Monday, October 6, 2014

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू



काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला.

खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार. झाडू लावत-लावत त्याने भ्रष्टाचार रुपी कचरा गोळा केला आणि तो इंद्रप्रस्थ नगरीच्या सिंहासन जवळ पोहचला. पाहतो तर काय सिंहासनाचा एक पाया तुटलेला. त्याने गोळा केलेला भ्रष्टाचार रुपी कचरा त्या पायाच्या खाली ठेवला आणि सिंहासनावर बसला. भ्रष्टाचार वैगरेह विसरून गेला आणि चमत्कारी झाडू ही अडगळीत ठेऊन दिला. काही महिने राज्य केल्यावर त्याला चैन पडेनासे झाले. दिवसा उजेडी हस्तिनापूरचे स्वप्न दिसू लागले. त्याने सिंहासन सोडले आणि सैन्य घेऊन हस्तिनापूरच्या दिशेने प्रयाण केले. परंतु चतुर द्वारकेच्या कृष्णाने त्याचा डाव हाणून पडला. आता इमानदार माणसाची स्थिती ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. इंद्रप्रस्थी परतल्यावर त्याला अडगळीत ठेवलेल्या चमत्कारी झाडूची आठवण आली. पण त्याला झाडू सापडला नाही.

इकडे द्वारकेच्या राजाने झाडू पळविला या चमत्कारी झाडूने देशातला सर्व कचरा स्वच्छ करेन असे त्याने जनतेस म्हंटले आणि जनतेला ही कचरा स्वच्छ करण्याचे आव्हान केले. आता राजाच जर रस्त्यावर झाडू मारण्यास उतरणार तर नेता अभिनेता, खेडाळू का मागे राहणार.  नेते, अभिनेते सर्व हातात  झाडू घेऊन  कचरा स्वच्छ करण्यास रस्त्यावर उतरले.  अडगळीत पडलेला झाडू आता मोठ्या-मोठ्या लोकांच्या बैठकीत पोहचला. तेंडल्या ही क्रिकेट बेट सोडून सकाळी-सकाळी झाडू हातात घेऊन रस्ते स्वच्छ करताना दूरदर्शन वर दिसू लागला. तेंडूलकर सारखा रोल मोडेल जर हातात झाडू घेईल तर मोठ्या मोठ्या कंपन्या ही झाडूच्या बाजारात उतरतील, हे आलंच. सकाळी सकाळी दूरदर्शन वर विज्ञापनात हातात झाड़ू घेउन  सलमान खान म्हणत आहे,

तेरी गली, मेरी गली से साफ क्यों?
गली को चमकाये, लिवर ब्रांड झाडू.

माधुरी स्टायल स्माईल करत एक हिरोईन म्हणत आहे,

माधुरी के दातों की तरह चमकाए
आपके मोहल्ले को, चमको ब्रांड झाड़ू.

बेचारा इमानदार माणसाच काय झालं. इमानदार माणूस या घडी  कपाळावर हात ठेऊन विचार करीत आहे, गादी गेली, झाडू गेला ...

एकच होता झाडू
तो ही त्याने पळविला
आता स्वच्छ करू कसा
भ्रष्टाचार रुपी कचरा.

पण आता त्याच्या शब्दांवर पुन्हा लोक विश्वास ठेवतील का? 

No comments:

Post a Comment