मधु मिलनाची रात्र, केशर मिश्रित दुधाचा पेला घेऊन ती आत आली. तिला पाहताच 'शुभ मंगल सावधान, सावधान हे शब्द त्याच्या कानांत गुंजू लागले. समर्थ तर भोवल्यावरून पळाले होते. गौतम बुद्ध आपल्या बायको मुलाला सोडून रात्रीच्या अंधारात पळाले होते. आता नाही पळालो तर संसार चक्रातून कधीच पळू शकणार नाही, माया-मोहाचे पाश तोडू शकणार नाही हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पत्नीला उद्देश्यून तो म्हणाला, आई वडिलांची इच्छा मोडायची नव्हती म्हणून मी लग्न केले. आता त्यांच्या वचनातून मुक्त झालो आहे. मला संसारात रस नाही. मला स्वर्गात जाऊन देवांचे दर्शन घ्यायचे आहे, त्या साठी घोर तपश्चर्या करावी लागते. माझा नाईलाज आहे, असे म्हणत त्याने धूम ठोकली. लोकांपासून दूर तो घनघोर अरण्यात पोहचला. स्वर्ग प्राप्ती साठी त्याने कठोर तपश्चर्या सुरु केली. वल्कल परिधान केले. झोपायला धरती आणि पांघरायला आकाश. कंद मूळ, फळे हाच त्याचा आहार. कधी ही संसारिक भोगांचा विचार त्याचा मनात आला नाही. सतत नामस्मरणात तो दंग राहायचा. काळ लोटला. तो म्हातारा झाला आणि मरण पावला.
चित्रगुप्ताने त्याच्या पाप-पुण्याचा हिशोब केला. एक दिवस स्वर्गात राहण्याचे पुण्य त्याचा पदरी पडले. त्याला आनंद झाला. एक दिवस का होईना, त्याला स्वर्गीय देवतांचे दर्शन घेता येईल. जन्माची तपस्या सफल होईल. देवदूत त्याला स्वर्गात घेऊन आले. अनेक सुगंधित उबटने अंगाला लाऊन, त्याला स्नान घातले. उंच भरजरी रेशमी वस्त्र त्याला नेसायला दिले. इंद्राच्या सभेत त्याला घेऊन पोहचले. सभेत इंद्र आणि इतर देवता, रम्भा, उर्वशीचे इत्यादी अप्सरांचे नृत्य पाहण्यात दंग होते. त्याला पाहताच इंद्र आपल्या सिंहासनावरून उठला, त्याचे स्वागत केले. त्याला आपल्या जवळच्या मंचकावर बसवले. एक अप्सरा सोमरसाचे पात्र घेऊन त्याच्या जवळ आली. इंद्र त्याला म्हणाला, स्वर्गीय अप्सरांचा नृत्याचा आनंद घेत सोमरसाचे प्राशन कर. आज आपल्या आवडत्या अप्सरे बरोबर तू मनसोक्त रमण करू शकतो. वेळ घालवू नको. हा एका दिवसाचा स्वर्गीय आनंद तुझ्या कठोर तपस्येचे फळ आहे. उचल ते सोमरसाचे पात्र. त्याने समोर पहिले, रम्भा-उर्वशी सोमरसाच्या धुंदीत देहभान विसरून नाचत होत्या. दोघींचे वस्त्र अस्तव्यस्त झाले होते, दिसू नये ते सर्व दिसत होते. पण त्यांना त्याची लाज नव्हती. सर्व देवता ही मद्याच्या धुंदीत होते. चिरयौवना सुंदर अप्सरांच्या ओठांचे स्पर्श झालेले सोमरस देवगण आनंदाने प्राशन करीत होते. आजच्या सिने तारकांना लाज वाटेल असे वस्त्र अप्सरांनी परिधान केले होते. अप्सरांच्या गळ्यात गळे घालून देवगण कामोत्सव साजरा करण्यात मग्न होते. हे सर्व पाहून, त्याला आठवले, काही वर्षांपूर्वी त्याचा मित्र त्याला फार्म हाऊस वर नवीन वर्षाच्या पार्टीत घेऊन गेला होता. तिथे तोडक्या वस्त्रातल्या बारबाला लोकांना ड्रिंक्स सर्व करीत होत्या. तिथे सर्व स्त्री-पुरुष लोक-लाज विसरून मद्याच्या धुंदीत नाचत होते. खुलेआम भोगविलास सुरु होता. त्या पार्टीहून परतल्यावर त्याला संसारापासून विरक्ती झाली. इथे येऊन पाहतो तर स्वर्गात ही तोच प्रकार. त्याला प्रश्न पडला, त्याच्या कठोर तपस्येचे फळ हेच का? असा आनंद तर काही पैका खर्च करून पृथ्वीवर सहज प्राप्त होतो. संपूर्ण आयुष्य अश्या स्वर्ग सुखा साठी मोजले. त्याला त्याचीच लाज वाटली. परित्यक्ता पत्नीची आठवण आली. आपण तिची प्रतारणा केली, एवढ्या शुल्लक गोष्टी साठी. तिची माफी मागितली पाहिजे. इंद्रसभा सोडून तो निघाला, पण तिला शोधणार कुठे? कुठे असेल ती आज. अचानक त्याला एक अंधुक आकृती दिसली, तीच ती त्याची पत्नी. तो जोरात ओरडला, माफ कर मला. अहो, काय झाले तुम्हाला, कसली माफी, काही स्वप्न पहिले का? तो दचकला, आपण बिछान्यावर झोपलेलो आहे, हे त्याच्या लक्ष्यात आले. त्याने लगेच स्वत:ला सावरले. तिच्या हातातला केशरमिश्रित दुधाचा गिलास आपल्या हातात घेत तो म्हणाला, मधुमिलनाची रात्र जागून काढायची असते, डोळा लागला, गुनाह घडला आहे हातून. अपराधीला दंड हा मिळालाच पाहिजे. तिला त्याचे ऐकून हसू आले, ती म्हणाली अजून भरपूर रात्र उरली आहे, तुम्ही म्हणाल तिथे तुम्हाला शिक्षा करीन. त्या नंतर काय झाले कुणी-कुणाला शिक्षा केली, कशी केली, अंधार असल्या मुळे काहीच कळले नाही.
( २ जुन २०१५ हा लेख त्या वेळी हि सर्वांना आवडला होता). .
No comments:
Post a Comment