Saturday, August 16, 2025

गूढ कथा : अक्कल दाढ (संपादित)

  

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट भ्रष्टाचाराची फाईल वाचताना दाढ दुखू लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. घरी पोहचल्यावर गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. 

सकाळी दातांचा डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर माझ्या कडे पहात  मिस्कील पणे हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीव घेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. कदाचित अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. भिक्षा मागत दारो-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? घाबरून मी ओरडलो, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. कार्यालयात पोहचल्यावर ती विशिष्ट भ्रष्टाचाराची फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून कपाटात ठेऊन दिली. घरी आल्यावर  पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो. 

आरश्यात मला माझा चेहरा काळा ठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही. 
 

No comments:

Post a Comment