Tuesday, August 26, 2025

लघु कथा: म्हातारा सोनेरी फुलांचा सुगंध

एक म्हातारा रोज  सकाळी  फिरायला बगीच्यात येत असे. बगीच्यात आल्यावर तो सोनेरी फुलांसोबत अनेक तास बोलायचा. आज सकाळी ही तो आला, पाहतो काय, बगीच्यातील सोनेरी फुलांचे रोपटे कुणीतरी उपटलेले होते. म्हातार्‍याच्या काळजात धस्स झाले, तो मटकण खाली बसला. हे बहुतेक क्रिकेट खेळणार्‍या द्वाड  मुलांचे काम आहे. त्याने मनातल्या मनात त्या मुलांना शिव्या मोजल्या. एक सोनेरी निर्जीव फूल उचलून आपल्या काळजाशी घट्ट धरले. त्याच क्षणी म्हातार्‍याला काळजात कळ जाणवली. 

आजोबा, कसे वाटते आता. म्हातार्‍याने डोळे उघडले. समोर क्यारीत सोनेरी फुले वार्‍यासवे मस्त डोलत होती. त्यांच्या सुगंध चहुओर पसरलेला होता. म्हातार्‍याने प्रेमाने सोनेरी फुलांना गोंजारले. आजोबांनी नेहमीच्या सवयीने फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो. आजोबा, आम्ही मस्त आहोत, इथे कसलीच काळजी नाही. इथे कुणीही आम्हाला त्रास देऊ शकत नाही. आजोबा, तुम्ही थकला असाल, थोडा निवांत पडा. तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो.  भरपूर वेळ आहे, आता आपल्याकडे. म्हातार्‍याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते. 



No comments:

Post a Comment