Monday, July 14, 2025

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे. अज्ञानी माणूस आपली दरिद्रता दूर करण्याचा प्रयत्न सोडून दुसर्‍यांना दोष देत चुकीच्या मार्गावर चालू लागतो आणि दारिद्रयात जगत जीवन व्यर्थ घालवतो. समर्थ म्हणतात, 
 
विद्या नाही बुद्धि नाही. 
विवेक नाही साक्षेप नाही.
कुशळता नाही व्याप नाही. 
म्हणोन प्राणी करंटा.

समर्थ म्हणतात, ज्या व्यक्ति पाशी विद्या, बुद्धि, उद्योग, कुशलता, व्याप आणि विवेक नाही तो प्राणी करंटा होतो अर्थात आयुष्यभर दरिद्री राहतो. दुसर्‍या शब्दांत या ओवीत समर्थांनी आपल्याला संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग दाखविला आहे.  

समर्थ म्हणतात विद्या अध्ययन हा संपन्न बनण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. ज्या माणसाजवळ कोणतीही विद्या नाही तो करंटा राहणारच. वेदपाठी ब्राह्मणाला मोठ्या-मोठ्या यज्ञ कार्यांत बोलविले जाते. मोठी दक्षिणा मिळते. ज्या ब्राह्मणाला सत्यनारायणाची पोथी वाचून ही पूजा सांगता येणार नाही तो दरिद्री राहणारच. हाच संसाराचा नियम आहे. दुसरी पायरी उद्योग अर्थात कष्ट करण्याची तैयारी. विद्या अर्जित करण्यासाठी संबंधित विषयांच्या पोथ्या वाचाव्या लागतात. योग्य गुरु कडून समजून घ्याव्या लागतात. प्रश्नांची उत्तरे पाठ करावी लागतात. दहा-बारा तास रोज अभ्यास करावा लागतो. तेंव्हा काही डॉक्टर बनतात, काही आयएएस बनतात. काही सीए बनतात काही एमबीए करून मोठ्या- मोठ्या उद्योगांचे प्रशासनिक प्रमुख बनतात. कोट्यवधी पगार घेतात. समृद्ध बनतात. काही कारकून बनून मध्यम वर्गीय जीवन जगतात. बाकी ज्यांच्यात मेहनत करून ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता नाही, ते बेरोजगार आणि दरिद्री राहतात. चुकीच्या मार्गावर चालू लागतात.  काही चोरी-चकारी आणि गैरमार्गांचा अवलंबन करून जगण्याचा प्रयत्न करतात. काही सत्ता लोलुप नेत्यांच्या तालावर नाचतात. आंदोलनात भाग घेऊन तोडफोड ही करतात. अश्या तरुणांना कधी-कधी जेल मध्ये ही जावे लागते. त्यांचे आयुष्य उध्वस्त होतात. दु:ख आणि गरीबी त्यांच्या भाग्यात येते.  काही नैराश्याने ग्रस्त होऊन आत्महत्या ही करतात. असो. 

समर्थ म्हणतात उत्तम गुरु कडून ज्ञान प्राप्त करून काम भागत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी कुशलता ही लागते. उदाहरण, शिलाई केंद्रात जाऊन कपडे शिवण्याचे ज्ञान प्राप्त केल्या नंतर त्यात कुशलता ही प्राप्त करावी लागते. शिंपीला कुशलता प्राप्त करण्यासाठी एखाद्या उस्तादाच्या दुकानात काम करावे लागते. सरळ रेषेत शिलाई करण्यासाठी ही अनेक महीने अभ्यास करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असल्याने त्यानुसार माप घेणे आणि शिलाई करण्यासाठी कुशलता ही लागणारच. त्यासाठी उस्तादच्या मार्गदर्शनात निरंतर अभ्यास करावा लागतो. कपडे शिवण्यात कुशलता प्राप्त झाल्यानंतर वेगळी दुकान थाटता येते. बिना कुशलता प्राप्त केल्या, थेट दुकान उघडली तर ती काही महिन्यातच बंद होण्याची शक्यता जास्त.

समर्थ सारासार विचार करण्यासाठी विवेक बुद्धि वर ही जोर देतात. आता शिंप्याला दुकान उघडायची आहे. त्याला दुकानासाठी त्याच्यापाशी असलेल्या बजेट अनुसार मौक्याची जागा शोधावी लागणार. ज्या भागात दुकान उघडायची आहे, त्या भागातील दुकानाचे भाडे, सरकारी कर, बँकेचे व्याज, उत्तम शिलाई सामग्री वापरण्याचा खर्च उदा. दोरे, सुई, जीप बटन, लेस, इत्यादि, त्या भागातल्या लोकांची खर्च करण्याची क्षमता, किमान नफा किती ठेवला पाहिजे जेणे करून नुकसान होणार नाही इत्यादि. शिंप्याने या सर्वांचा विचार करूनच शिलाईचे रेट ठरविले पाहिजे. रेट कमी ठरविले तर नुकसान होईल. रेट जास्त ठेवले तर ग्राहक कमी येतील. रेट कमी ठेवण्यासाठी शिलाईचे सामान निम्न दर्जाचे वापरले तर ग्राहक तुटतील. विवेक आणि बुद्धीचा वापर करून  शिंप्याने योग्य जागी दुकान उघडली पाहिजे आणि गुणवत्तेशी प्रामाणिक राहिले पाहिजे. ग्राहकांशी गोड बोलले पाहिजे. शेवटी,  शिंप्याला ऊन असो की पाऊस, दररोज नियमित वेळेवर दुकान उघडावी लागेल आणि 12-12 तास उघडी ठेवावी लागेल. किमान एवढे केले तरी, थोड्या काळातच त्याला निश्चित प्रसिद्धी मिळेल. तो संपन्न आणि वैभवशाली होईल. थोडक्यात, संसारात संपन्न आणि वैभवशाली बनायचे असेल तर ज्ञान, कुशलता, सारासार विचार करण्याची विवेक बुद्धि ही पाहिजे. असो. 





No comments:

Post a Comment