणार नाही. आजकाल तर लोक पुस्तके आणि मासिक वाचत नाही. मराठी भाषेचे सोडा हिंदीचे अनेक मासिक केंव्हाच बंद झाले आहेत. अनुवाद आणि थोडा फेरफार करून दुसर्याचे लेखन स्वत:च्या नावाने सहज खपविता येते. यात रिस्क हि कमी. 

काही वर्ष आधी ब्लॉग लेखनाला चालना मिळाली. अनेक संकेतस्थळांवर हि लोक लिहू लागले. गेल्या तीन -चार वर्षांपासून इथे हि मंदी आली आहे, हे वेगळे. मराठीचे अनेक संकेतस्थळ बंद झाले. तरी हि जिथे पुस्तकाच्या ३०० प्रतीही खपण्याची संभावना नसते, तिथे ब्लॉग किंवा संकेतस्थळांवर लिहिले तर तुमचे लेखन जास्त वाचकांनी वाचण्याची शक्यता आहे. 

मीही मराठीसृष्टी या संकेतस्थळावर पहिल्यांदा आपल्या मोडक्या-तोडक्या मराठीत लिहायला सुरवात केली. लिहिताना भाषा किती हि अशुद्ध असली तरीही संकेतस्थळांवर लेखन प्रसिद्ध होतेच. नंतर स्वत:च्या नावाने ब्लॉग हि बनविला. पूर्वी मराठीसृष्टी या संकेतस्थळावर लिहिलेले लेख हि आपल्या ब्लॉग वर टाकले. माहितीच्या या युगात ब्लॉगवर टाकलेले लेखन कुणी चोरणार नाही, त्यात शिक्षित नेटकर  मराठी माणूस असे कदापि करणार नाही असे वाटले होते. आपले लेख अधिक लोकांनी वाचावे हि इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. एक दिवस नेट वर सर्च करताना ऐसी अक्षरे नावाच्या संकेतस्थळा बाबत माहिती मिळाली. 

ऐसी अक्षरेवर "प्रेम म्हणजे काय" हा लेख टाकला. [http://aisiakshare.com/node/2406]. लगेच अड्मीन ने विचारले हा लेख तुमचा आहे का? मला विजेचा शॉकच बसला. मी उत्तर दिले आपल्या ब्लॉग वरून हा लेख इथे टाकला आहे. अड्मीन ने तीन-चार लिंक पाठविल्या त्या वरून कळले नितीन ठाकूर, युवराज मोहिते, पवारजी इत्यादी लोकांनी हा लेख चोरून स्वत:च्या नावाने खपविला होता. एक चांगले होते, मराठीसृष्टी साईट बंद झाली नव्हती. त्यामुळे  लेखाची लिंक पाठवून मूळ लेखक मीच आहे, हे मला सिद्ध करावे लागले. आपल्या चिरंजीवाची मदत घेऊन चोरांचे इमेल शोधले व जाब विचारला. त्या पैकी मोहिते आणि पवार यांनी माफी मागितली. नंतर कळले हा लेख आणिक ३-४ लोकांनी स्वत:च्या नावानी खपविला आहे. नेटवर अधिक तपासल्यावर कळले माझ्या अनेक कविता आणि लेख दुसर्यांनी त्यांच्या नावावर खपविले आहेत. काय करणार. मराठी ब्लॉग लेखनात पैसे मिळत नाहीत. पण चोरांविरुद्ध कार्रवाई करण्यासाठी पैसे लागतात. यावरून एक गोष्ट नक्की सिद्ध होते, बिना कष्ट करता, दुसर्यांचे लेखन ब्लॉग, फेसबुक व व्हाट्सअप वर स्वत:च्या नावाने खपवा, मूळ लेखक काही ही करू शकणार  नाही.  

तर मित्रांनो वाट कसली पाहता,दुसर्याचे लेखन चोरी करा आणि स्वत:च्या नावाने खपवा. लेखक म्हणून तुम्हाला प्रसिद्धी नक्कीच मिळेल. कुणी जाब विचारला तर बेशरम बना. चोरांच्या उलट्या बोंबा हि मारा. असो. 

No comments:

Post a Comment